अरुण मळेकर arun.malekar10@gmail.com

मुंबईतील ग्रँट रोड – गावदेवी परिसरात पूर्वीच्या देसाई वाडय़ात गेटवे ऑफ इंडियाची प्रतिकृती आपले अस्तित्व सांभाळून आहे. निर्माण होणारी नियोजित वास्तू कशी असेल याची रूपरेखा समजण्यासाठी संकल्पचित्राबरोबर त्याची प्रतिकृती (Model’) बनविण्याची पद्धती बांधकाम क्षेत्रात प्रचलित आहे. गेटवे ऑफ इंडियाची ही प्रतिकृती नुसतीच प्रतीकात्मक आणि पोकळ नसून स्टँड स्टोननी तयार केल्याने वजनी आणि मजबूत आहे.

kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा

४० वर्षांपेक्षा जास्त काळ वेगवेगळ्या जगविख्यात सर्कशीत डझनभर वाघसिंहांच्या पिंजऱ्यात एकाकीपणे, कौशल्याने रिंगमास्टर म्हणून काम केलेल्या स्व. दामू धोत्रे यांनी निवृत्तीनंतर आपल्या घरी गाजवलेल्या धाडसी कामगिरीची आठवण म्हणून सर्कशीतल्या भल्यामोठय़ा पिंजऱ्याची प्रतिकृती उभारली होती.  मुंबई महानगरीची ओळख म्हणून सर्वश्रुत असलेल्या- ‘गेटवे ऑफ इंडिया’ ही अजरामर वास्तू उभारणीत ज्यांचा मोठा सहभाग होता त्या रावबहादूर यशवंतराव हरिश्चन्द्र देसाई यांनीसुद्धा गेटवे ऑफ इंडियाची प्रतिकृती आपल्या घराच्या प्रांगणात उभारण्यामागेही हीच भावना असावी.

असामान्य – अजरामर कलाकृतीची कल्पकतेने आराखडय़ानुसार ज्या जगविख्यात इमारती आपल्याकडे उभारल्या गेल्या त्यांच्या वास्तुरचनाकारांचे बरेच कोडकौतुक होऊन इतिहासात त्यांची दखल घेतली जाते, पण आराखडय़ानुसार या कलाकृतीला तितक्याच कल्पकतेने मूर्तस्वरूप देणारे स्वयंभू कलाकार तसे शापित यक्षच ठरलेत. स्व. रावबहादूर यशवंतराव हरिश्चंद्र देसाई हे त्यापैकी एक.

३१ मार्च १९११ ते ४ डिसेंबर १९२४ या कालखंडात अनेक स्थित्यंतरातून ‘गेट वे ऑफ इंडिया’ची जी उभारणी झाली त्याला तसा इतिहास आहे. इंग्रजी आमदानीत ब्रिटिश शहेनशहा पंचम जॉर्ज आणि त्यांची पत्नी राणी मेरी यांच्या सागरीमार्गे नियोजित भारतभेटीप्रीत्यर्थ अफाट समुद्रात भराव घालून ही वास्तू एक देखणी कलाकृतीची स्वागत कमान स्वरूप उभारली गेली. हेच ते मुंबईचे सागरी प्रवेशद्वार; पण याच भव्य वास्तूची महाकाय मुंबईतील गावदेवी मोहल्ल्यात चित्ताकर्षक प्रतिकृती आहे हे फारच थोडय़ा लोकांना ज्ञात आहे.

मुंबईतील ग्रँट रोड – गावदेवी परिसरात पूर्वीच्या देसाई वाडय़ात आता अनेकमजली इमारती उभ्या असल्या तरी ही प्रतिकृती आपले अस्तित्व सांभाळून आहे. कोणतीही वास्तू निर्माण करण्याआधी ती नियोजित वास्तू कशी असेल याची रूपरेखा समजण्यासाठी संकल्पचित्रांबरोबर त्याची लहानशी प्रतिकृती (Mode) बनवण्याची पद्धती बांधकाम क्षेत्रात प्रचलित आहे. ही प्रतिकृती तयार करण्यापाठीमागे कदाचित हाच उद्देश असावा असेही मानले जाते. गेट वे ऑफ इंडियाची ही प्रतिकृती नुसतीच प्रतीकात्मक आणि पोकळ नसून स्टँड स्टोननी तयार केल्याने मजबूत आणि वजनीही आहेच. मूळ गेटवे ऑफ इंडियाच्या बांधकामात वापरलेला खरोडी नावाने ओळखला जाणारा स्टँड स्टोन दगड वापरला गेला आहे. या दगडाचे वैशिष्टय़ म्हणजे कोणत्याही हवामानात हा दगड आपले अस्तित्व टिकवून अधिकाधिक मजबूत होत जातो.

मुंबईतील ग्रँट रोड – गावदेवी परिसरात जी भेंडी गल्ली आहे तेथील पूर्वीच्या देसाई वाडय़ाच्या आवारात ही प्रतिकृती आहे. तुळशी वृंदावनसदृश या शिल्पाच्या निर्मितीला तीन पिढय़ांचा काळ लोटल्यावरही गेटवे ऑफ इंडियाच्या मूळ इमारतीची कल्पना यायला खूपच आधारभूत ठरते. पाया, मध्य आणि घुमट अशा तीन भागांतून या प्रतिकृतीचे बांधकाम साधले आहे. सुमारे पाच फूट उंचीच्या प्रतिकृतीची निर्मिती करताना कमानमुक्त कलापूर्ण प्रवेशद्वारे, त्यावरील तितकेच आकर्षक नक्षीकाम आणि घुमट मूळ गेटवे ऑफ इंडियाच्या बांधकामाशी साधर्म्य साधणारे आहे; पण मूळ इमारतीची संपूर्ण प्रतिकृती यातून साकारलेली नाही. कारण त्याची एक दर्शनी बाजू ठळकपणे दिसते. काहीही असले तरी मूळ गेटवे ऑफ इंडिया वास्तू आणि त्याची प्रतिकृती निर्माण करणारे प्रतिभासंपन्न कलाकार एकच होते, ते म्हणजे रावबहादूर यशवंतराव हरिश्चंद्र देसाई. असामान्य कलाकृती निर्माण करणारी निसर्गदत्त देणगी लाभलेल्या रावबहादूर यशवंतराव देसाईंची पाश्र्वभूमी तथा नवनिर्मिती करणारा जीवनप्रवास समजावून घेणे आवश्यक आहे.

११ डिसेंबर १८७६ ही यशवंतराव देसाईंची जन्मतारीख. ग्रँट रोड – भेंडी गल्लीतील एका नोकरदार कुटुंबात त्यांचा जन्म झाला. दुर्दैवाने यशवंतराव दोन वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला; पण व्यवहारचातुर्य असलेल्या आई आणि काकांच्या मदतीने एल्फिस्टन मिडल स्कूलमधून प्रारंभीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण होताच त्यांचे आधारवड, मार्गदर्शक काका शाळिग्राम जगन्नाथ यांनी त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्यात (PWD) दरमहा दहा रुपये पगारावर नोकरीला लावले. याच वेळी अर्थार्जनाबरोबर त्यांचे शिक्षणही चालू होते. इ.स. १९०२ साली जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून आर्किटेक्चर एलिमेंट्री परीक्षेत गुणवत्ता प्रमाणपत्र त्यांनी प्राप्त केल्याने सार्वजनिक बांधकाम खात्यात यशवंतरावांना ‘ओव्हर सियर’ म्हणून पदोन्नती प्राप्त झाली.

कोणत्याही क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाला नशिबाबरोबर योग्य मार्गदर्शनाची संधी देणारा कुणी तरी योग्य माणूस यावा लागतो. यशवंतरावांकडे ही संधी चालून आली. त्यांच्या अंगच्या वास्तुरचनाकाराचे कौशल्य जाणून त्या काळचे मुंबई इलाख्याचे वास्तुविशारद अभियंता आणि सल्लागार जॉन बेग या दूरदृष्टीच्या ब्रिटिश अंमलदारांनी मुंबई परिसरातील काही महत्त्वाच्या कामांची जबाबदारी यशवंतरावांवर सोपवली. यशवंतरावांनी या संधीचे सोनेच करून टाकले. म्हणूनच अनेक बांधकामांत सहभागी  होण्याची संधी त्यांना चालून आली. गेटवे ऑफ इंडियाच्या नियोजित बांधकामाचा आराखडा ब्रिटिश वास्तुरचनाकार जॉर्ज विट्टेट यांनी तयार केला हे जरी सत्य असले तरी त्यांच्या कल्पनेतील जगप्रसिद्ध अशी ही वास्तू तयार करताना यशवंतरावांनी त्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.

ही सागरी मार्ग प्रवेशद्वाराची भव्य वास्तू उभारताना आधी समुद्रात भराव टाकून पायाभरणी केली. अहमदाबाद वास्तुशैलीचा प्रभाव असलेली ही वारसा वास्तू तयार होण्यासाठी एक तपाचा काळ गेला. गेटवे ऑफ इंडियासमोरील ताजमहाल हॉटेलनजीकच्या रस्त्याला रावबहादूर यशवंत हरिश्चंद्र देसाई यांचे नाव देऊन स्मृती जतन केली आहे.

गेटवे ऑफ इंडियाच्या बांधकामपाठोपाठ आजच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या इमारतीचा भव्य घुमट, जी.पी.ओ. इमारत, राजा शिवाजी वस्तुसंग्रहालय इमारत, रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, न्यू कस्टम हाऊस, जहांगीर आर्ट गॅलरी आणि जे. जे. कला महाविद्यालय या इमारती उभारणीत यशवंतरावांचा सहभाग जसा होता, तसेच पंचम जॉर्ज लॉर्ड हार्डिग यांच्या शिल्पाकृती निर्माण करण्यातही आपले कौशल्य त्यांनी पणाला लावले आहे. उपरोक्त भव्य इमारतीतील काही इमारतींना मूर्तस्वरूप देण्यात स्व. विठ्ठल सायन्ना या  माणसाचाही सहभाग वाखाणण्यासारखा आहे. गॉथिक वास्तुशैलीच्या प्रेमाने भारावलेल्या ब्रिटिश सत्ताधीशांनी काही वास्तू बांधकामात जसा स्थानिक बांधकाम शैलीचा मुत्सद्दीपणे समावेश केला, तसाच स्थानिक वास्तुरचनाकारांच्या कल्पकतेसह त्यांच्या कौशल्याचीही कदर करून योग्य ती दखल घेतली आहे. कलेची जाण ठेवून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणानुसार रावबहादूर, जस्टिस ऑफ पीस असल्या किताबांनी यशवंतरावांचा यथोचित गौरव केला गेला, तर इ.स. १९२३ मध्ये रॉयल सॅनेटरी इन्स्टिटय़ूट ऑफ लंडन या संस्थेचे सभासदत्व त्यांना बहाल केले. १९२४ साली इंडियन सव्‍‌र्हिसेस अँड इंजिनीअरिंगचे पदाधिकारी म्हणून निवड केली गेली.

सुमारे नऊ दशकांपेक्षा जास्त काळ ही देखणी प्रतिकृती रावबहादूर यशवंतराव देसाई यांची तिसरी पिढी अभिमानाने सांभाळतेय. या इतिहासाबरोबर वारसा वास्तूचेही मोल आहेच. एका नोकरदार मराठमोळ्या माणसाने गेटवे ऑफ इंडियासारखी जगविख्यात वास्तू उभारताना आपल्या अंगभूत कल्पकतेने जी कलाकृती साकारली त्याची दखल समाजमनात, तसेच शासनदरबारीही हवी तशी घेतली जात नाही.