वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत उभारण्यात आलेल्या रेडिमिक्स सिमेंट प्रकल्प (आरएमसी) धारकांनी प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शन तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई सुरू केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या अहवालानुसार महावितरणने ससूनवघर व मालजीपाडा येथील २० आरएमसी प्रकल्पांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
वसई विरार मधील राष्ट्रीय महामार्गावरील मालजीपाडा, ससूपाडा, ससूनवघर, वर्सोवा पुला जवळ यासह अन्य भागात चाळीस हून अधिक रेडिमिक्स प्रकल्प आहेत. यातील बहुतेक कारखाने अगदी महामार्गाला लागूनच आहेत. मात्र हे प्रकल्प धारक कोणत्याही प्रकारचे नियमांचे पालन करीत नसल्याने महामार्गासह आजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होऊ लागले आहे. या प्रकल्पातून उडणारे धूलिकण यामुळे आजूबाजूच्या परिसरात प्रदूषण निर्माण होऊ लागले आहे. विशेषतः रात्रीच्या सुमारास सर्वाधिक प्रदूषण हवेत दिसून येत आहे. या प्रदूषणकारी प्रकल्पांची तपासणी करून त्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांना प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नोटीसा पाठवून विविध उपाययोजना करण्यास सांगितले होते.
मात्र त्याकडे प्रकल्पधारकांनी दुर्लक्ष करून प्रदूषण करण्याचे प्रकार सुरूच होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या नियमांची पायमल्ली केली असल्याने अशा प्रकल्प धारकांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. हे प्रकल्प बंद व्हावेत यासाठी त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा मंडळाने घेतला होता. त्यानुसार वसईच्या महावितरण कार्यालयाला २० प्रकल्पांचा वीज पुरवठा खंडित करण्यात यावा असे पत्र पाठविण्यात आले होते त्यानुसार महावितरणने ससूनवघर १३ व मालजीपाडा येथील ७ आरएमसी प्रकल्पांचा वीज पुरवठा खंडित केला असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ ठाणे -पालघरचे उपप्रादेशिक अधिकारी आनंद काठोळे यांनी सांगितले आहे. नुकताच वसईच्या महसूल विभागाने नायगाव पोलीस ठाण्यात २८ प्रदूषणकारी आरएमसी प्रकल्पधारकांवर गुन्हे दाखल केले होते.
प्रदूषण पसरविणाऱ्या प्रकल्पांवर यापूर्वी सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय प्रदूषण रोखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना आवश्यक आहेत त्यासाठी नोटीसा दिल्या जात आहेत. जे नियमांचे उल्लंघन करीत आहेत त्यांच्यावर कारवाई सुरूच आहे.
आनंद काठोळे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ, ठाणे- पालघर
महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने आरएमसी प्रकल्पांचा वीज पुरवठा खंडित करण्याबाबत नोटीस दिली होती.त्यानुसार त्यांचा वीजपुरवठा खंडित करून तसा अहवाल मंडळाला दिला आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.गिरीश भगत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण वसई.