|| अ‍ॅड. श्रीनिवास घैसास

एकदा का १०० रुपये भरून सहयोगी सभासद झाले की ते कायमचे असते का? म्हणजे १० वर्षांपूर्वी जर सहयोगी सभासद झाले आणि नंतर पाच वर्षांनी जर ते पुन्हा पदाधिकारी होणार असतील तर १० वर्षांपूर्वी  १०० रुपये भरून झालेले सहयोगी सभासद पुढे चालू राहू शकते का? का नव्याने सहयोगी सभासद होणे गरजेचे आहे?

– अनिल गुडेकर, अंधेरी, मुंबई.

नवीन सुधारणेनुसार, आता एखाद्या सहयोगी सदस्याला- तो जर संस्थेच्या मालमत्तेत सहमालक नसेल तर त्याला मतदानसुद्धा करता येत नाही. त्यामुळे जुने सहयोगी सदस्यत्व कायम राहिले तरी त्याला फारसा अर्थ राहत नाही. पूर्वी १०० रुपयेभरून सहयोगी सदस्य झाले आहेत आणि ते कोणत्याही अचल मालमत्तेचे सहमालक नसतील तर त्यांना संस्थेच्या सभेत मतदान करता येत नाही. संस्थेचा पदाधिकारी होता येत नाही, फक्त ते नाममात्र सदस्य म्हणून राहतात.

आमची सोसायटी दुकानाच्या पुढे सज्जाखाली सेफ्टी ग्रील लावण्यासाठी परवानगी देत नाही. मला ज्वेलर्सचे दुकान टाकावयाचे आहे. नुसत्या शटरवर भरवसा ठेवता येत नाही. नुकतीच बाजूच्या दुकानात शटर तोडून चोरी झाली. सबब मी शटरपासून फक्त ८/१० इंच जागा सोडून ग्रील लावू शकतो का? पालिका किंवा सोसायटी हरकत घेऊ शकते? ग्रील फक्त संरक्षणासाठी हवं आहे. सोसायटीने परवानगी नाकारली आणि दुकानात चोरी झाली तर मी सोसायटीला जबाबदार धरू शकतो का? पालिकेत अर्ज करू शकतो का?

– बाळकृष्ण पाटील, नवी मुंबई.

खरे तर तुम्ही कुठे ग्रील लावणार आहात हे आपल्या प्रश्नावरून लक्षात येत नाही. आपण सोसायटीकडे ज्वेलर्सचे दुकान टाकण्यासाठी काही गोष्टींची पूर्तता करण्यास सुरुवात केली असेल तर- उदा. गोल्डस्मित लायसन्ससाठीचा अर्ज, गुमास्ता लायसन्ससाठीचा अर्ज यांचे कागदोपत्री पुरावे जोडून सेफ्टीसाठी ग्रील लावण्याची परवानगी मागावी. यामध्ये आपण संस्थेची अवांतर जागा बंदिस्त करत नसाल तर संस्थेने अशी परवानगी देण्यास काहीच हरकत नाही. आणि एवढे करूनही संस्थेने जर लेखी स्वरूपात परवानगी नाकारली तर आपण याविरुद्ध उपनिबंधकाकडे दाद मागावी. तसेच या सर्व कागदपत्रांसह नवीमुंबई महानगरपालिकेकडे ग्रील लावण्यासाठी आपण परवानगी मागावी.

मी मे २०११ ला रिडेव्हलपमेन्ट फ्लॅटची स्टॅम्पडय़ुटी भरली होती. परंतु काही कारणामुळे रजिस्ट्रेशन झाले नाही. बिल्डर नंतर करू म्हणाला आणि माझ्याकडूनसुद्धा राहून गेले. आता मला नव्याने स्टॅम्पडय़ुटी आणि रजिस्ट्रेशन करावे लागेल का? की नाही केले तरी चालेल? आणि जर आता केले तर किती खर्च होईल. बिल्डर पझेशन देत आहे. माझा फ्लॅट गोरेगाव (प) ओशिवरा येथे आहे.

– सुरेश

प्रत्येक सदनिकेचे रजिस्ट्रेशन करणे हे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु आपण स्टॅम्पडय़ुटी भरल्यावर किती कालावधी लोटला आहे हे आपल्या पत्रावरून समजत नाही. जर करारनामा बनवून चार महिने उलटून गेले असतील तर सदर करारनामा आपल्याला रजिस्टर करता येणार नाही. आपल्याला नवीन स्टॅम्पडय़ुटी आणि रजिस्ट्रेशनसाठी किती पैसे भरावे लागतील हे मात्र संबंधित कार्यालयात जाऊन नक्की करावे लागेल. मात्र भविष्याच्या दृष्टीने आपण आपला करारनामा नोंदवून घेणेच इष्ट ठरेल.

फ्लॅट नावावर नसेल (फ्लॅट सेल अ‍ॅग्रीमेंटमध्ये ओनर नाव नसेल) तर सोसायटीचे कमिटीमध्ये मेंबर, सेक्रेटरी, चेअरमन, ट्रेजरर होता येईल का? ओनरची पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी भावाने किंवा मुलाने आणली तर चालेल का? (मेंबर होता येईल का?) जर फ्लॅट सेल अ‍ॅग्रीमेंटमध्ये दोन जणांची नावे असतील तर कोणालाही मेंबर होता येईल का? बायलॉजमध्ये किती नंबरला असे लिहिले आहे?

– मोरे

नवीन सुधारणेनुसार, ज्यांची नावे खरेदीविक्री करारनाम्यात आहेत त्या व्यक्तीलाच सोसायटीच्या कमिटीमध्ये सदस्य, सेक्रेटरी, चेअरमन, ट्रेझरर होता येईल. त्यामुळे जर फ्लॅट सेल अ‍ॅग्रीमेंटमध्ये ओनर म्हणून नाव नसेल तर त्याला सोसायटीमध्ये कोणतेही पद भूषवता येणार नाही. तसेच मालकाच्या पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीवरदेखील कोणालाही (अगदी रक्ताच्या नातेवाईकांना देखील) कुठलेही पद भूषवता येणार नाही. जर फ्लॅट खरेदीविक्री अ‍ॅग्रीमेंटमध्ये दोन जणांची नावे असतील तर त्यातील पहिले नाव असेल त्याला सदस्य होता येईल. आणि दुसरे नाव असेल त्याला सहसदस्य होता येईल. मात्र सदस्य जेव्हा स्वत:च्या संस्थेच्या कामकाजात भाग घेत नसेल त्यावेळी सहसदस्याला  सदस्याच्या संमतीने संस्थेच्या कार्यकारी मंडळात काम करता येईल.

मी २०१२ साली पुण्यात टू बीएच के फ्लॅट घेतला. आमच्या बिल्डिंगमध्ये फक्त सहा फ्लॅट आहेत. प्रत्येक मजल्यावर दोन फ्लॅट आहेत. हे  फ्लॅट विकताना बिल्डरची परवानगी लागेल का? तसेच बिल्डरने प्लॉट मालकाला प्लॉटच्या बदली दोन फ्लॅट दिले तर त्याचा मला त्रास होईल का?

– बागुल

नवीन उपविधीप्रमाणे गृहनिर्माणसंस्थेचे ना हरकत प्रमाणपत्रदेखील सदनिकेची खरेदी-विक्री करताना लागत नाही. त्यामुळे आमच्या मते, आपणाकडे सर्व पैसे बिल्डरला दिल्याच्या पावत्या असतील आणि बिल्डरने आपल्याला ताबापत्र दिले असेल, तसेच आपल्याला भोगवटा प्रमाणपत्र मिळाले असेल तर आपली सदनिका विकताना बिल्डरचे ना हरकत प्रमाणपत्र लागणार नाही. मात्र विकत घेणारी व्यक्ती ही सदर सदनिका कर्ज काढून घेत असेल आणि कर्ज मंजूर होण्यासाठी त्याला बिल्डरकडून ना हरकत प्रमाणपत्र लागत असेल तर आपणाला बिल्डरकडून ना हरकत प्रमाणपत्र द्यावे लागेल. बिल्डरने प्लॉट मालकाला त्याच्या प्लॉटच्या मोबदल्यात दोन बदली फ्लॅट दिले तर त्याचा तुम्हाला त्रास होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, आपण बिल्डरच्या पाठीस लागून गृहनिर्माणसंस्था अथवा अपार्टमेंट यांपैकी कोणती तरी संस्था स्थापन करून घेणे इष्ट ठरेल.

मी पनवेलमधील एका गृहनिर्माण सोसायटीतील रहिवासी असून, आमच्या सोसायटीतील सर्व रहिवासी कमिटीने ठरवल्याप्रमाणे वेळच्या वेळी मेंटेनन्सची रक्कम भरत असतानादेखील कमिटीने २०१० पासून आजपर्यंत सिडकोने आकारलेला सेवा शुल्क कर थकवला आहे. आता त्या रकमेवर जवळपास दोन लाख रुपये दंड लागला आहे. सोसायटीमध्ये बऱ्यापैकी रक्कम जमा असताना देखील कमिटीने सेवा शुल्क कर भरलेला नसून, उलट हा सर्व भरुदड कमिटी आम्हा सभासदांच्या माथी मारत आम्हा सर्वाना डिसेंबपर्यंत प्रत्येक वेळी १० हजार भरा नाहीतर २० टक्के दंड लावण्यात येईल अशी नोटीस दिली आहे.

– विजय शिंदे, पनवेल</strong>

आपल्या पत्रावरून आपण भरत असलेल्या मेंटेनन्समध्ये सिडकोचा सेवाशुल्क कर भरला आहे किंवा नाही याची माहिती मिळत नाही. आपल्या मेंटेनन्स बिलामध्ये जर सिडकोचा सेवाकर या सदरात कोणती रक्कम दाखवून ती आपण भरलेली असेल आणि संस्थेने ती रक्कम सिडकोकडे जमा केली नसेल आणि त्यामुळे सिडकोने जर दंड आकारला असेल तर आपणाला संबंधित कमिटी तसेच पदाधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीररीत्या दाद मागता येईल. त्यासाठी आपणाला उपनिबंधकांकडे तक्रार करण्यापासून ते सहकार न्यायालयात दाद मागण्यापर्यंत किंवा संबंधिताविरुद्ध फसवणुकीच्या संबंधाने फौजदारी गुन्हा दाखल करण्यापर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपण याबाबत योग्य त्या तज्ज्ञ माणसांची मदत घेऊनच मग निर्णय घेणे उचित ठरेल.

ghaisas2009@gmail.com