वसई : गणेशोत्सवात विसर्जनादरम्यान तयार होणाऱ्या निर्माल्यापासून खतनिर्मिती केली जाणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात पालिका क्षेत्रात सुमारे ९ हजार ८५० किलो इतके निर्माल्य गोळा झाले असून त्यापासून खतनिर्मिती करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे.

मागील वर्षपासून वसई विरार महापालिकेने गणेशोत्सव हा पर्यावरण पूरक साजरा करण्यावर भर दिला आहे. यंदाही पालिकेने कृत्रिम तलाव, फिरते हौद याशिवाय निर्माल्या संकलन करून त्यातून खतनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता.शहरात गणेशोत्सव काळात विसर्जनादरम्यान मोठ्या प्रमाणात हारफुलांचे, केळीचे खांब व इतर साहित्य असे निर्माल्य तयार होत असते. सुरवातीला

हे निर्माल्य नागरिक तलवात, समुद्रात, नदी, खाड्या अशा ठिकाणी टाकून देत होते. तर कधी कधी प्लास्टिक पिशव्या ही निर्माल्या सोबत टाकल्या जात होत्या. यामुळे प्रदूषण निर्माण होते. असे प्रकार रोखण्यासाठी पालिकेने विसर्जना दरम्यान निर्माण होणारे निर्माल्य एकत्रित संकलित करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी विसर्जनाच्या प्रत्येक निर्माल्य टाकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. दीड, पाच सहा, दहा अशा गणेशविसर्जना दरम्यान शहरातील विविध ठिकाणच्या भागात मिळून ९ हजार ८५० इतके निर्माल्य गोळा झाले आहे.

या निर्माल्याचे वर्गीकरण करून त्यापासून खत निर्मिती

प्रक्रिया सुरू केली आहे.यासाठी महिला बचत गट व सामाजिक संस्था यांची मदत घेऊन खतनिर्मिती केली जाणार आहे. कंपोस्ट खत आणि गांडूळ खत तयार करण्यात येत आहे. तसेच गरजेनुसार पालिकेच्या उद्यानांमध्ये त्याचा वापर करण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले.

“निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याचा प्रयोग सलग ३ वर्षे यशस्वी झाल्याने यंदाही खतनिर्मिती करण्यात येत आहे. यावर्षी नऊ हजार किलोहून अधिक निर्माल्य गोळा झाले असून त्यातून खतनिर्मिती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.” – अर्चना दिवे, उपायुक्त, वसई-विरार महापालिका.