वसई : नायगाव पश्चिमेच्या विजय पार्क परीसरात वादळीवाऱ्यामुळे महावितरणचे रोहित्र कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. हे रोहित्र कोसळण्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेमुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला.

नायगाव पश्चिमेच्या भागात विजय पार्क परिसर आहे. या भागातील परिसराला वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण ने या ठिकाणी रोहित्र बसविले आहे. मात्र बसविण्यात आलेले रोहित्र व त्याचे खांब अनेक वर्षे जुने झाले होते. गुरुवारी सकाळपासूनच शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. या वादळीवाऱ्याच्या तडाख्याने महावितरणचे हे रोहित्र कोसळले. त्यासोबत बाजूचे विद्युत तारा तुटल्या व खांब ही वाकले.

सकाळी साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली होती. हे रोहित्र अगदी धोकादायक पध्दतीने कोसळत असल्याची घटना बाजूच्या सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे. नायगाव पश्चिमेचा हा वर्दळीचा रस्ता आहे. ,घटना घडली त्या वेळीच कोणीच रस्त्यावरून ये जा करीत नसल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. तर या भागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने विजेविना नागरिकांचे हाल झाले.

ही घटना महावितरणच्या दुर्लक्षित पणामुळे घडली असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना हे रोहित्र बदलावे व याभागात नवीन विद्युत खांब बसवा अशी मागणी अनेकदा केली आहे. त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते आशिष वर्तक यांनी सांगितले आहे.

सद्यस्थितीत त्या ठिकाणी महावितरण कडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण करून तात्पुरता स्वरूपात बाजूच्या रोहित्रामधून वीज पुरवठा सुरू केला आहे. याशिवाय त्या ठिकाणी नवीन रोहित्र उभारले जाणार आहे त्यासाठी नियोजन केले असून त्यासाठी एक ते दोन दिवस इतका कालावधी लागणार आहे असे महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.