परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

डहाणू : तलासरी तालुक्यातील कुर्झे धरण भरण्याच्या मार्गावर असल्यामुळे परिसरातील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणाने ६५.६३ मीटर संचय पातळी गाठली असून मुसळधार पावसात ही पातळी  ६७.०० मीटरवर गेल्यास धरणाचे दरवाजे उघडावे लागणार आहेत.

तलासरी तालुक्यात विरोळी नदीवर  कुर्झे हे मातीचे धरण असून मुसळधार पावसामुळे त्याची पाण्याची पातळी वाढली आहे.  अतिवृष्टी झाल्यास धरणाची सुरक्षितता आणि पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी धरणाचे पाणी वक्रद्वाराद्वारे सोडावे लागणार आहे. कुर्झे धरणास तीन वक्रद्वारे आहेत. वक्रद्वारे उघडल्यावर विरोळी नदीला पूर व पाण्याची पातळी उच्चतम झाल्यावर महापूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नदीच्या दोन्ही तीरांवर व परिसरात  राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती  निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण महाजन यांनी दिली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने  तलासरी तालुक्यातील कुर्झे, वरखंडा, वडवली, सवणे, कवाडा, झरी, गीरगाव तसेच डहाणू तालुक्यातील दापचरी, वंकास या ग्रामपंचायतींना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.