26 October 2020

News Flash

वस्तू आणि वास्तू : सोयीची यंत्रे घेण्याची मानसिकता

नव्याचे नऊ दिवस तरी वापर होतो का, ही शंका उरतेच.

आपण कोणाला सांगावे, अमुक वस्तू, यंत्र, उपकरण तमुक ठिकाणाहून इतक्या किमतीत घेतले. तितक्यात कोणी सांगते, ‘‘छ्या, त्यात काय? आम्ही तर ढमुक ठिकाणाहून, अमुक सेलमध्ये तेच निम्म्या किमतीत घेतले.’’ आपल्याला मग वाटू लागते, आपण नेहमीच घाटय़ात जातो, या ऑफर्स काही आपल्याला धार्जण्यिा नाहीतच. लोक किती स्मार्ट आहेत. आपण नेहमीच जास्त पसे खर्च करून बसतो. हीच रुखरुख नंतर कोणती ऑफर, सेल, सवलत समोर आली की पटकन् ते मशीन, यंत्र फार विचार न करता विकत घेऊन टाकण्याकडे प्रवृत्त होते. आपल्याला वाटते, आपण बेस्ट सेल, मेगा ऑफर पटकावली. त्यातच समाधान पावून ते मशीन विकत घेतले, यातच आपले कार्यकर्तृत्व पार पडते. नंतर ते वापरेपर्यंत ही चुरस नष्ट झालेली असते. ते यंत्र घरात येऊन पडते. नव्याचे नऊ दिवस तरी वापर होतो का, ही शंका उरतेच.

वेगवेगळे मसाजर्स, अंग शेकून देणारी लहानसहान उपकरणे, बॅगा, मॅग्नेटिक बेल्ट्स वगरे असेच घरात साचत जातात. जोवर आपली हौस भागत नाही तोवर कोणीतरी घरातले, बाहेरचे आपल्याला सांगते, ‘‘यात काही अर्थ नसतो. असे बेल्ट्स लावून, कोणत्या गाद्यांवर झोपून माणसे बरी झाली असती, तर हॉस्पिटल्स ओस पडली असती. परंतु असे काही होत नसते.’’ मग आपण वेगळ्या दृष्टिकोनाने तेच मशीन न्याहाळत बसतो. डिस्काऊंटचा हिशेब मागे पडतो आणि शंका डोक्यात येते. ‘नंतर करू’, ‘वापरू हळूहळू’, ‘आता घरातच तर आहे मशीन’, ‘कधीही वापरू’, हे सुरू होते. डिस्काऊंट पटकावले यातच सेन्स ऑफ आचिव्हमेंट आणि सेन्स ऑफ कम्प्लिशन मिळाल्याने ते नंतर वापरायचेही आहे याचे स्पेशल ट्रेिनग, मोटिव्हेशन आपल्याच मनाला द्यावे लागते. तिथे कमी पडलो की अडगळीत जाणारी एक नवी, अर्ध नवी वस्तू वाढते. अशाच सगळ्या वस्तू, यंत्रं घरात साचू लागतात. त्यामुळे घरात साचल्यावर कशाचे काय करावे, ते विकता येतील का, कोणाला द्यावे या प्रशांची उत्तरे शोधता शोधता नव्याने घरात येणाऱ्या अशा यंत्रांवर वेळीच आळा घातला पाहिजे. आपली गरज काय आहे, ती त्या यंत्राने भागणार आहे का, कोण कोण ते वापरेल, कधी, कसे, किती वेळ, त्याचे सेटिंग्ज आपल्याला पुरेसे समजले आहेत का, यंत्राचा दर्जा काय, बाजारात असेच आणखीन काय काय उपलब्ध आहे, काय किमती आहेत, काय दर, काय सुविधा आहेत हे सगळे बघितले पाहिजे. मुळात त्याच वस्तूला आपल्या घरातच दुसरी काही पर्यायी, बरी, पर्यावरणस्नेही गोष्ट उपलब्ध आहे का, हेही शोधले पाहिजे. जेणेकरून ती वस्तू नव्याने घ्यायची गरजच उरणार नाही.

शंभर-दीडशे रुपयांत डास मारायच्या रॅकेट्स रस्तोरस्ती मिळतात. जाऊन जाऊन किती पसे वाया जातील? आपण हिशेब करतो. दीडशे रुपयांचाच तर प्रश्न आहे, असे म्हणत असेल ती रॅकेट घेऊन टाकतो. ती दीडशे वेळासुद्धा वापरली जाईल, इतकी टिकत नाही. एखादा पीस चांगला निघतोसुद्धा. त्यात कुठे टॉर्चची सोय असते, कुठे काहीतरी संगीत वाजते, कुठे झालीच खराब तर मुलांना खेळायला होईल, असा हिशेब असतो. मुळात आपल्या घरात डास किती आणि कुठून येतात, आपला वावर कुठे आहे- घरात, बाहेर अंगणात, गच्चीत- जिथे जास्त संख्येने पटापट डास मारून होणे ही सोय गरजेची आहे, हे तपासायला हवे. ठरावीक वेळेला दारं खिडक्या बंद ठेवून काम भागते का, एरवी चावत नाहीत पण रात्री झोपल्यावरच डास येतात का, दिवसाही चावणारे डास आहेत का घरात, किती आणि कुठे-कुठे आहेत, त्यांना या रॅकेटव्यतिरिक्त आणखीन काही बरे उपाय करून घालवता येते का याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यातून उत्तरं मिळाल्यावर रॅकेटची आपल्यासाठीची उपयोगिता, तिचा दर्जा हे बघता येतो. दीडशे-दोनशे रुपयांच्या रॅकेटसाठी इतकी डोकेफोड कोण कारणार? त्यापेक्षा वापरून बघावे, चालले-चालले नाहीतर फेकून दिले अशीच सवय लागलेली असते. रॅकेटमुळे धूर होत नाही एखाद्या कॉइलसारखा, अंगाला कुठले क्रीम चोळावे लागत नाही हे मुद्दे नोंदले जातात मनात. रॅकेट म्हणून नाहीच चालली तर तिच्यातून लागणारे लाइट्स वापरू, गेलाबाजार, रॅकेट उघडून ती जाळी उंदीर येणार नाहीत अशा पाइपांना लावू, मग ओरडू स्वत:लाच ‘‘किती जीव घालायचा कशात’’ आणि सरळ फेकून देऊ, असाच प्रवास या लहानसहान यंत्र उपकरणांचा होतो. म्हणूनच, या वस्तू एकदा घेतल्यावर, घेऊन थोडेफार वापरल्यावर, घेऊन फसल्यावर आता याचे काय करावे, याचे पर्याय शोधतानाच वस्तू आणून ठेवायच्या आपल्या सवयीचीच उपयोगिता अशी मांडली पाहिजे.

सोडा मेकर्स, सँडविच मेकर्स, मिक्सरची विविध भांडी देखील अशीच पाच-दहा वेळेस वापरून पडीक राहतात. गॅसवर चालणाऱ्या बत्त्या, टॉर्चचे वेगवेगळे प्रकार यांचाही एकदा घरातच आढावा घेऊन बघावा. सोडा मेकर्स आणि गॅसबत्त्या गॅस संपला म्हणून तर बंद नाहीत ना, हे शोधावे. परत एकदा गॅस भरून घ्यावा, थोडीशी देखभाल, दुरुस्ती करून त्यांचा वापर आपण कसा वाढवू शकतो, याचा विचार करावा. पडून असलेली वस्तू खराब होऊ शकते. वापरात असलेली वस्तू कुठे देताना किमान पडीक काही देऊन टाकले, असा गिल्ट तरी देत नाही. मिक्सरच्या खोक्यात छोटे बुकलेट्स असतात, ते एकदा नीटच समजून घेऊन पद्धतशीरपणे त्या सुविधेचा पुरेपूर लाभ घेता यायचे प्लॅिनगच करावे लागेल. त्या त्या उपकरणांची नजाकतसुद्धा अशीच तर कळेल आपल्याला. करून तर बघू या..

prachi333@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 2:45 am

Web Title: utility devices
Next Stories
1 आखीव-रेखीव स्मार्ट होम 
2 मी आणि माझे घर
3 कपडेच कपडे
Just Now!
X