News Flash

उद्यानवाट : कुंडीत झाडे लावताना..

ही लागवड करताना झाडांना किंवा त्यांच्या मुळांना फार इजा न पोहोचवता हे काम करावे लागते.

लागवड केलेले झाड पहिले २-३ दिवस सावलीतच ठेवावे. त्यानंतर त्याच्या ठरवलेल्या जागी ठेवावे.

मागील लेखात आपण कुंडीची निवड व ती कशी भरायची याविषयी माहिती घेतली. या लेखातून कुंडीत झाड लावण्याविषयी माहिती घेऊ या. नर्सरीमधून जेव्हा आपण झाडे आणतो तेव्हा ती साधारणपणे प्लॅस्टिकच्या पिशवीत असतात. या पिशवीतून त्यांची लागवड कुंडीत करायची असते. हे करण्यासाठी घरातील एखाद्या कोपऱ्यात किंवा बाल्कनीत प्लॅस्टिक पसरून त्यावर हे काम करावे. खत-मातीचे मिश्रण अंदाजाने आधीच बनवून ठेवावे. तसेच लागणारे इतर साहित्यही तयार ठेवावे (कुंडय़ा, कुंडय़ांखालील प्लेट, कटर किंवा ब्लेड, पाणी घालण्यासाठी झारी किंवा मग, इ.). त्यानंतर लागवड करायला घ्यावी.

ही लागवड करताना झाडांना किंवा त्यांच्या मुळांना फार इजा न पोहोचवता हे काम करावे लागते. सर्वात आधी ही पिशवी अलगदपणे काढायची असते. त्यासाठी चांगल्या ब्लेडचा किंवा कटरचा वापर करावा. ब्लेडच्या साहाय्याने उभ्या दिशेला वरून खाली पिशवीला काप द्यावा. पिशवी हाताने कधीही फाडू नये कारण हाताने फाडताना झाडांची मुळे ओढली जाऊ  शकतात किंवा झाडाच्या भोवती असलेली पिशवीच्या आकाराची माती (याला हंडी किंवा हुंडी म्हणतात) -earth ball ’’ – फुटू शकते. हुंडी फुटली तर त्यामुळे झाडांची मुळेही तुटतात आणि झाडाच्या पुढील वाढीवर परिणाम होऊ  शकतो. कोणतेही झाड जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लावले जाते तेव्हा ते थोडा आघात (transplanting shock) घेते. २ ते ३ दिवसांच्या कालावधीत असे लागवड केलेले झाड पुन्हा सुस्थितीत येते.

झाड असलेली पिशवी कटरने उभ्या सरळ रेषेत कापल्यानंतर एका हातात हुंडी नीट धरून दुसऱ्या हाताने पिशवी सोडवून घ्यावी. कधी कधी झाडांची मुळे पिशवीच्या तळाशी असलेल्या छिद्रांमधून बाहेर आलेली असतात. अशा वेळी पिशवीचा मुळांच्या जवळील भाग अलगदपणे कटरने कापावा व हुंडी बाहेर काढून घ्यावी. कुंडीच्या तळाशी फुटलेल्या विटांचे/ कुंडय़ांचे तुकडे ठेवून त्यावर थोडे खत-मातीचे मिश्रण भरून घ्यावे (कुंडी कशी भरावी याविषयीचा तपशील आपण मागील लेखात पाहिला आहे). त्यावर ही हुंडी अलगदपणे मधोमध उभी ठेवून त्याची उंची कुंडीच्या उंचीच्या मानाने कुठपर्यंत येते हे बघून घ्यावे. हुंडीचा वरचा भाग हा कुंडीत १ इंच खाली राहील अशा प्रकारे हुंडीच्या खाली आवश्यक तेवढे खत-मातीचे मिश्रण भरावे. त्यानंतर हुंडी एका हाताने कुंडीच्या मधोमध धरून ठेवून दुसऱ्या हाताने हुंडीच्या सगळ्या बाजूने मिश्रण भरावे. हे मिश्रण हुंडीच्या वरच्या मातीच्या पातळीपर्यंत भरावे. कधी कधी अशी लागवड करताना हुंडी जास्त खाली ठेवली जाते किंवा थोडी वर उचललेली दिसते. असे होऊ  नये याची खबरदारी घ्यावी. हुंडीच्या सर्व बाजूने खत-मातीचे मिश्रण भरल्यानंतर एका बारीक काडीच्या साहाय्याने सर्व बाजूने माती थोडी दाबून घ्यावी. असे केल्यामुळे खत-माती भरताना मधे मधे राहिलेली पोकळी निघून जाते. यामुळे हुंडीतील मुळे हुंडीच्या बाहेरील मातीत नीट वाढू शकतील.

आपण लागवड करीत असलेले झाड जर वेल असेल तर ते कुंडीत लावायच्या आधी त्याला योग्य तो आधार कुंडी भरताना कुंडीत लावून घ्यावा व त्यानंतर झाड लावावे.  लागवड झाल्यानंतर कुंडीच्या खाली योग्य आकाराची प्लेट ठेवावी. त्यानंतर कुंडीत लागवड केलेल्या झाडांना पाणी द्यावे. पहिल्यांदा पाणी देताना ते व्यवस्थित घालावे लागते. कारण खत-मातीचे मिश्रण संपूर्ण भिजायला पाहिजे. पाणी हळूहळू घालावे. थोडे पाणी घालून ते मातीत झिरपल्यानंतर पुन्हा पाणी घालावे. संपूर्ण मिश्रण भिजेपर्यंत पाणी द्यावे. साधारणपणे कुंडीच्या खालून पाणी बाहेर आले की समजावे की पूर्ण मिश्रण भिजले आहे. पाणी झारीने किंवा प्लॅस्टिक मगने किंवा कोणत्याही उपलब्ध योग्य अशा भांडय़ाने घालता येते. फक्त पाणी घालताना सावकाशपणे घालावे, जेणेकरून मातीचे मिश्रण कुंडीच्या वरून वाहून बाहेर जाणार नाही.

लागवड केलेले झाड पहिले २-३ दिवस सावलीतच ठेवावे. त्यानंतर त्याच्या ठरवलेल्या जागी ठेवावे. या प्रकारे आपल्याकडे उपलब्ध अशा योग्य आकाराच्या कुंडीत किंवा प्लॅस्टिकच्या डब्यात काळजीपूर्वक पिशवीतील झाडांची लागवड करावी. आयत आकाराच्या कुंडीत (trough) कुंडीच्या आकारानुसार २ किंवा ३ झाडे लावता येतात.  कुंडीत लागवड झाल्यानंतर झाडांची पुढील काळजी हा एक महत्त्वाचा विषय असतो. त्यात पाणी घालणे हा नियमितपणे चालू असणारा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याबद्दल पुढील लेखातून माहिती घेऊ  या.

जिल्पा निजसुरे  jilpa@krishivarada.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 1:54 am

Web Title: tips for growing trees in pots
Next Stories
1 फर्निचर : शू-रॅक
2 पंतप्रधान आवास योजना झाली आभास योजना
3 रेरा कायदा आणि ग्राहकांच्या पैशांची सुरक्षा
Just Now!
X