वसई : वसई विरार महापालिकेने पत्रकारांच्या मालमत्ताकराची थकबाकी असल्याची चुकीची यादी प्रसिध्द केल्याचे तीव्र पडसाद पत्रकारांमध्ये उमटले. बुधवारी शहरातील पत्रकारांनी दोन तास पालिका मुख्यालयाबाहेर काळ्या फिती लावून ठिय्या आंदोलन केले. अखेर अतिरिक्त आयुक्तांनी पत्रकारांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली आणि झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. वसई विरार मधील पत्रकारांनी एकत्र येऊन आपल्या आत्मसन्मानाचा हा लढा यशस्वी करून दाखवला.
वसई विरार महापालिकेने मालमत्ता कराची थकबाकी दाखविणारी पत्रकारांची यादी तयार केली होती. ही यादी समाजमाध्यमांवर वायरल झाली होती. ज्या पत्रकारांनी मामलत्ता कराचा भरणा केला आहे त्यांची नावे त्यात होती. याशिवाय ज्या मालमत्ता पत्रकारांच्या नाही त्या देखील पत्रकारांच्या दाखविण्यात आली होती. त्यामुळे समाजात पत्रकारांबाबत चुकीचा संदेश गेला आणि बदनामी झाली होती. याचा निषेध करण्यासाठी बुधवारी सर्व पत्रकारांनी पालिका मुख्यालयावर आंदोलन केले. सर्व पत्रकारांच्या संघटना, स्थानिक वृत्तपत्रे, युट्यूब चॅनेल्सचे पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काळ्या फिती लावून पालिकेच्या या कृतीचा निषेध करण्यात आला.
दुपारी १२ पासून हे आंदोलन सुरू होते. पोलिसांनी मुख्यालयाचे प्रवेशद्वार बंद केल्याने पत्रकारांनी प्रवेशद्वाराबाहेरच ठिय्या आंदोलन केले. उपायुक्त (आस्थापना) सदानंद गुरव आणि उपायुक्त समीर भूमकर (कर) यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला आयुक्तांच्या दालनात जाऊन चर्चा करण्याचा आग्रह केला. मात्र तो पत्रकारांनी फेटाळून लावला. जो पर्यंत आयुक्त वा तत्सम अधिकारी येत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी कडक भूमिका पत्रकारांनी घेतली.
महापालिकेकडून दिलगिरी
अखेर अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी खाली येऊन पत्रकारांशी चर्चा केली. कुठल्या नियमांच्या आधारे यादी बनवली? अन्य अधिकारी, राजकारणी, बिल्डर यांची यादी का नाही बनवली? पत्रकारांची वैयक्तिक माहिती कशी जाहीर केली? चुकीच्या मालमत्ता का दाखवल्या? अशा प्रश्नांची सरबत्ती यावेळी पत्रकारांनी केली.
ही यादी अधिकृतपण प्रसारीत केली नसल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सांगितले. पत्रकारांची बदनामी करण्याचा उद्देश नाही तसेच महापालिका पत्रकारांच्या विरोधात नाही असे त्यांनी स्पष्ट केले. अधिकाअधिक कर संकलन व्हावे यासाठी सर्वांच्या याद्या प्रसिध्द केल्या असल्याचा दावा त्यांनी केला. पत्रकारांच्या यादीत चुकीची माहिती गेली असल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. यापुढे अशी चूक होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर दोन तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले.
पत्रकारांनी दाखवली एकजूट
या आंदोलनातून पत्रकारांनी आपली एकजूट दाखवून दिली. सर्व पत्रकार या आंदोलनाला उपस्थित राहिले. ज्यांना वैयक्तित कारणांमुळे येणे शक्य झाले नाही त्यांनी देखील आपला पाठिंबा दर्शवला. आंदोलनाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागले नाही. शांततेच्या मार्गाने आणि लोकशाही पध्दतीने आंदोलन पार पडले.