वसई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडी यांनी एकत्र येत निवडणूक आयोगाच्या विरोधात ‘सत्याचा मोर्चा’ पुकारला आहे. चर्चगेट येथे हा मोर्चा सुरु आहे. राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते या मोर्च्यात सामील होत असताना वसई विरारमधूनही हजारोंच्या संख्येने शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आज मोर्च्यात सामील झाले आहेत.

मतदार याद्यांमध्ये झालेल्या कथित गोंधळावरून विरोधकांनी निवडणूक आयोगाला घेरले आहे. महाविकास आघाडी आणि मनसेचा आरोप आहे की, मतदार याद्यांमध्ये अनेक चुका आहेत. काही मतदारांची नावे एकाच वेळी दोन ठिकाणी आहेत, अनेक नागरिकांची नावे यादीतून गायब झाली आहेत, तर काही ठिकाणी जिवंत व्यक्तींच्या नावापुढे मृतांची नोंद करण्यात आली आहे.

या सर्व कथित गैरव्यवहाराच्या विरोधात आज मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढण्याची घोषणा करण्यात आली होती. हा मोर्चा दुपारी १ वाजता चर्चगेट येथील फॅशन स्ट्रीट येथून सुरू होणार असून, मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत जाणार आहे.

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना या मोर्चात मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार राज्याच्या विविध भागातून कार्यकर्ते चर्चगेट परिसरात पोहोचत आहेत. वसई-विरारमधूनही शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेचे शेकडो कार्यकर्ते आजच्या मोर्चात सामील झाले आहेत.

मोर्चाबद्दल बोलताना वसई तालुका प्रमुख प्रथमेश राऊत म्हणाले की, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे या मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. हा ‘सत्याचा मोर्चा’ खऱ्या मतदारांचा आहे. हा मोर्चा सत्तेसाठी नसून, केवळ सत्यासाठी आहे.”

गर्दी टाळण्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास

वसई-विरार शहराच्या अंतर्गत मार्ग आणि महामार्गांवरील संभाव्य वाहतूक कोंडी (Traffic Jam) लक्षात घेऊन, शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लोकल ट्रेनचा पर्याय निवडला. सकाळी १० ते १२ वाजेदरम्यानच्या लोकल गाड्यांनी हे सर्व कार्यकर्ते चर्चगेट स्थानकात पोहोचले आणि मोर्चात सहभागी झाले आहेत.