News Flash

चिऊचं घर : वास्तू म्हणते तथास्तु!

धकाधकीच्या जीवनात आपण निसर्गापासून दूर जात आहोत; ही जाणीव अधिक प्रखर होत असतानाच घरातील वस्तूंच्या, सजावटीच्या माध्यमातून निसर्गाच्या अधिक जवळ कसे जाता येईल, हे

| January 19, 2013 01:08 am

धकाधकीच्या जीवनात आपण निसर्गापासून दूर जात आहोत; ही जाणीव अधिक प्रखर होत असतानाच घरातील वस्तूंच्या, सजावटीच्या माध्यमातून निसर्गाच्या अधिक जवळ कसे जाता येईल,  हे सांगणारं सदर..
तुमच्या सगळ्यांचं ‘चिऊच्या घरा’त मनापासून स्वागत! टिकाऊ, मजबूत घर म्हटलं की मला मुंग्यांची वारुळं आणि चिऊचं घरटंच आठवतं म्हणून सदराचं नाव चिऊचं घर.. तिचं मेणाचं घर पडत नाही, पाऊसपाण्याला तोंड देतं, मात्र तरीही ते पर्यावरणप्रेमी असतं.. प्रत्यक्षात चिऊचं घर मेणाचं नसतं. पाऊसपाण्यात टिकणारं नसतं. आपल्या घरांचंही तसंच आहे. आपली पारंपरिक घरं निसर्गाशी जवळीक साधणारी होती, आता मात्र आपली घरं चिऊताईसारखीच मेणाची. पाऊसपाण्यात टिकाव वगरे धरणारी, मात्र तिच्यासारखीच पर्यावरणप्रेमी आहेत का? नसतील तर ती अधिक पर्यावरणप्रेमी करता येतील का?
माझी आज्जी नेहमी म्हणायची, घरात जे चिंताल, बोलाल ते खरं होतं, कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणते. खरं असावं ते बहुधा, कारण आजीने आणि तिच्यानंतर माझ्या आई-मावशीने आपापल्या घरात अनेक गोष्टी जिद्दीने, चिकाटीने केल्या आणि तडीस नेल्या. घरात पाहुणे यावेत, त्यांच्या स्वागतासाठी घर सुसज्ज असावं तसंच घरात एक हिरवा कोपरा नेहमीच जपला गेला. छोटय़ा खोलीच्या घरातदेखील आमच्या देव्हाऱ्यात आजी फुलांची सुरेख आरास करायची, रोज न चुकता. आईने मुंबईला आल्यावर लग्नात रुखवतात मिळालेल्या एका वेगळ्या स्टँडमध्ये लसूण, मेथी, पुदिना असं सगळं लावलं. कित्येक र्वष हा चिमुकला बगीचा आमच्या जेवायच्या मेजावर दिमाखाने मिरवत होता. मावशीच्या घराला ऊन मिळतं, बठकीच्या आणि निजायच्या खोलीला लागून व्हरांडे आहेत. तिथे तिची बाग फुलली आहे.
माझ्या आई आणि आजीने संसार केला ते घर त्यांनी निवडलेलं नव्हतं. ती छोटी घरं त्यांच्या वाटय़ाला आली तशी त्यांनी सजवली आणि घरात निसर्ग आणायचा प्रयत्न केला. मात्र जेव्हा त्यांना घरांची निवड करायला मिळाली तेव्हा त्यांनी काही अगदी मूलभूत गोष्टी काटेकोरपणे पाहिल्या. घर कसंही घ्या, ‘मात्र घरात पश्चिमेकडून भरपूर ऊन येऊ दे रे’ ही आजीची एकमेव मागणी होती. तळमजल्यावरच्या साध्याशा फ्लॅटमध्ये ऊन येतं, खिडकीखाली छोटे वाफे करून झाडं लावता येतात, घरात भरपूर सूर्यप्रकाश येतो आणि हवा खेळती आहे या आनंदात आजी या नव्या घरात समाधानाने राहिली.
मला निसर्गाविषयीचं प्रेम असं वारसाहक्काने मिळालेलं आहे. तेव्हा साहजिकच मी घर घ्यायच्या विचारात होतो तेव्हा ते घर अधिकाधिक पर्यावरण-संतुलित कसं असेल याचा शोध घेत होतो. अगदी आयडियल गोष्ट म्हणजे आपली स्वत:ची जमीन घेऊन, त्यावर पीकपाणी पिकवून, स्वत: बांधलेल्या घरात स्वत:च पिकवून खाल्लं, विविध पर्यावरणप्रेमी सोयी केल्या म्हणजे आपण एक उत्तम, स्वयंपूर्ण आणि पर्यावरण-संतुलित घर बांधू शकतो. मात्र ही गोष्ट साऱ्यांनाच कशी शक्य होणार? पसा, सोयीसुविधा, रोजचं जीवन, नोकरी, शाळा, अभ्यास अशा एक ना अनेक मर्यादांमध्ये बसवताना आपलं चिऊचं घर कधी बरं तयार होणार?
खूप विचार केला आणि अनेक गोष्टींची काळजी घेत, काही सोप्या गोष्टी अमलात आणत मी घर घेतलं. घर चारचौघांसारखंच आहे. एका प्रथितयश बिल्डरचा 1इऌङ फ्लॅट आणि मुंबईबाहेर छोटय़ाशा शहरात एक रो-हाऊस. मात्र ही निवड करताना हातातल्या पशाचा, मनातल्या घराचा आणि उपलब्ध सुविधांचा मेळ बसवताना खूप काही शिकता आलं. हे सगळं शिकणंच मी तुमच्यासोबत वाटणार आहे. अगदी रोजच्या जगण्यात अनेक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत, ज्यांची निवड केली तर आपलं घर अधिक आकर्षक होतंच, मात्र पर्यावरणाच्या हानी करण्यातला त्याचा वाटा कमालीचा कमी करता येतो.
अगदी साधी उदाहरणं देतो- घर घेताना इमारत दक्षिण-उत्तर असेल असं पाहिलं तर घरात उत्तम सूर्यप्रकाश येतो. शिवाय खिडक्या-दारांतून हवा खेळती राहते. अनेक छोटय़ा-मोठय़ा गोष्टींतून घराला अधिक पर्यावरणाशी अनुकूल बनवता येतं. घरात वातानुकूलन यंत्र बसवायच्या खोलीत खिडक्यांना एकाऐवजी दोन पडद्यांची सोय करून घ्या. खिडकीजवळ पांढरा सुतीकापडाचा पातळ कापड निवडा आणि घरातल्या बाजूस रेशमी, सुती अशा नसíगक पोताचं थोडं जाड कापड निवडा, खिडकीतून येणाऱ्या अतिरिक्त उष्णतेला आळा बसेल आणि खोली अधिक थंड राहील. आतला जाड पडदा बाजूला सारला तरी बाहेरचा पातळ पडदा उष्णता रोखून प्रकाश खोलीत येऊ देईल. या साध्या उपायामुळे खोलीत वातानुकूलन यंत्राची कार्यक्षमता वाढेल. अधिक उत्तम उपाय म्हणजे, शक्य असेल तर खिडकीच्या बाहेरच्या बाजूला एक वाळ्याचा, गवताच्या चटईचा किंवा चक्क गोणपाटासारख्या कापडाचा विरळ विणीचा पडदा लावायचा. त्यावर दुपारच्या आधी पाणी िशपडून ठेवायचं. खिडकी उघडी टाकली तर त्या गार, पाणी िशपडलेल्या पडद्यातून थंड हवा घरात येईल, आणि नुसत्या पंख्यावर काम भागेल, वातानुकूलन यंत्रांची गरजच पडणार नाही. सणासुदीच्या काळात किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत घरांना नवा रंग आपण सगळेच देतो. बाजारात आता रासायनिक बेसऐवजी पाणी आधारित बेस असलेले रंग मिळतात. सौंदर्य आणि गुणवत्ता यांच्याशी कोणतीही तडजोड न करता, आणि किंमतही अधिक न देता आपण अधिक पर्यावरण-अनुकूल रंग आपल्या घराला देऊ शकतो. घरातली प्रकाशयोजना करताना कटाक्षाने आधुनिकतेची कास धरत छएऊ दिवे वापरले तर विजेचा वापर कमालीचा कमी करता येऊ शकतो. मुलांची खोली सजवतानाही अनेक सहज सोप्या गोष्टींतून त्यांना अधिकाधिक पर्यावरणाशी अनुकूल जगण्याचे संस्कार आपण देऊ शकतो. त्यांच्या खोलीत किंवा खिडकीत कमी देखभाल लागेल अशा छोटय़ा रोपांची लागवड करून त्यांनाच काळजी घ्यायला सांगायची. त्यांचं छोटं फíनचर करताना घरातल्या उपलब्ध इतर फíनचरमधून काही सामान घेता येईल का, याची चाचपणी करता येईल. इतकंच कशाला, त्यांच्यासाठी लागणारी खेळणी आणि इतर साहित्य नसíगक साधनांचा वापर केलेलं, स्थानिकांनी तयार केलेलं असं खरेदी करता येईल.
मुंबई, ठाणे, नागपूर, नासिक या महाराष्ट्रातल्या शहरांतून आणि दिल्ली, बंगळूर, म्हैसूर, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद अशा इतरही अनेक देशभरातल्या शहरांतून कितीतरी लोक आपापल्या वस्त्या, घरं एका नव्याच उपक्रमाने सजवत आहेत. वस्ती, वसाहत, गल्ली पातळीवर एरिया मॅनेजमेंटच्या माध्यमांतून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. जैविक कचऱ्यापासून सेंद्रिय खत बनवणे, पावसाच्या पाण्याच्या संवर्धनासाठी वसाहतींमधून सोय करणे, वसाहतींत किंवा घराजवळच्या गल्ल्यांतून उपयुक्त अशा झाडांची रस्त्याच्या दुतर्फा लागवड आणि देखभाल करणे अशा अनेक कामांतून लोक आनंदाने सहभाग घेत आहेत.
दर पंधरवडय़ाला आपल्याला सहज उपलब्ध होतील अशा अनेक पर्यावरणप्रेमी पर्यायांची, व्यक्तींची, उपक्रमांची माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. माझ्याप्रमाणेच तुमचीही वास्तू ‘चिऊचं घर’ व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. भरपूर इच्छाशक्ती, थोडी कल्पकता, आणि निसर्गाविषयीचं प्रेम यांची सांगड घातली तर आपल्या सगळ्यांना आपापली घरं खूप आनंद देतील, सुरक्षा देतील, विशेष म्हणजे त्यापलीकडे जाऊन जगण्याचं भान देतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2013 1:08 am

Web Title: design an energy environment friendly home
Next Stories
1 वास्तुकप्रशस्ते देशे : वास्तुशास्त्रावरील शास्त्रग्रंथ
2 शब्दमहाल : वास्तू, हे मायाविनी!
3 आठवणीतलं घर : घर सामंतांचं!
Just Now!
X