महाराष्ट्रात जी साडेतीन शक्तिपीठं आहेत त्यामधील एक महशुर श्रद्धास्थान म्हणजे तुळजापूर भवानीमाता मंदिर. मराठवाडय़ातील उस्मानाबाद जिल्ह्यातील ‘बालाघाट’ डोंगरमाथ्यावर हे ठिकाण वसलेलं आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी एकूण ९० दगडी पायऱ्या दोन टप्प्यांनी उतराव्या लागतात.
महाराष्ट्र भूमीवरील प्रमुख धार्मिक स्थळांत अग्रेसर असलेल्या तुळजापूरच्या भवानीमाता मंदिर स्थानाला पौराणिक-ऐतिहासिक पाश्र्वभूमीसह पुरात मंदिर वास्तूचा बाज आहे. आपल्या देशात एकून ५१ शक्तिपीठं विविध ठिकाणी वसलेली आहेत. त्यातील महाराष्ट्रात जी साडेतीन शक्तिपीठं आहेत त्यातील एक महशुर श्रद्धास्थान म्हणजे तुळजापूर भवानीमाता मंदिर. मराठवाडय़ातील उस्मानाबाद जिल्ह्यातील ‘बालाघाट’ डोंगरमाथ्यावर हे ठिकाण वसलेलं आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी एकूण ९० दगडी पायऱ्या दोन टप्प्यांनी उतराव्या लागतात. पहिल्या टप्प्याच्या डाव्या हाताला प्रथम ‘कल्लोळतीर्था’चं दर्शन घडतं. मंदिर परिसरातील सर्वच तीर्थानी एकदम कल्लोळ केल्याने याला हे नाव प्राप्त झाल्याचं बोललं जातं. भक्कम दगडी बांधणीच्या या तीर्थाचं आकारमान ४०७१६ फूट असं आहे. जरासं मार्गस्थ झाल्यावर उजवीकडे गोरखतीर्थाचं दर्शन घडतं. त्यातील एका गोमुखातून सतत जलधारा वाहात असतात. या तीर्थाचं उगमस्थान वरील बाजूकडील ‘मंकावती’च्या तळय़ात आहे. हा प्रत्यक्ष गंगेचाच प्रवाह आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. गोमुख तीर्थ परिसरात अमृत कुंड, गणेश तीर्थासह विठ्ठल, दत्तात्रय, सिद्धिविनायक यांची लहान स्वरूपाची मंदिरं आहेत.
आपण दुसऱ्या टप्प्याच्या पायऱ्या उतरल्यावर भवानीमाता मंदिराच्या प्रवेशद्वारी येऊन पोचतो. याचं प्रमुख प्रवेशद्वार हे सरदार निंबाळकरांच्या नावे ओळखलं जातं. याव्यतिरिक्त मंदिर प्रवेशासाठी अन्य दोन प्रवेशद्वारे आहेतच. ती राजा-शहाजी महाद्वार आणि राजमाता प्रवेशद्वार या नावे ओळखली जातात. या भव्य प्रवेशद्वारांचं बांधकाम दगडांचं असून त्याला कमानीचा साज चढवला आहे.
प्रारंभी लागणाऱ्या तीन कमानींतून आपण प्रवेश केल्यावरच पायऱ्यांवरून खाली मार्गस्थ होत जातो. भक्त-भाविकांना सुरक्षितपणे मंदिरात प्रवेश करण्यासाठी मंदिर प्रांगणाच्या भिंतीला लागून लोखंडी कठडे उभे केले गेले आहेत. मंदिराच्या दक्षिणाभिमुख एका पितळी दरवाजावर एक लेख कोरलेला दिसतो. त्यात देवी उपासक जगदेव परमार यांनी केलेल्या आत्मसमर्पणाचा उल्लेख आहे. मंदिराच्या सभोवताली विशाल प्रांगण असून त्याची सर्व जमीन फरश्या-दगडांनी व्यापलेली आहे. बाजूला प्रशस्त ओवऱ्याही आहेतच. मंदिराच्या आवारात मोठे होमकुंडही आहेत. तसंच प्राचीन मंदिरात आढळणाऱ्या दोन दगडी दीपमाळा प्रवेशद्वारी आहेत. प्रमुख उत्सव प्रसंगी रात्रीच्या समयी या दीपमाळा प्रज्ज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्याचा परिपाठ येथे अनेक र्वष पाळला जातो. या दीपमाळा छत्रपती शिवाजीराजांनी बांधल्याचं बोललं जातं. मंदिरातील गाभारा आणि मुख्य सभामंडप यांचं बांधकाम प्राचीन शैलीचं आहे. या सभामंडपाला एकूण १६ खांब असून त्याच्या पश्चिमेस गूढ मंडप आहे. मंदिराच्या बाह्य भागावर जी शिल्पाकृती कोरलेली आहे त्यातून हत्ती, घोडे, मोर इ. पशुपक्ष्यांसह किन्नर गंधर्वाच्या मूर्तीद्वारे मंदिर सौंदर्यीकरणाचा प्रयत्न केला गेला आहे.
मंदिराच्या वाटेवर असतानाच लांबूनच मंदिर शिखर आपल्या दृष्टीस पडतं. बीड येथील भवानीमाता भक्त श्री. ढिगळे यांनी हे शिखर उभारलं आहे. या मंदिर शिखर दर्शनासाठी वेगळय़ा मार्गाची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. कळसावरील कलाकृतीमुळे ते आकर्षक दिसतं. दगडी बांधकामामुळे या मंदिरावर बाह्य वातावरणाचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. मंदिर उभारणीत हवा- प्रकाशाचा मेळही साधाला गेलाय. तसंच गाभाऱ्यातील पवित्र, नादमय वातावरणात गारवादेखील जाणवतो. ज्या भवानीमाता मूर्तीच्या दर्शनाची ओढ भाविकांना लागलेली असते ती अष्टभुजा भवानी देवीची मूर्ती मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात आहे. काळय़ा पाषाणाची सुमारे साडेतीन फूट उंचीची ही मूर्ती उंच सिंहासनावर उभी आहे. तिच्या मस्तकावरील मुकुटावर ‘सायनी लिंग’ आहे. देवीमूर्तीच्या खालील उजव्याहाती बिचवा, चक्र, धनुष्य, शंख दिसतात. देवीमूर्तीचा उजवा पाय महिशासुरावर असून उजव्या बाजूस सिंह आणि त्याखाली मरकडेय ऋषी आहे. या मूर्तीची ठेवण, एकूण सौष्ठव पाहता ती १९-१८ व्या शतकातील असावी असं जाणकारांचं मत आहे. गाभाऱ्याला लागूनच शयनगृह आणि चौपाई (पलंग) आहे. हस्तीदंती असलेला हा पलंग छत्रपतींचे वारसदार कोल्हापूर संस्थानाच्या नरेशांनी मंदिरास भेट दिला आहे. भवानी मंदिराच्या समोरच भवना शंकराचं जे लहानसं मंदिर आहे त्याच्या मध्यभागी देवी सन्मुख स्फटिकाचा सिंह दिसतो, तेच देवीचं वाहन आहे.
देवीमंदिराच्या समोरील प्रशस्त सभामंडप आहे. या ठिकाणी गोंधळ आणि जागरण स्वरूपाचे पारंपरिक धार्मिक-विधी, कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. अनेक शतकांचा इतिहास असलेल्या या भवानीमातेला त्वरिता, त्वरचा, तुरजा, तुकाई या नावांनीही संबोधलं जातं. छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनातील झंझावाती प्रवासात भवानीमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्या संघर्षमय जीवनात कठीण समयी भवानीमातेवरील श्रद्धा त्यांना मार्गदर्शनासह कामी आली. त्यासंबंधीच्या अनेक कथा आजही महाराष्ट्रात प्रचलित आहेत. छत्रपतींच्या स्वराज्य मोहिमेतील विरोधक जावळीचे मोरे यांचीसुद्धा ही कुलस्वामिनी. मोऱ्यांचा पाडाव केल्यानंतर छत्रपतींनी प्रतापगडावर भवानी देवीची स्थापना केली आणि अफझल खानाच्या वधानंतर देवीचं मंदिरही बांधलं. नेपाळमधून ‘गंडकी’ शिळेची मूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना केली. आपला शेजारी नेपाळमध्ये भाटगाव आणि काठमांडूस तुळजामातेची पुरातन मंदिरं आहेतच..
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2014 रोजी प्रकाशित
भव्य तुळजा भवानी मंदिर
महाराष्ट्रात जी साडेतीन शक्तिपीठं आहेत त्यामधील एक महशुर श्रद्धास्थान म्हणजे तुळजापूर भवानीमाता मंदिर. मराठवाडय़ातील उस्मानाबाद जिल्ह्यातील ‘बालाघाट’ डोंगरमाथ्यावर हे ठिकाण वसलेलं आहे.

First published on: 27-09-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grand tulja bhavani temple