वसई :- मराठीच्या मुद्द्यावर विरार मधील परप्रांतीय रिक्षाचालकाला मारहाण करणार्‍या ११ जणांवर विरार पोलीस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

मागील आठवड्यात विरार मध्ये राजू पटवा या रिक्षाचालकाने एक महिलेशी असभ्य वर्तन करत तिच्या भावाला मारहाण केली होती. यावेळी पटवा याने मग्रूरी दाखवत मराठी भाषेत बोलणार नाही असे सांगत मराठी बद्दल आणि महाराष्ट्राबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं होतं. त्याची चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित झाली होती. त्यामुळे संतापाची लाट पसरली होती. या रिक्षाचालकाचा विरार मधील शिवसैनिक शोध घेत होते. अखेर शनिवारी संध्याकाळी हा रिक्षाचालक सापडला. त्याला भर रस्त्यात कार्यकर्त्यांनी चोप दिला. ज्या महिलेशी असभ्य वर्तन केले होते त्या महिलेचेही माफी मागायला लावली. या मारहाणीची चित्रफित समाजमाध्यमावर टाकण्यात आली होती. मारहाण करणार्‍यांध्ये शिवेसना ठाकरे गटाचे शहरप्रमुख उदय जाधव यांच्यासह शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते हजर होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या मारहाण प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांविरोधात बेकायदेशीररित्या जमाव, सार्वजनिक शांततेचा भंग करणे, दंगल माजविल्याप्रकऱणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९ (२), १९०, १९१(२), ११५ (२), ३५१(२) १२६ (२) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३७ (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आम्ही आरोपींना नोटीस दिली असून पुढील चौकशी केली जात आहे अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी दिली. गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख उदय जाधव, साधी जाधव तसेच मनसे पक्षाचे जय जैतापकर, रोशनी जाधव आदींचा समावेश आहे.