विरार : पश्चिम रेल्वेचे वैतरणा रेल्वे स्थानक अखेर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी वैतरणा स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी करण्यात येत होती. यामुळे आता वैतरणा स्थानकावरील हालचालींवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे.

वसई लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या अखत्यारित मीरा रोड ते वैतरणा अशा ७ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. वैतरणा वगळता इतर सहा रेल्वे स्थानकावर यापूर्वीच रेल्वेकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र वैतरणा स्थानकात सीसीटीव्ही नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. याबाबत डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेकडून सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. अखेर संस्थेच्या आणि प्रवाशांच्या मागणीला यश आले असून रेल्वे प्रशासनाकडून स्थानकात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.

वैतरणा रेल्वे स्थानकातून मोठ्या संख्येने प्रवासी दैनंदिन प्रवास करत असतात. या स्थानकात अनेकदा मोबाईल चोरी, छेडछाड, सोनसाखळी चोरी, मारहाण तसेच अनेक घटना घडत असतात. इथून पुढे अशा घटनांवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. यामुळे एखादा गुन्हा घडल्यास त्यावर तपास करण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्हीची मदत होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी वैतरणा स्थानकात सीसीटीव्ही लावण्यात यावेत अशी मागणी आम्ही करीत होतो. अखेर रेल्वे प्रशासनाने या स्थानकात सीसीटीव्ही लावले आहेत यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला महत्व दिले गेले आहे असे डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष सतिश गावड यांनी सांगितले आहे