वसई: वसई विरार शहरातील तलावांमध्ये वाढते प्रदूषण हि एक गंभीर समस्या बनली असताना नागरिकांकडून तलावात विसर्जित केल्या जाणाऱ्या निर्माल्यामुळे यात अधिकच भर पडली आहे. प्लास्टिक पिशव्यांसह तलावात विसर्जित केले जाणारे हार, फुले आणि इतर पूजा साहित्य कुजत असल्यामुळे तलावातील पाण्याची गुणवत्ता ढासळत आहे.तर दुसरीकडे तलावातील जैवविविधतेवरही याचा विपरीत परिणाम होत आहे.
वसई विरार शहरात शंभरपेक्षा जास्त जुने आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेले तलाव आहेत. मात्र गेल्या काही काळात या तलावाच्या आसपास झालेले अतिक्रमण, तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी, रस्त्यालगतच्या तलावात नागरिकांकाडून टाकण्यात येणारा कचरा, तसेच स्वच्छतेअभावी तलावात वाढणारी जलपर्णी यामुळे हे तलाव प्रदूषित झाले आहेत. तर नागरिकांकडून तलावात विसर्जित केल्या जाणाऱ्या निर्माल्यामुळे हि समस्या अधिकच बिकट बनली आहे.
वसई विरार शहरात कामण, चुळणे, माणिकपूर, गोखीवरे, आचोळे, पापडी, तामतलाव अशा विविध ठिकाणी मोठे तलाव आहेत. यापैकी काही तलाव हे रस्त्यालगत तर काही तलाव लहान मोठ्या मंदिराच्या जवळ आहेत. त्यामुळे रस्त्यावरून येता-जाता, तर काहीवेळा तलवानजीकच्या मंदिरात येणारे भाविक या तलावातच निर्माल्य टाकतात.
हार, फुलं, नारळ असे निर्माल्य प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळून नागरिकांकडून तलावात टाकण्यात येते. तर अनेकदा यात देवाच्या मूर्ती, तसबीरींचाही समावेश असतो. तलावात टाकण्यात येणाऱ्या या निर्माल्याचे नीट विघटन होत नसल्याने ते तलावात साचून राहते. यामुळे तलावातील पाणी प्रदूषित होऊन जैवविधतेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेकडून या तलावांच्या संवर्धनासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
तलावांच्या स्वच्छता करण्याचे काम घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून केले जाते. तलाव स्वच्छ राहावीत यासाठी त्यातील गाळ काढणे व त्यांची स्वच्छता करण्यासाठी प्रस्ताव तयार केला जात आहे असे उद्यान विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी सांगितले आहे. तलावात नागरिकांनी सुद्धा कोणत्याप्रकारचा कचरा व निर्मल्य टाकू नये असे आवाहन ही त्यांनी नागरिकांना केले आहे.
निर्माल्य कलशांची उपेक्षा
तलावातील निर्माल्य विसर्जन थांबवण्यासाठी पालिकेने विविध ठिकाणी निर्माल्य कलश उपलब्ध करून दिले आहेत. परंतु, नागरिकांकडून या कलशांऐवजी थेट तलावात किंवा वाहनातून जाताना तलावाच्या आवारात निर्माल्य भिरकावण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे निर्माल्य कलशांजवळ आणि तलावांच्या काठावर निर्माल्याने भरलेल्या पिशव्यांचा खच पडलेला दिसून येतो.
सुशोभीकरणामुळे संवर्धनाकडे दुर्लक्ष?
वसई विरार शहरात महापालिकेकडून शहरातील तलावांच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. कॉंक्रिटीकरण तसेच भराव टाकून तलावात बांधकाम केले जात आहे. पण, सुशोभीकरण करत असताना तलावातील निर्माल्य, शेवाळे, जलपर्णी तसेच तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी, गटाराचे पाणी यामुळे प्रदूषित होणाऱ्या तलावांकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.