अमेरिकेत टुमदार घर तयार होते फक्त चार ते सहा महिन्यांत. अशाच एका टुमदार घराचे सुरुवातीपासून बांधकाम पाहण्याची संधी मिळाली आणि बघता बघता प्रत्यक्ष घर बांधताना बघणे, हा छान विरंगुळा होऊन गेला.

माझ्या मुलीचे घर मोठय़ा शहरात, पण मध्यम अशा नवीन टुमदार वसाहती (कम्युनिटी)मध्ये आहे. तेथील काही बंगल्यांचे प्लॉट्स रिकामे होते. बाकीच्या सर्व प्लॉटस्वर रेखीव, सुबक, देखणे असे एक मजली, दोन मजली बंगले होते. घरांच्या चारही बाजूला निगराणी केलेली सुंदर हिरवळ आणि घराला लगत फुलझाडांची रचना! ठराविक ठिकाणी शोभेची आणि फुलझाडांची छान रचना घराच्या पुढच्या बाजूला असते. मागचे अंगण लाकडी फळ्यांची भिंत घालून बंदिस्त केलेले असते. हिरवळीला आणि फुलझाडांना पाणी घालण्यासाठी फवारे आणि लांब पाइपची सोय प्रत्येक घराला असते. घराभोवतीच्या हिरवळीची आणि फुलझाडांची व्यवस्थित निगा प्रत्येक घराला ठेवावीच लागते आणि हे सर्वजण आवडीने आणि छंद म्हणून करत असतात.
असे हे टुमदार घर तयार होते फक्त चार ते सहा महिन्यांत. असेच एक घर बांधकाम करताना पाहण्याची संधी मिळाली आणि बघता बघता घर बांधताना बघणे हा आमचा छान विरंगुळा होऊन गेला.
बाजूच्या मोकळ्या जागेवर एक दिवस सकाळी ३, ४ माणसे काही लाकडी फळ्या जमिनीलगत बसवताना दिसली व त्या जागेची आखणी करून २,३ तासांत गेलीसुद्धा. दुसऱ्या दिवशी अशीच दोन माणसे आली आणि फळ्यांच्या बाजूने थोडे खोदकाम केले व जेवढे घर बांधायचे तेवढय़ा जागेवर काळ्या रंगाचे प्लॅस्टिक घातले आणि ठराविक ठिकाणी पाइप उभे करून ठेवले.
दोन दिवसांनी सकाळी ८ वाजता एक सिमेंट काँक्रीटचा मिक्सिंग करणारा ट्रक आला. सोबत चार ते पाच माणसे फक्त दिसत होती. ट्रकपासून एक मोठा पाइप लावला होता आणि त्यातून धबधब्यासारखे सिमेंट त्या तयार केलेल्या चौथऱ्यावर पसरले जात होते. १०’’ ते १२’’ जाडीचे (अंदाजे) सिमेंट पसरले गेले. त्यातीलच दोन माणसे हातात लांब दांडीचे फावडे घेऊन सिमेंट समपातळीत करीत होती. असे २, ३ ट्रक आले आणि १ ते १।। वाजेपर्यंत सर्वजण व्यवस्थित काम करून परत गेलेसुद्धा. २, ३ दिवस त्यावर दोघेजण येऊन पाणी मारून जात होते, बस एवढेच.
सर्व काँक्रीट टाकण्याच्या आधी छोटय़ा उभ्या पाइपमधून बहुधा लाइट, पाणी, ड्रेनेज ह्य़ासाठी जोडणी झालेली असावी.
३ ते ४ तास ही सर्व कामे चालू असायची. कोठेही कामचुकारपणा नाही, वेळकाढूपणा नाही, कोणीही त्यांच्यावर देखरेख करणारा नाही, कामाचा गोंधळ, गडबड, आरडाओरड नाही- ह्य़ा सर्व गोष्टी प्रकर्षांने जाणवल्या.
कामाच्या पहिल्या दिवसापासून त्या जागेवर एक छोटय़ाशा खोलीसारखे दरवाजा असलेले बॉक्स आणून ठेवलेले दिसले. मला काही समजले नाही म्हणून मुलीला विचारले. तिने सांगितले की, काम करणाऱ्या लोकांसाठी हे फिरते स्वच्छतागृह आहे. प्रत्येक गोष्टीचा विचार करून तिथे माणसांची किती सोय बघितली जाते हे विशेष जाणवले. नंतरही ज्या ज्या ठिकाणी बांधकाम सुरू होते त्या प्रत्येक ठिकाणी ही ‘छोटीशी खोली’ असायचीच.
काँक्रीट टाकून झाल्यावर एका दिवशी ट्रकमधून नीट कापलेल्या, एकसारख्या दिसणाऱ्या लाकडाच्या फळ्या आणल्या गेल्या व लाकडाच्या भिंती बांधायला सुरुवात झाली. ठेवतानाच त्या घराच्या चारही बाजूला टाकल्या गेल्या. ४ ते ६ माणसे काम करीत होती. आतून-बाहेरून काँक्रीटच्या चौथऱ्यावर त्यांना टेकूसारखा आधार देऊन पटापट भिंती उभ्या राहात होत्या. बसवणाऱ्या त्या माणसाजवळ इलेक्ट्रिकवर चालणारे खिळे पक्के करणारे मशीन होते. प्रत्येक फळी बसवताना त्या फळीला खिळ्यांचे जसे काही इंजेक्शन दिले जात होते. डॉक्टरांचे इंजेक्शन देताना तरी सुई काही वेळ शरीरात असते, पण त्यापेक्षाही कमी वेळात हे इंजेक्शन दिले जात होते. पाहता पाहता ४ ते ५ दिवसांत पूर्ण घराचा सांगाडा वरच्या उतरत्या छपरासहीत सुबकपणे उभा राहिला.
एकीकडे खिडक्या-दारांच्या सोडलेल्या चौकटीत तयार काचा वगैरे सर्व लावलेली दारे व खिडक्या पटापट बसविल्या जात होत्या. दोन गाडय़ांच्या गॅरेजची जागाही घराच्या रचनेत आखलेली होती. तेही सर्व तयार होत होते.
गॅरेजच्या बाजूच्या भिंतीवर तेव्हाच घराच्या नंबरची जागा पक्की करून तोसुद्धा लावला गेला.
पुढच्या दोन दिवसांत छपरावर राखाडी रंगांच्या कौलांचे बॉक्स ठेवले गेले. उतरती छपरे असूनही एकही बॉक्स खाली पडला नाही, आणि वरती चढलेली माणसेही व्यवस्थित तोल सांभाळत पटापट खिळ्यांच्या इंजेक्शनने कौलांच्या पट्टय़ा फिक्स करत होती. एका दिवसात ७ ते ८ तासांत पूर्ण छपरावर कौले लावली गेली.
घराच्या डिझाइनप्रमाणे शोभेच्या विटा पण बाहेरच्या बाजूने लावल्या गेल्या.
त्या ट्रकमधून आल्या त्या मोठय़ा बॉक्सच्या आकारात बांधलेल्या होत्या.
एक तासात असे ४ ते ५ बॉक्स घराच्या चारही बाजूला फक्त एका
माणसाने मशीनच्या साहाय्याने उतरविले. लावण्याचे काम मात्र चार माणसे
करीत होती.
नंतर घराच्या आतले काम सुरू झाले, पण ते आम्हाला काही दिसू शकले नाही, पण वरील पद्धतीनेच ४ ते ५ माणसे काम करताना दिसत होती. सर्व कामे जास्तकरून मशीननेच होत होती. देखरेख करणारा मुख्य माणूससुद्धा स्वत: काम करत होता. कोणाचाही कामचुकारपणा नाही, तंबाखू, सिगारेट नाही, कामामुळे रस्त्यावरच्या रहदारीला अडथळा नाही, सिमेंटचे, मातीचे ढिगारे लगेचच आवरले जात होते, अशा पद्धतीने एक महिन्यात बाहेरून सर्व घर तयार झाले.
आतील कामे सुरू असतानाच बाहेरच्या मोकळ्या जागेत त्याची लेव्हल करून फुलझाडांची जागा नक्की करणे, (प्रत्येक घरासमोर एक मोठे झाड लावावे लागते) झाडाची जागा खोदून घेणे, घरासमोरचा चालण्याचा रस्ता काँक्रीटने करणे इ. सर्व कामे चालू होती.
घराच्या बांधकामात बाहेरच्या डिझाइनमध्ये आपल्याला हवे तसे बदल करता येत नाहीत. एका ठराविक मर्यादेपर्यंत आत व बाहेर बदल करता येतात आणि ते सुरुवातीलाच नक्की करावे लागतात. बाहेरून घर बांधणीचा अमेरीकेतील हा सोहळा म्हणजे एक विलक्षण अनुभवच होता.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
Developed an innovative method to diagnose Parkinson in the first stage Mumbai
मुंबई: कंपवाताचे पूर्वनिदान करता येणार
multi color grapes export demand decline at global level
निर्यातीसाठी रंगीत द्राक्षांना मागणी घटली; जाणून घ्या कारणे काय ?
Demolition of Shiv flyover delayed again due to examinations Mumbai
मुंबई: परीक्षांमुळे शीव उड्डाणपुलाचे पाडकाम पुन्हा लांबणीवर