वसई: वसई किनाऱ्यापट्टीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी चार ठिकाणी धूपप्रतिबंधक बंधारे तयार केले जाणार होते. मात्र आराखडा मंजुरी व किनारपट्टी नियमन क्षेत्र (सीआरझेड) अशा विविध परवानग्या मिळाल्या नसल्याने धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

वसई पश्चिमेच्या भागाला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. या किनार पट्टीच्या भागात मोठ्या संख्येने नागरिकांची वस्ती आहे. तर दुसरीकडे किनाऱ्याच्या लगतचा परिसर हा सुरुच्या बागा, किनारी वनस्पती अशा वैविध्यपूर्ण निसर्गसंपदेने नटलेला आहे. या समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र या समुद्र किनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारा नसल्याने किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच यामुळे किनाऱ्यालगत असणारी शेतीही धोक्यात आली आहे.

पावसाळ्यात येणाऱ्या उधाणाच्या भरतीवेळी या किनारपट्टीच्या भागात मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळतात याचाच फटका हा किनाऱ्यालगत असलेल्या घरांना बसतो. तसेच यामुळे येथील निसर्गसंपदेचे ही मोठे नुकसान होत आहे. दुसरीकडे बंधारा नसल्याने पाणी थेट किनाऱ्यावरील विविध भागात जाते. यामुळे किनाऱ्यावरील घरे, शेती, बागायती , वाळत ठेवलेली मासळी यांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार नागरिक गेल्या अनेकवर्षांपासून करीत आहे.

या किनारपट्टीच्या भागाची होणारी धूप टाळण्यासाठी कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत भुईगाव, रानगाव, पाचूबंदर- लांगेबंदर, नवापूर अशा चार समुद्र किनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधारे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ३० कोटींचा निधी ही मंजूर आहे. मात्र दोन ते तीन वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही या कामाला सुरुवात झाली नाही.

त्यामुळे हे धूपप्रतिबंधक बंधारे तयार होणार तरी कधी असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. मंजुरीनंतरही काम पूर्ण होत नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात सुरुच्या बागांसह नागरिकांचे मोठे नुकसान होते तरी सुद्धा याकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नाही असे पर्यावरण अभ्यासक मॅकेन्झी डाबरे यांनी सांगितले आहे.

कामासाठी डिसेंबरचा मुहूर्त ?

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या मार्फत धूपप्रतिबंधक बंधारे उभारणीचे काम केले जाणार आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाने मे.डी. व्हि.पी. इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा.लि. या कंत्राटदाराच्या न्यूनतम प्रस्तावास मंजूरी प्राप्त झाली होती. त्यानंतर आता सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन यांच्या कडून सागरी पूरसंरक्षक बांधाचा आराखडा मंजूर करून घेण्यात आला आहे असे रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सारंग इनामदार यांनी सांगितले आहे. मात्र किनारपट्टी नियमन क्षेत्राची (सीआरझेड) परवानगी अजूनही मिळाली नाही. त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. डिसेंबरपर्यंत या परवानग्या मिळतील आणि त्यानंतरच धूपप्रतिबंधक बंधारे उभारणीची प्रक्रिया केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे.

अजून किती झाडांचा बळी देणार ?

आधीच विविध प्रकारच्या अतिक्रमण यामुळे वसईचा हरित पट्टा नष्ट झाला आहे. किनाऱ्याची सुरक्षा भिंत म्हणून काम करणाऱ्या सुरुच्या बागा ही नष्ट होऊ लागल्या आहेत. भुईगावसह अन्य किनार भागात लाटा व वादळी वाऱ्यामुळे हजारो सुरुची झाडांची पडझड झाली आहे.अजूनही पडझड सुरूच आहे ती थांबविण्यासाठी धूपप्रतिबंधक बंधारे आवश्यक आहेत अशी प्रतिक्रिया पर्यावरण प्रेमींनी दिली आहे. मात्र प्रशासनाची उदासीनता लक्षात घेता अजून किती झाडांचा बळी देणार असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा

२०२३ साली उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देऊन बंधाऱ्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केली होती. याबाबत अजित पवार यांनी ऑगस्ट २०२३ मध्येच वसईसह पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर धूपप्रतिबंधक कामांसाठी निधी मंजूर केला होता. या रखडलेल्या कामांच्या संदर्भात वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून कामांना गती देण्याची करण्यात आली होती.मात्र त्यानंतरही विविध परवानग्या मिळत नसल्याने हा प्रकल्प रखडलेले आहेत.