वसई : – वसई विरार शहरात गणेशोत्सवापूर्वी शहरातील खड्डे दुरूस्त करण्याचा दावा पालिकेने केला होता. मात्र गणेशोत्सव सरत आला तरीही अजूनही शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यावर खड्ड्यांची समस्या कायम राहिली आहे. त्यामुळे पालिकेनकडून करण्यात आलेला खड्डे दुरुस्ती करण्याचा दावा फोल ठरला असल्याचे दिसून येत आहे. तात्काळ खड्डे दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पावसामुळे वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. या खड्ड्यामुळे वाहनचालकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. तर काही वेळा या खड्ड्यामुळे अपघाताच्या घटना ही घडत आहेत. खड्डे बुजविण्याची मागणी सातत्याने नागरिकांमधून करण्यात येत आहे. विशेषतः गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील, अशी घोषणा पालिकेकडून करण्यात आली. त्यानुसार पालिकेने विविध ठिकाणी खडीकरण, डांबरीकरण करून खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले होते.

मात्र हे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार पालिकेने केला होता. मात्र शहरातील बहुतांश भागातील खड्डे गणेशोत्सवा पूर्वी न बुजविल्याने गणपतीचे आगमन हे खड्डेमय रस्त्यांतून झाले होते. त्यानंतर दीड दिवस, पाच दिवस व सात दिवस या गणपतीचे विसर्जन मिरवणूक ही खड्डेमय रस्त्यातून न्यावी लागत असल्याने अडचणी निर्माण झाल्या असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

आता गणेशोत्सव सरत आला तरीही अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही त्यामुळे पालिकेने गणेशोत्सवापूर्वी केलेला खड्डे दुरूस्तीचा दावा फोल ठरला असल्याची टीका शहरातील नागरिकांनी केली आहे. गणेशोत्सवाआधी रस्त्यांवर पालिकेकडून डागडुजी करण्यात आली असली तरीही अनेक ठिकाणी अजूनही खड्डे आहेत. काही ठिकाणी तात्पुरते खडीकरण केले आहे. पावसात खडी वाहून जाऊन त्याठिकणी चिखल निर्माण होतो. मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर डागडुजी करण्यात आली आहे. मात्र शहरातील अनेक जोड रस्ते अजूनही डागडुजीविनाच आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

दुरुस्तीनंतर उंचवटे

खड्डे बुजवताना अनेक ठिकाणी उंचवटे तयार झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना रात्रीच्या वेळी वाहने चालविताना मोठीच कसरत करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. ठरविक काळाने रस्त्यातील खड्डे बुजविले जाताना त्यामुळे कुठे उंचवटा तर कुठे खोलगट भाग तयार होतो. यामुळे अपघाताच्या शक्यता निर्माण होतात. विशेषतः दुचाकीचालकांना गाडी चालविताना हे उंचवटे लक्षात येत नाहीत. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बुजविलेले खड्डेच आता डोकेदुखी ठरत आहे. रस्ता दुरुस्ती करताना असे उंचवटे तयार होणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी अशी मागणी आता नागरिक करत आहेत.

पावसाचे अडथळे

खड्डे दुरुस्तीचे काम पालिकेने युद्धपातळीवर सुरू केले होते. जवळपास ७० टक्क्यांहून अधिक ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले तर अजूनही खड्डे दुरुस्तीची कामे सुरूच आहेत. मात्र सतत पाऊस सुरू असल्याने अशा पावसात खड्डे दुरुस्ती करताना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले आहे.

अनंत चतुर्दशीपर्यंत रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी

गणपतींचे आगमन खड्डेमय रस्त्यातून करावे लागल्याने नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. अजूनही शहरात मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत त्यामुळे आता अनंत चतुर्दर्शीच्या विसर्जन मिरवणुकांसाठी रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी अनेक राजकीय पक्षांकडून आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.