वसई : वाहनतळाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी एसटी महामंडळाच्या बसस्थानक, आगारांच्या मोकळ्या जागा विकसित करून वाहनतळासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात वसई स्थानकालगत असलेले नवघर बसस्थानक विकसित केले जाणार असून यासाठी डिसेंबर अखेरपर्यंत आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
वसई विरार शहरात वाहनतळाचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. वाहने उभी करण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने अनेक भागात वाहने थेट रस्त्यावर उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असतात. तर अनेकदा वाहने अधिकृत जागाच उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना ही अडचणी येतात.
वाहनतळाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी रेल्वे स्थानकालगत असलेल्या नालासोपारा, वसई नवघर एसटी आगाराच्या मोकळ्या जागा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) या तत्त्वावर विकसित करण्यात याव्यात अशी मागणी समोर आली होती. याबाबत वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी सुद्धा परिवहन विभागाकडे पत्रव्यवहार केला होता.
त्यानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पालघर जिल्ह्यातील एसटी आगाराच्या मोकळ्या जागा आहेत त्या विकसित करुन वाहनतळासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिल्या टप्प्यात वसई स्थानकालगत असलेल्या नवघर एसटी आगाराची मोकळी जागा विकसित केली जाणार आहे. त्याचा डिसेंबर अखेर पर्यंत त्याबाबतचा आराखडा सादर करण्याचे आदेश नुकताच झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकार्यांना दिले आहेत असे आमदार स्नेहा दुबे- पंडित यांनी सांगीतले आहे.
पालिकेला बस उभ्या करण्यास जागा मिळणार
वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या वसई पश्चिमेच्या भागात जागा उपलब्ध नसल्याने त्या मुख्य रस्त्यालगत उभ्या कराव्या लागत आहेत. आता एसटी महामंडळाने जागा विकसित केल्यानंतर ती जागा पालिकेच्या बस उभ्या करण्यासाठी भाडे तत्त्वावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर दुसरीकडे उर्वरित जागेत इतर नागरिकांसाठी पे अँड पार्क ची सुविधा उपलब्ध होईल यामुळे एसटी महामंडळाला त्यातून महसूल उपलब्ध होणार आहे.