वसई: मागील काही वर्षांपासून वसई विरार भागात अनधिकृत शाळा उभारण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. यावर्षीच्या सर्वेक्षणात वसई तालुक्यात सुमारे ९७ अनधिकृत शाळा असल्याचे आढळून आले आहे. यात ६९ प्राथमिक व २८ माध्यमिक स्वरूपाच्या शाळांचा समावेश आहे. वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. विशेषतः पूर्व पट्टीच्या भागात मोठ्या प्रमाणात चाळी उभारल्या गेल्या आहेत. अशा विविध ठिकाणच्या भागात मागील काही वर्षांपासून शहरात अनधिकृत शाळा सुरू करण्याचे प्रकार सुरू आहेत.
शहरातील विविध भागांमध्ये शिक्षण विभागाची परवानगी न घेताच अनधिकृत शाळा सुरू आहेत. काही शाळा तर दाटीवाटीच्या परिसरात अनधिकृत बांधकाम असलेल्या खोल्यांमध्ये भरविल्या जात आहेत. तर काही ठिकाणी शाळांना इंग्रजी नावे देऊन त्या शाळा कॉन्व्हेंट असल्याचे भासवून पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात आहे. या अनधिकृत शाळांना रोखण्यासाठी शिक्षण विभागाने त्यांचे सर्वेक्षण केले होते. यात पेल्हार, मालजीपाडा, दहिसर, कामण,कळंब , विरार वालीव , बोळींज , माणिकपूर केंद्रानिहाय केलेल्या सर्वेक्षणात सद्यस्थितीत एकूण ९७ शाळा या अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. यात २८ शाळा या माध्यमिक आहेत तर ६९ प्राथमिक शाळांचा समावेश असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. यातील सर्वाधिक अनधिकृत शाळा या पेल्हार विभागात ६६ अनधिकृत शाळांचा समावेश आहे.
अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन
अनधिकृत शाळांच्या वाढत्या प्रकारामुळे विद्यार्थी व पालक यांची फसवणूक होत आहे. असे प्रकार टाळण्यासाठी शहरातील ज्या अधिकृत शाळा आहे व ज्यांना शासनाने मान्यता दिली आहे. अशा सर्व शाळांनी मान्यता पत्र शाळेच्या दर्शनी भागात लावा जेणेकरून शाळेची माहिती पालक विद्यार्थ्यांना समजेल अशा सूचना ही शिक्षण विभागाने केल्या आहेत. याशिवाय शिक्षण विभागाकडूनही अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
अनधिकृत शाळांची यादी विलंबाने
अनधिकृत शाळांची यादी ही शिक्षण विभागाकडून दरवर्षी एप्रिल किंवा मे या महिन्यात जाहीर केली जाते. मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्षात ही यादी अगदी शाळा सुरू होण्याच्या तोंडावर केली आहे. त्यामुळे यापूर्वीच काही पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश अनधिकृत शाळेत घेतले असण्याची शक्यता आहे. यावर्षी ही यादी करण्यास विलंब का झाला असा प्रश्न आता नागरिकांमधून विचारण्यात येत आहे. यादी ही सुरवातीलाच प्रसिद्ध होणे आवश्यक होते असेही नागरिकांनी सांगितले.
यापूर्वी पन्नासहून अनधिकृत शाळांवर गुन्हे
वसई विरार शहरात मागील वर्षी ७१ अनधिकृत शाळा आढळून आल्या होत्या. त्यातील ५८ शाळांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र गुन्हे दाखल झाल्यानंतर ही काही शाळा अजूनही सुरूच आहे. आता आढळून आलेल्या अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे वसईच्या शिक्षण विभागाने सांगितले आहे.
केंद्र निहाय अनधिकृत शाळा
पेल्हार – ६६, कामण- ३, विरार- २ , दहिसर- ०७, बोळींज ३, मालजीपाडा- ९ , कळंब – ७