‘संडास’ हा शब्दच उच्चारायला काहीतरी तुच्छता जोडलेली आहे. कोणी त्याचे बाथरूम केले, कोणी लू, कोणी हउ, कुठे लॅव्हेटरी शब्द आला, तर कुठे लॅट्रिन. कोणी रेस्टरूम, फ्रेश रूमदेखील म्हणायला लागले. संडास या शब्दाइतके हे शब्द अंगावर येत नाहीत. सॉफिस्टिकेटेड शब्द आहेत तसे आणि वेगळ्या भाषेतले शब्द आहेत. आपल्या भाषेत चारचौघांत उच्चारायला अवघड वाटणारे शब्द आपण इतर भाषांचा आधार घेऊन सहजपणे उच्चारत असतो. मनाला झालेली ही एक सवय असते. पण मनाला अशी सवय का होते, हा खरा प्रश्न आहे. त्याचे उत्तर शोधत गेले तर ‘टॉयलेट मॅनर्स’बद्दल बरेच काही भाष्य करता येते.

कशी असते आपली संडासाची खोली? सार्वजनिक सोयी- असल्याच तर- वास आणि घाणीनेच ओळखू येतात त्या जागा. त्याबद्दल खूप काही बोलण्या, मांडण्यासारखे आहे. पण ते जरा बाजूला ठेवू. आपल्या घरातल्या या सोयीबद्दल बोलू. आपल्या परिचितांच्या घरातल्या सोयी आणि त्या सोयी वापरायच्या वर्तनाचा आढावा घेऊ. बंद, छोटीशी, अंधारी, ‘चटकन ते उरकून यायचंय’ अशी ही जागा असते. काहींना ती घरात नकोच असते. घर एकीकडे, संडास दूर कुठेतरी. कुठे घराच्या बाहेरील बाजूने. घरात संडास ही गोष्ट तथाकथित फ्लॅट संस्कृतीने आणली. मग स्वयंपाक घरापासून जास्तीतजास्त दूर, देवघराच्या सोयीपासून जास्तीतजास्त दूर असे बघितले जाऊ  लागले. घराघरांत अघोषित वाळीत टाकलेली ही जागा असते. फ्लश- फरगेट, फ्लश- फरगेट. तिथे रेंगाळायच काय कारण? त्यामुळे, हायफाय घरं सोडली, तर आतले फिनिशिंग यथा तथाच असते. कुठे टाइल्सची टोकं खालीवर, कुठे तुटके, सोडलेले, कुठे तिरप्या तारप्या फिटिंग्स, कुठे मळकट-अंधारे सेट्रर, कुठे दारातून आत जायलाच इतकी कमी जागा की साधे दीड फुटांचे दार देखील पूर्ण उघडू शकत नाही. ते फोल्ड करून डोके चालवावे लागते. हात मोकळे वापरू शकत नाही. संडासाच्या भांडय़ावरच फरशी ठेवून त्यावरच उभं राहून अंघोळीची कोंदट खोली, असेही जागेच्या उपलब्धतेनुसार अनेक ठिकाणी दिसते.

बाहेरून कितीही पॉश, ऐसपैस हॉटेल असले, तरी त्यांचे टॉयलेट्स अतिशय घाणेरडे असतात. तसेच बाहेरून कितीही सुंदर घर बांधलेले असले, आत उंची फर्निचर असले, तरी संडासाची जागा अतिशय छोटी, अंधारी, नकोशी अशीच अनेक जागी दिसते. दारांच्या हँडल्सवर डाग, नळांना डाग, टाइल्स तुटलेल्या, सांधे खुले सोडलेले, दारं नकोशी झालेली, किरकिरणारी, रंग कुठे दिला, कुठे सोडून दिला, खिडकीचे फिनिशिंग नीट नाही, आडोसा कसाही अशी ही खोली असते. हाताशी असलेले पैसे, घेतलेले शिक्षण आणि टॉयलेट मॅनर्स, प्रसन्न उजेडी, साधेसे का होईना पण नेटके टॉयलेट यांचा संबंध असेलच असे नाही.

संडासाच्या सोयींबद्दल विषय निघाला की भारतीय भांडे श्रेष्ठ की कमोड भारी, यात तावातावाने चर्चा करणारे गट पडतात. ‘ती पाश्चत्त्य फ्याडं, आपले भारतीय भांडेच श्रेष्ठ’ असा एक गट असतो. पण ते त्यांचा त्यांना मान्य असलेला पर्यायदेखील स्वच्छ, कोरडा, प्रसन्न, उजेडी ठेवत नसतात. चटकन उरकून यायची खोली, असेच बघितले जाते संडासाकडे. या गटाला कमोड म्हणजे फक्त पैसे उधळणे, पाणी नासणे, सकाळचा कार्यभाग साधायला पुरेसे प्रेशर न येणे, यासाठीच माहीत करून घ्यायचा असतो. दुसरीकडे, कमोडवाला गट केवळ म्हातारपणी खाली बसता येत नाही, पाणी कमी फ्लश करणारे मॉडेल्स आलेत की आता बाजारात, इतकंच बोलताना दिसतो. भारतीय भांडे श्रेष्ठवाले तातडीने सार्वजनिक जागी तरी कमोड नकोच, लोक किती घाण करतात, कसे वापरायचे माहीत नसते, इन्फेक्शन होऊ  शकते या मुद्दय़ांनी हल्ला करून त्यांना गारद करून टाकतात. कमोड नेमका कसा वापरावा, हे अनेकांना नीटसे माहीत नसणे, यात तथ्य असतेच.

prachi333@hotmail.com