वसई : नालासोपाऱ्यात एकापाठोपाठ एक अशा अमली पदार्थ तस्करीच्या घटना समोर येत आहेत. बुधवारी पुन्हा एकदा नालासोपारा येथील मोरेगाव परिसरात सव्वा दोन कोटींचे अमली पदार्थ तुळींज पोलिसांनी जप्त केले आहेत या प्रकरणी एका नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे. मागील सहा दिवसातील ही तिसरी कारवाई आहे.

नालासोपारा शहरात मोठ्या प्रमाणावर नायजेरियन देशाचे नागरिक बेकायदेशीरित्या वास्तव्य करत आहे. यातील अनेक नागरिक अमली पदार्थांच्या व्यवहारात सक्रीय असल्याचे उघड झाले आहे.

बुधवारी नालासोपारा पूर्वेच्या मोरेगाव विवांता हॉटेल जवळच्या भागात एक व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती तुळींज पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून सापळा रचला होता. याच दरम्यान एक नायजेरियन इसम त्याठिकाणी संशयित दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या कडे एम डी ( मॅफेड्रोन) नावाचा अमली पदार्थ आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.अँथोनी ओडिना (४३) असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ११२५ ग्रॅम वजनाचा सव्वा दोन कोटींचा अमली पदार्थ जप्त केला आहे.

याशिवाय ३६ हजार रोख रक्कम जप्त केली असल्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल फड यांनी सांगितले आहे. या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात विरोधात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोवैद्यानिक परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपीएस ऍक्ट ) कलम ८ (क), २१ (क), २२,२९ सह विदेशी नागरिक कायदा १९४६ चे कलम १४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मागील सहा दिवसांतील ही तुळींज पोलिसांची ही तिसरी कारवाई आहे.

यापूर्वीच्या कारवाया

१६ मे २०२५ रोजी तुळींज पोलिसांनी नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर मधील राहत्या घरात अमली पदार्थ तयार करणारा कारखाना उध्वस्त केला होता. त्यावेळी ५.६० कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१८ मे २०२५ नालासोपारा पूर्वेच्या यशवंत हाईट्स जवळील मुख्य रस्त्यावर अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नायजेरियन महिलेला अटक केली आहे. व्हिक्ट्री अबेके (२३) असे महिलेचे नाव असून तिच्याकडून १ कोटी ६० लाखांचा मॅफेड्रोन नावाचा अमली पदार्थ जप्त केला आहे.