20 October 2020

News Flash

‘बदलापूर’ मध्यमवर्गीयांसाठी आदर्श वसाहत

पूर्वी मुंबई-ठाण्याला ये-जा करण्यासाठी बदलापूरकरांना उपनगरी रेल्वेशिवाय अन्य कोणताही पर्याय नव्हता.

दिवसेंदिवस विस्तारीत असलेल्या महामुंबईच्या परिघाचा नवा केंद्रबिंदू अशी ओळख       असलेल्या बदलापूरची गेल्या दहा-बारा वर्षांतील वाटचाल स्तिमित करणारी आहे. कारण दशकभरापूर्वी एक छोटे गाववजा शहर अशी ओळख असलेले बदलापूर आता मध्य रेल्वे मार्गावरील नवे महानगर म्हणून उदयास येत आहे. मुंबई-ठाण्यातील घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यानंतर कनिष्ठ आणि मध्यमवर्गीयांना किफायतशीर घरांसाठी अंबरनाथ, बदलापूरशिवाय अन्य फारसे पर्याय उरलेले नाहीत. एककाळ असा होता की, घरांच्या बाजारात बदलापूरचा पर्यायअगदी शेवटी होता. मात्र अवघ्या गेल्या १५ वर्षांत परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला. आता मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरातील घराच्या शोधात असलेली ७० टक्के कुटुंबे सर्वात आधी बदलापूरचे पर्याय पाहतात. त्यामुळेच गृहनिर्माण क्षेत्रात मंदी असो वा तेजी बदलापूरमधील घरांना कायम मागणी असते.

मात्र केवळ तुलनेने स्वस्त किंवा किफायतशीर दरात उपलब्ध आहेत म्हणून येथील घरांना मागणी आहे, असे म्हणता येणार नाही. गेल्या दहा वर्षांच्या काळात शहरात उपलब्ध झालेल्या पायाभूत सुविधांमुळेही ग्राहकांनी बदलापूरला पसंती दिली आहे. केवळ गरज म्हणून नव्हे, तर गुंतवणूक म्हणूनही बदलापूरचे गृहनिर्माण क्षेत्र फायद्याचे ठरले आहे.

पूर्वी मुंबई-ठाण्याला ये-जा करण्यासाठी बदलापूरकरांना उपनगरी रेल्वेशिवाय अन्य कोणताही पर्याय नव्हता. मात्र आता चौपदरी रस्त्याने बदलापूर मुंबईला जोडले गेले आहे. काटई ते चौक रस्तारुंदीकरणामुळे अंबरनाथ, बदलापूर मुंबईच्या अधिक जवळ आले आहे. मुंबई-ठाण्याप्रमाणेच नाशिक आणि पुणे या शहरांनाही बदलापूरहून जाणारे चौपदरी रस्ते होत आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी शासनाने कोटय़वधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून त्याची कामे प्रगतिपथावर आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख महानगरांना बदलापूरशी जोडणारे हे सर्व रस्ते टोल फ्री आहेत.

पाण्याच्या बाबतीत बदलापूर पूर्वीपासून श्रीमंत होते. ‘२४ तास पाणी, भरपूर मोकळी जागा आणि शुद्ध हवा’ अशी एकेकाळी या शहराची ख्याती होती. आता वाढत्या नागरीकरणामुळे हे चित्र काही प्रमाणात बदलले असले तरी ठाणे जिल्ह्य़ातील इतर शहरांच्या तुलनेत बदलापूर पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेबाबत निश्चितच उजवे आहे. वितरणाच्या समस्येमुळे शहरातील काही भागात पाणीटंचाई भेडसावत असली तरी आता ते दोष काढून टाकून पाणीपुरवठा सुरळीत केला जात आहे. त्यासाठी शहरात ठीकठिकाणी पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्य़ाची जीवनवाहिनी मानली जाणारी उल्हास नदी बदलापूर शहराजवळून वाहते. बदलापूर शहराला चार किलोमीटर लांबीचा नदीकिनारा लाभला आहे. याच नदीवरील बॅरेज या ब्रिटिशकालीन बंधाऱ्यातून शहरास पाणीपुरवठा केला जातो. शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या भोज धरणातून बदलापूर शहरास पाणीपुरवठा करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. शहराच्या भविष्यकालीन पाणीपुरवठय़ासाठी इंदगाव आणि शिरगांव येथे छोटी धरणे बांधायची योजना आहे. बदलापूरच्या वेशीवर असलेल्या बारवी धरणाच्या विस्तारीकरणाचा पहिला टप्पा येत्या पावसाळ्यात पूर्ण होणार आहे. यंदाच्या वर्षी धरणातील जलसाठा ४० टक्क्य़ांनी वाढणार असल्याचे अलीकडेच एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पुढील दोन वर्षांत या धरणात सध्यापेक्षा दुप्पट जलसाठा होऊ शकणार आहे. बारवी विस्तारीकरणामुळे ठाणे जिल्ह्य़ातील शहरांना एक नवे धरणच उपलब्ध होईल. त्यातून इतर सर्व शहरांप्रमाणेच बदलापूरलाही अतिरिक्त पाणीपुरवठा होऊ शकणार आहे. ठाणे जिल्ह्य़ातील इतर कोणत्याही शहरांकडे एवढय़ा प्रमाणात जलस्रोत नाहीत. त्यामुळे बदलापूर शहराला पुढील किमान ३० वर्षे पाण्याची चिंता भेडसावणार नाही, असे स्थानिक आमदार किसन कथोरे अतिशय आत्मविश्वासाने सांगतात.

मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे आणि डोंबिवलीप्रमाणेच एक सांस्कृतिक शहर अशी बदलापूरची ओळख आहे. वर्षभर शहरात ठीकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. काका गोळे फाऊंडेशनने शहरातील सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. किफायतशीर दरात पॅथॉलॉजी लॅब, वैद्यकीय उपचार उपलब्ध करून सार्वजनिक आरोग्यसेवेचे एक चांगले उदाहरण फाऊंडेशनने घालून दिले आहे. गेले वर्षभर ‘प्रतिभावंत बदलापूरकर’ हा उपक्रम शहरात राबविला जातोय. त्यात दर महिन्याला शहरातील एका मान्यवर व्यक्तीशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. राज्य शासनाने शहरातील नाटय़गृहासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे बदलापूरमध्ये लवकरच सुसज्ज नाटय़गृह उभारले जाणार आहे. वेशीवरील ‘डी-मार्ट’ने शहरात मॉल संस्कृती आणली आहे. पूर्व विभागात नुकतेच भव्य स्टेडियम उभारले जाणार आहे. महापालिका होवो अथवा न होवो लगतची पाच गावे पालिका हद्दीत घेऊन लवकरच बदलापूर शहराचे विस्तारीकरण होणार आहे. या सर्व बाबींमुळेच कल्याणच्या पलीकडे बदलापूरच्या रूपाने आकारास येत असलेली चौथी मुंबई भविष्यात मध्यमवर्गीयांची आदर्श वसाहत म्हणून ओळखली जाईल, असे भाकीत शहर नियोजन क्षेत्रातील तज्ज्ञ वर्तवीत आहेत.

बदलापूरमध्ये सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमतींमध्ये अत्याधुनिक, सर्वसुविधांनी युक्त अशी घरे उपलब्ध होत आहेत. या घरांसोबत काही आकर्षक योजनाही घर खेरदी करणाऱ्या ग्राहकांसाठी योजल्या जात आहेत, त्या त्यांच्यासाठी फायदेशीरही ठरत आहेत. येथे उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे बदलापूरमध्ये घर घेण्याची हीच सुवर्णसंधी आहे.

मोहन थारवानी,  एमडी, थारवानी इंन्फ्रास्ट्रक्चर

मुंबईतील जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. मुंबईत घर घेणं हे सर्वसामान्यांच्या अवाक्यातली गोष्ट राहिलेली नाही. परिणामी बदलापूरमध्ये घर घेण्याचा लोकांचा कल वाढत आहे. बदलापूरही एक मोठे शहर म्हणूनच नावारूपाला येत आहे. येथे  चौपदरी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. दोन वर्षांत इथे मॉल्स, मल्टिप्लेक्स, कार्यालयांचे प्रमाण वाढेल. ‘डी-मार्ट’ने येथील लोकांना मॉल संस्कृतीची झलक दाखविली आहे. शिवशक्ती, श्रीजी निर्वाण, कल्पसिटी ही २२-२७ लाखांमध्ये वनबीएचकेची घरे उपलब्ध होत आहेत. स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हीच वेळ आहे, की त्यांनी बदलापूरमध्ये आपले घर घ्यावे. कारण भविष्यात बदलापूरमधील जागांची किंमतही वाढणार असल्याची चिन्हे आहेत.

दिनेश पंडय़ा, 5पी ग्रुप.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2016 1:07 am

Web Title: badlapur middle class colony
टॅग Badlapur
Next Stories
1 मोहजाल : स्वतंत्र कार पार्किंगचे!
2 उपराळकर पंचविशी : आदर्श सुंदरवाडी
3 उपराळकर पंचविशी : आदर्श सुंदरवाडी
Just Now!
X