25 November 2020

News Flash

स्टुडिओ : ‘प्रिंटमेकिंग’चा स्टुडिओ

स्वत:चा स्वतंत्र स्टुडिओ असण्याची इच्छा प्रत्येक चित्रकाराची असते. पण अनेकांसाठी एक सामयिक स्टुडिओ असण्याचे स्वप्न क्वचितच कोणीतरी बघते आणि प्रत्यक्षात आणते. प्रा. काशिनाथ साळवे संचालित

| April 27, 2013 01:02 am

स्वत:चा स्वतंत्र स्टुडिओ असण्याची इच्छा प्रत्येक चित्रकाराची असते. पण अनेकांसाठी एक सामयिक स्टुडिओ असण्याचे स्वप्न क्वचितच कोणीतरी बघते आणि प्रत्यक्षात आणते. प्रा. काशिनाथ साळवे संचालित असा एक स्टुडिओ ठाणे (पश्चिम) येथे आहे. या स्टुडिओत ‘ग्राफिक आर्ट’ किंवा ‘प्रिंटमेकिंग’ म्हटल्या जाणाऱ्या कलाप्रकारात काम केले जाते. यासाठी मराठीत ‘मुद्राचित्र’ शब्द वापरला जातो. चित्र (पेंटिंग) एकमेव असते. पण मुद्राचित्राच्या  एकापेक्षा अधिक प्रती घेता येतात. चित्रकाराने लाकूड, धातू, लाईनो व इतर माध्यमांत कोरलेले ठसे वापरून त्याच्या देखरेखीखाली छापलेले आणि कलात्मकता असणारे मुद्रित चित्र म्हणजे मुद्राचित्र. मुद्राचित्रांच्या निर्मितीसाठी विशिष्ट प्रकारची मशिन्स असणे, लाकूड, धातू, पाषाण यांसारखी माध्यमे, त्यावरील चित्रासाठी विशिष्ट प्रकारची हत्यारे, प्रिंटइंक यांसारखी साधनसामग्री आवश्यक असते. या कलाप्रकारात वेगवेगळे तांत्रिक टप्पे असतात. त्या प्रक्रियांतून जाण्यासाठी पुरेशी मोठी जागाही आवश्यक असते. एकंदरीत  वैयक्तिक पातळीवर यासाठीचा खर्च, व्यवस्थापन करणे अतिशय जिकिरीचे असते. पण एखाद्या सामयिक स्टुडिओद्वारे अशी सोय असल्यास तेथे मुद्राचित्रे करणे शक्य होते. प्रिंटमेकिंगमधील असे स्टुडिओ दिल्ली, बडोदा, अहमदाबाद, भोपाळ, चेन्नई इत्यादी ठिकाणी आहेत. अशी सामयिक स्टुडिओची सुविधा महाराष्ट्रात मात्र येथील कलासंस्था, शासन इत्यादींकडून आतापर्यंत कार्यान्वित होऊ शकली नाही. मुख्यत: अशा मूलभूत सोयीअभावी व अन्य काही कारणाने हे कलामाध्यम महाराष्ट्रात फारसे रुजले नाही. तेथे त्याचा नीट प्रसार झाला नाही. महाराष्ट्रातील चित्रकारांना व कलाशिक्षण पूर्ण झालेल्या येथील नवोदित चित्रकारांना ‘प्रिंटमेकिंग’ माध्यमात काम करण्यासाठी महाराष्ट्राबाहेर जावे लागते. ही गैरसोय आता ठाणे येथील या स्टुडिओमुळे दूर होईल. एकंदरीत महाराष्ट्रातील ‘प्रिंटमेकिंग’ कलेबाबतची अनास्था व या माध्यमाबाबत साळवे यांची आस्था, तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच ठाणे येथील प्रस्तुत स्टुडिओ साकार झाला.
प्रा. काशिनाथ साळवे हे कलाक्षेत्रात चित्रकार, म्यूरलिस्ट व प्रिंटमेकर म्हणून सुपरिचित आहेत. तसेच उत्तम कलाशिक्षक म्हणूनही ते ख्यातनाम आहेत. उत्तम कलाशिक्षक म्हणून उज्जन येथील सांदिपनी सन्मानाचे ते २०११चे मानकरी आहेत. महाराष्ट्र शासनानेही त्यांना सन २०१२ मध्ये उत्तम कलाशिक्षक व कलाक्षेत्रातील कामगिरीबद्दल गौरविले आहे. १९९५ ते २००० मध्ये  ते ललित कला अकादमी दिल्लीचे सभासद होते. या केद्रशासित संस्थेतर्फे कलाक्षेत्रात विविध उपक्रम, चित्रप्रदर्शने होत असतात. ‘गढी वर्कशॉप’ हा त्यापैकीच एक महत्त्वाचा उपक्रम. गढीमध्ये चित्र, शिल्प, सिरॅमिक आणि प्रिंटमेकिंगसाठीही अत्याधुनिक साधनसामग्री, आनुषंगिक सोयी असणारे सुसज्ज स्टुडिओ आहेत. कलाकारांच्या निवासाचीही सोय आहे. अनेकजण त्याचा लाभ घेतात. अशीच सोय मुंबईतही असावी असे प्रा. साळवे यांना तीव्रतेने वाटे. तसे प्रयत्नही त्यांनी केले; परंतु त्यांना यश आले नाही. ते फलद्रुप झाले नाहीत. जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या नोकरीतून ते २००१ मध्ये निवृत्त झाले आणि प्रिंटमेकिंगच्या  सामयिक स्टुडिओच्या इच्छेने पुन्हा उचल घेतली. ग्रँटरोड येथील रॉबर्टमनी टेक्निकल हायस्कूलमध्ये जागा मिळून प्रिंटमेकिंगला सुरुवात झाली. २००१ ते २००९ या काळात तेथे तो स्टुडिओ चांगल्या प्रकारे सुरू होता. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे कलाकार पलानी अप्पन, लक्ष्मा गौड, ज्योती भट, अनुपम सूद आदींनी त्या स्टुडिओत काम केले. परंतु नंतर त्या शैक्षणिक संस्थेने ती इमारत कामकाजासाठी पाडली. साळवे यांनी उमेदीने पुनश्च योग्य जागेसाठी शोधाशोध केली. विशेष म्हणजे ते राहात असलेल्या ठाण्यातच सुरुवातीला कोठारी कंपाऊंड येथे ती जागा होती. त्यानंतर वागळे इस्टेट येथील प्रस्तुत स्टुडिओची प्रशस्त जागा मिळाली.
हा स्टुडिओ मुख्य रस्त्यापासून थोडा आत इंडस्ट्रियल एरियात आहे. आजूबाजूला थोडी झाडेझुडपे आहेत. हे ठिकाण गजबजलेले असले तरी स्टुडिओचा परिसर शांत, स्वच्छ आहे. ३५ बाय ३० चौ.फुटांच्या स्टुडिओची उंची ३० फूट आहे. भरपूर प्रकाश, खेळती हवा यासाठी पुरेशा खिडक्या आहेत. येथे एका वेळी वीसजण काम करू शकतात. दरवाजातून आत शिरले की समोरच वर्किंग टेबल्स आहेत. तेथे प्रिंटसाठीचे ‘आर्टवर्क’ केले जाते. या कलामाध्यमात काम करताना काही तांत्रिक प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पाडाव्या लागतात. त्यासाठी दारालगतच्या उजव्या भिंतीजवळ पंधरा फूट लांबीचा ओटा मुद्दाम बनवून घेतला आहे. ओटय़ावर एका प्लॅस्टिक टबमध्ये एचिंग या प्रक्रियेतील अ‍ॅसिड बाथ दिला जातो. या प्रक्रियेत नायट्रिक अ‍ॅसिडचा वापर असतो. एचिंग या तंत्रासाठीचे मशीन ज्योती भट यांनी सामयिक स्टुडिओसाठी देणगीदाखल दिले आहे. कलर एचिंगसाठी विशिष्ट प्रकारचेच रोलर लागतात. ते चेन्नईहून आणले आहेत. एकेक रोलर दहा ते पंधरा हजार किमतीचा असतो. दोनशे ग्रॅम प्रिंट इंकचा एक डबा सुमारे तीन हजार रुपयांना असतो. या प्रिंटसाठी लागणाऱ्या कागदाच्या एका शीटची किंमत तीनशे रुपये आहे. लिथोग्राफीचे मशीन अकबर पदमसी यांनी स्वत:च्या देखरेखीखाली बडोदा येथे तयार करून घेतले. लिथोग्राफीसाठी अरेबिक गम व इतर रसायनांचा वापर असतो. या रसायनांचा निचरा होण्याची योग्य काळजी घेतली आहे.
प्रिंटमेकिंग कलामाध्यमात काम करू इच्छिणाऱ्या सर्व स्तरांतील चित्रकारांना येथे काम करता येते. बुजुर्ग- नाणावलेले चित्रकार, आर्ट स्कूलचे शिक्षण पूर्ण झालेले नवोदित चित्रकार तसेच चित्रकला व प्रिंटमेकिंग माध्यमात उत्सुकता असणारे हौशी चित्रकारही येथे आपापली निर्मिती  करतात. या स्टुडिओद्वारे वर्क शॉप आयोजिली आहेत. दर तीन महिन्यांनी असे वर्षभरात चार वर्क शॉप्स असतील. त्यात मुंबईबाहेरील व इतर राज्यांतील चित्रकारांना आमंत्रित केले जाईल.
काशिनाथ साळवे यांच्या परिश्रमातून तयार झालेला हा स्टुडिओ. या स्टुडिओतील मुद्राचित्रे प्रदर्शित करण्यात काही आर्ट गॅलरीज्ने सहकार्य केले आहे. त्यातून या कलाप्रकाराचे संवर्धनच होईल. ते व्हावे हाच उद्देश या स्टुडिओच्या खटाटोपामागे आहे. प्रिंटमेकिंगच्या संवर्धन व प्रसारासाठी आणखीही व्यापक उपक्रम साळवे यांनी हाती घेतला आहे.
मुंबईत व पर्यायाने महाराष्ट्रात प्रिंटमेकिंगचे जे काही अस्तित्व आहे त्यात वाय. के. शुक्ल,  वसंत परब यांचे महत्त्वाचे योगदान आहे. जे. जे. स्कूलच्या शिक्षणात प्रिंटमेकिंगची सुरुवात १९५२ मध्ये शुक्ल यांनी केली. तसेच या उपक्रमात तरुण पिढीचे चित्रकार सत्यजित चंद यांचाही सहभाग आहे.
१९७० पासून मुद्राचित्रण हे कलाशिक्षणाचा अविभाज्य भाग बनले. १९७०च्या दशकात या माध्यमात बऱ्याच प्रमाणात कलानिर्मिती होऊ लागली. कलाकार प्रिंटमेकिंग माध्यमाची स्वतंत्र प्रदर्शने करीत होते. पण यातील सातत्य कायम राहण्यासाठी स्टुडिओचा अभाव तसेच अन्य कारणांमुळे ही कला जोमदारपणे वाढली नाही हे वास्तव आहे.
हा कलाप्रकार काही अचानक अस्तित्वात आला नाही. या कल्पनेचा उगम पौर्वात्य संस्कृतीत चीन, जपान येथे पाचव्या दशकात झाल्याचे अभ्यासकांनी नमूद केले आहे. आज ज्या अर्थाने मुद्राचित्र शब्द वापरला जातो. त्या निर्मितीची सुरुवात पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपमध्ये झाली. त्या वेळी बायमधील कथा व त्यावर आधारित चित्रांसाठी म्हणजे धार्मिकतेसाठी या माध्यमाचा उपयोग केला गेला. भारतातही मिशनऱ्यांनी धर्मप्रसारासाठी गोव्यात १५५६ मध्ये छापखान्याची सुरुवात केली. अर्थात, चित्रनिर्मितीसाठी या तंत्राचा वापर भारतात ब्रिटिशांच्या राजवटीत  झाला. बंगालमध्ये विशेषत: शांतिनिकेतन येथे या माध्यमात काम केले जाई.
नंदलाल बोस,  विनायक मसोजींसारखे या तंत्राकडे आकर्षित होऊन त्या कलाविष्कार करीत होते. शांतिनिकेतनच्या ‘नंदमेळा’ उपक्रमातील कलाकारागिरीच्या वार्षिक प्रदर्शनात प्रिंटमेकिंगचा विभाग असतो. ते प्रिंट विकत घेण्यास सामान्य माणसेही जातात. अशी अभिरुची येथे आहे. येथील सोमनाथ होरे (१९२१-२००६) या चित्रकाराने आपले घर प्रिंटमेकिंगच्या स्टुडिओसाठी शांतिनिकेतन संस्थेला देणगीदाखल दिले. या स्टुडिओत कलाकारांच्या निवासाची, भोजनाची सोय आहे. अशी आत्मीयता, पायाभूत सोयींचा अभाव महाराष्ट्रातच आहे.
वास्तविक पाहता विसाव्या शतकात जागतिक स्तरावर हे माध्यम निखळ, अभिजात कलाप्रकार म्हणून मान्यता पावले आहे. परंतु भारतात मात्र त्याला दुय्यम स्थान मिळते, अशी खंत येथील अनेक चित्रकारांना वाटते. त्यात तथ्यही आहे. त्यासाठी असलेल्या त्रुटींचे निवारण होणे गरजेचे आहे. येथील चित्रकार हुसेन, गायतोंडे, तय्यब मेहता, रझा, अकबर पदमसी इत्यादी नावाजलेल्या चित्रकारांनी प्रिंटमेकिंगमध्येही काम केले आहे. पण अशी उदाहरणे कमीच. योगेश रावळ, शिंदे दाम्पत्य त्यांच्या तरुणपणी  प्रिंटमेकिंगच्या उच्च शिक्षणासाठी पॅरिसला गेले होते. शांतिनिकेतनमध्ये शिक्षण घेतलेल्या आंध्रचे कृष्णा रेड्डी व अन्य काही चित्रकार प्रिंटमेकिंगच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता पावले आहेत. तात्पर्य काय, तर या माध्यमाला स्वतंत्र कलाप्रकार म्हणून मान्यता आहे. आपल्याकडेही तसे घडावे. त्या दृष्टीने काशिनाथ साळवे यांनी केलेली एका सामयिक स्टुडिओची उभारणी महत्त्वाची आहे. त्यांच्या तळमळीला स्टुडिओची वास्तू नक्कीच ‘तथास्तु’ आशीर्वाद देईल.     

‘वास्तुरंग’ (२० एप्रिल) मधील ‘नेमके काय चुकले?’ हा लेख चंद्रशेखर खांडेकर यांनी लिहिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 1:02 am

Web Title: prof kashinath salves studio of printmaking at tha
Next Stories
1 अनधिकृत बांधकामे : शहरांची विकृतीकरणाकडे वाटचाल
2 शहाणपण देगा देवा!
3 कोनार्क: स्थापत्य आणि शिल्पकलेचा अनोखा संगम
Just Now!
X