वसई: श्री गणेशाची मूर्ती अधिकच सुबक दिसावी यासाठी गणेश मुर्त्यांना पैठणी फेटे, पगडी, धोतर व हिरेजडीत सजावटीचा साज चढविला जात आहे. विशेषतः अशा गणेशमूर्तींना ग्राहक चांगलीच पसंती देऊ लागले आहेत.
२७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यानिमित्ताने वसई विरार मधील विविध ठिकाणच्या चित्रशाळेत गणेशमूर्तींना तयार करण्याच्या व रंगरंगोटी करण्याचे कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. श्रीगणेशाची मूर्ती अधिकच आकर्षक वाटावी यासाठी ग्राहकही आता फेटे, धोतर व पगडी तसेच हिऱ्यांची सजावट करवून घेत आहेत.
महाराष्ट्रात फेटा रुबाबदारपणाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. याच फेट्यांचा वापर गणेशाला सजविण्यासाठी सुद्धा केला जात आहे. पैठणी, जरीचे कापड असे रंगेबेरंगी कापड घेऊन गणेशमूर्तींना फेटे बांधले जात आहेत. यात तुरा असलेले फेटे, गोलाकार कलाकृतीतील श्रीकृष्ण फेट्यांच्या सजावटीकडे कल अधिकच असल्याचे कलाकारांनी सांगितले आहे. तर दुसरी विविध रंगाचे धोतर नेसविले जात आहे.
सिल्क शाईन कापड घेऊन पगडी सुद्धा बांधली जाऊ लागली आहे. आता केवळ रंगरंगोटी केलेल्या मूर्तींना ऐवजी हिऱ्यांची व फेट्यांची सजावट केलेल्या गणेशमूर्तींना अधिक मागणी असल्याचे कलाकारांनी सांगितले आहे. गणपती रंगरंगोटी व इतर सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत. जी काही कामे बाकी आहेत ती दिवस रात्र बसून पूर्ण करीत आहोत. तर दुसरीकडे फेट्यांची व हिरे लावण्याची कामे ही सुरू आहेत असे मूर्तिकार प्रेमेश पाटील यांनी सांगितले आहे.
हिऱ्यांची सजावट
तसेच गणेशाची मूर्ती अधिक सुबक दिसावी यासाठी फेट्यांसोबतच मूर्तींना हिऱ्यांची सजावट केली जात आहे. अशा मूर्तींनाही ग्राहकांनी चांगली पसंती दिली आहे. गणेशाच्या डोक्यावरील मुकुट, गळ्यातील कंठी व इतर आभूषणे, हातातील कडे अशी सर्व सजावट हिरे मोती यांनी केली जात आहे. हिरे लावताना अधिकच लक्षपूर्वक काम करावे लागत आहे. एका मूर्तीची सजावट करताना जवळपास चार ते पाच तास इतका वेळ जातो असे कलाकारांनी सांगितले आहे.
गणेशमूर्तींच्या किंमतीत वाढ
वसई विरार शहरातही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतो. मागील काही वर्षांपासून गणेशमूर्तींना संख्या वाढत आहे. अनेकजण दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस व दहा दिवस अशा स्वरूपात गणपतीची प्राणप्रतिष्ठा करीत असल्याने गणेशमूर्तींना मागणी वाढू लागली आहे. शहरातील अनेक ठिकाणच्या चित्रशाळेत ८० टक्क्यांहून नोंदणी पूर्ण झाली आहे. तसेच यावर्षी मूर्तींच्या किंमती या पाचशे ते सहाशे रुपयांनी वाढल्या असल्याचे कलाकारांनी सांगितले आहे.