डॉ. निर्मला रवींद्र कुलकर्णी
दिवाळी आणि घर यांचं एक अतूट नातं आहे. पाऊस ओसरलेला असल्यामुळे आणि थंडीची चाहूल लागल्यामुळे सर्वांना उत्साह आलेलाच असतो. उत्साहाच्या वेळी माणूस सर्वप्रथम वळतो तो आपल्या माणसांकडे, साहजिकच घराकडे. सिंधू संस्कृतीच्या काळात उत्तम घरं होती, दिवेही होते. त्या संस्कृतीतले लोक मातीचे दिवे वापरत असत. परंतु त्या संस्कृतीमधल्या लिपीचे अजून शास्त्रीय वाचन झाले नाही. त्यामुळे, सिंधू संस्कृतीत दिवाळी साजरी होत होती का हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
पाऊस ओसरतो. धनधान्य मुबलक असते. सुगीचे दिवस येतात. हवा आल्हाददायक होऊ लागते. जणू वातावरण जादूई होऊन जातं, अद्भुत होतं आणि अशा धुंद वातावरणात दिवाळीचा सण येतो. पूर्ण उत्सवी स्वरूप असलेला. ना फारसा कर्मकांडाचा ताण. कार्यालयीन सुट्ट्या असल्यामुळे ना कामाचा ताण. गोडधोड खावं, हवं तसं जगावं. कामसूत्रात दिवाळीच्या सणाला दिलेलं नाव सार्थ वाटू लागतं, ‘यक्षरात्री’ अद्भुत रात्री असलेला सण. दुसऱ्या एका संस्कृत ग्रंथात या सुखसुप्तिका म्हणजे सुखानं झोपण्याचा सण असं नाव दिलं आहे. एकंदरीत हा सण खूप प्राचीन आहे. इ. स.च्या पन्नासपासून हा सण भारतात साजरा होतो. त्याची नावं आणि स्वरूप थोडं फार बदलत गेलं तरी एक गोष्ट बदललेली नाही आणि ती म्हणजे दिव्यांनी घर सजवणे. घरात, मंदिरात दिव्याच्या रांगा लावणे यावरूनच ‘दिवाळी’ हे सध्याचं प्रचलित नाव या सणाला मिळालं. संस्कृत भाषेत ‘आलिः’ म्हणजे रांग. दीपावलिः म्हणजे दिव्यांची रांग. याच अर्थाचे थोडेसे काव्यात्म नाव दीपमाला, दीपमालिका काही ग्रंथांमधून आलेलं आहे.
दिवाळी आणि घर यांचं एक अतूट नातं आहे. पाऊस ओसरलेला असल्यामुळे आणि थंडीची चाहूल लागल्यामुळे सर्वांना उत्साह आलेलाच असतो. उत्साहाच्या वेळी माणूस सर्वप्रथम वळतो तो आपल्या माणसांकडे, साहजिकच घराकडे. सिंधू संस्कृतीच्या काळात उत्तम घरं होती, दिवेही होते. त्या संस्कृतीतले लोक मातीचे दिवे वापरत असत. परंतु त्या संस्कृतीमधल्या लिपीचे अजून शास्त्रीय वाचन झाले नाही. त्यामुळे, सिंधू संस्कृतीत दिवाळी साजरी होत होती का हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
दिवा म्हणजे तरी काय? अग्नीचंच रूप. अग्नीचा शोध माणसाला लागला आणि त्याचं आयुष्यच पालटून गेलं. म्हणूनच की काय तो ऋग्वेदात अगदी देवच झाला. या ग्रंथात घराचा स्वामी असलेल्या या अग्नीला सर्वात जास्त प्रार्थना आहेत. पूर्वी घराघरांमध्ये विटांची कुंडे करून त्यात अग्नी धुमसता ठेवायची पद्धत होती. रोज सूर्योदयाच्या आधी, सूर्यास्तानंतर, पौर्णिमेला, अमावास्येला या अग्नीमध्ये दुधातुपाची, कधी पुरोडाशाची (धान्याचा खापरावर भाजलेला भाकरीसारखा पदार्थ) आहुती अर्पण करीत असत. कालांतराने तिळापासून तेल काढायचा शोध लागला आणि मग तुपाच्या, क्वचित् तेलाच्या दिव्याने अग्नीची जागा घेतली.
पूर्वी सकाळ-संध्याकाळी कुंडामध्ये धुमसणाऱ्या अग्नीमध्ये इंधन म्हणून लाकडं टाकून दुधाची आहुती द्यायची पद्धत होती; त्याऐवजी मध्यंतरीच्या काळात रोज सकाळ-संध्याकाळ देवापुढे दिवा लावायची पद्धत आली. अशा रीतीनं, अग्निहोत्राचा आता किचकट वाटणारा विधी लहानशा रीतीत बदलला. आणखी काही दिवसांनी रोज देवापुढे दिवा लावणंही वेळखाऊ वाटायला लागलं, मग इलेक्ट्रिसिटीवर चालणारा दिवा देवापुढं लावायची पद्धत काही घरांनी उचलली. मनुष्याचे राहणीमान, चालीरीती अशाच सतत आणि नकळत बदलत जात असतात. आपले सणही असेच यज्ञामधून उत्क्रांत झालेत. त्यात काही लोकपरंपरा मिसळल्या आहेत.
दिवाळी सुरू होते आश्विन कृष्ण द्वादशीपासून (पौर्णिमान्त महिन्यांमध्ये कार्तिक) वसुबारसेपासून. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे दिवाळीचे दिवस. घरात आपल्याला मदत करणाऱ्या गाईगुरांपासून इतर सर्व नातेवाईकांना ओवाळणी, दान इ. देणारा आनंद घेऊन येणारा हा सण. शरद ऋतूमध्ये रात्री दीर्घ असतात, अंधार असतो. साहजिकच, अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या दिव्यांची गरज वाटू लागते. नवचैतन्य देणारा पाऊस ओसरतो, तरीही धान्यामुळे माणसाला उभारी आलेली असते. पाऊस ओसरल्यामुळे स्वच्छतेवर आलेले निर्बंध कमी होतात. सर्व संस्कृतींमधले सण असेच पर्यावरणामधून निर्माण झालेत. दिवाळी त्याला अपवाद कशी असेल.
घर स्वच्छ करणे आणि दिव्यांनी सजवणे हा यातला खूप महत्त्वाचा भाग. यशस्तिलकचम्पू हा सोमदेवानं लिहिलेला दहाव्या शतकातला ग्रंथ. या ग्रंथात दिवाळीच्या वेळी घराला रंग द्यावा असं म्हटलं आहे. नरकासुराचा वध श्रीकृष्णानं सत्यभामेच्या मदतीनं केला ही कथाही रूपकात्मकच असावी.
नीलमतपुराण हा काश्मीरमधला ग्रंथ. याच ग्रंथानं ‘सुखसुप्तिका’ हे नाव या सणाला दिलंय. या सातव्या-आठव्या शतकातला ग्रंथ सांगतो, – कार्तिक अमावास्येला संध्याकाळी लक्ष्मीपूजन करून मंदिरामध्ये दीपवृक्ष दान करावेत. दिव्याच्या माला लावलेल्या जागेवर अलंकृत होऊन नवीन वस्त्र परिधान करून जेवावे. आपली झोपण्याची जागाही सुशोभित करावी. तिथे दिवे लावावेत. सुगंधी द्रव्यांचा, धुपाचा वापर करावा. रत्नांसारख्या किमती वस्तूंनी ते सजवावं.
या दिव्यांची मोहिनी परदेशी लोकांनाही पडली होती. अनेक परदेशी लोकांनी भारताला भेट दिली. बऱ्याच जणांनी या दिव्यांच्या सणाचं वर्णन लिहून ठेवलंय. दहाव्या शतकात भारतात आलेला अबिरुनी, सोळाव्या शतकात कृष्णदेवरायाच्या दरबारात आलेला निकोलाय कोन्ती सर्वांनी दिवाळीचं म्हणजे दिव्यांनी सजवलेल्या मंदिरांचं वर्णन अप्रूपतेनं केलंय.
संदेशरासक नावाचं अब्दुल रहमान नावाच्या कवीनं रचलेलं एक काव्य आहे. मुल्तानप्रांतात रचलेला हा ग्रंथ आहे. साधारणपणे इ. स. १००० ते १२०० च्या दरम्यान रचला असेल. या काव्यात वर्णन येतं, “दिवाळीच्या रात्री प्रासाद दिव्यांनी सुशोभित करतात. हे दिवे चंद्रकोरीच्या प्रकाशाप्रमाणे मंद तेवत असतात. स्त्रिया त्या दिव्यांमधले काजळ डोळ्यात घालतात. साजशृंगार करून गडद रंगाची वस्त्रे नेसतात. शरीरावर चित्रे रेखतात. चंदनाची उटी शरीरावर लावतात. केशरचनेवर माळलेली फुले काळ्या ढगावरच्या चंद्रार्धाप्रमाणे दिसतात. या ग्रंथाची भाषा आपणा सर्वांनाच अपरिचित अशी ‘अपभ्रंश’ भाषा आहे. पण संपादकांनी त्याचा संस्कृत अनुवाद दिलाय तो असा –
नार्यः दीपान् नवशशिरेखासदृशान् करे गृहीत्वा निशि ददन्ति। तरुणज्योतिष्कैः दीपैः भुवनानि मण्डितानि। इ.
एकंदरीत, हा प्रकाशाचा सण आनंद उधळीत येतो खरा.
एकंदरीत, मनाला आनंदाचं उधाण देणारा हा सण आहे. आनंद व्यक्त करण्यासाठी नवीन कपडे, किमती वस्तू आणि मुख्य म्हणजे घरात दिवे लावले जातात. घर बांधण्याच्या पद्धती बदलल्या, घर सजवण्याच्याही रीती बदलल्या. दिव्यांचे विविध प्रकार आले. परंतु, घर स्वच्छ करून दिव्यांनी सजवणे मात्र बदललेले नाही. हा दिवा मांगल्याचं प्रतीक मानला गेलाय. त्यामुळे त्यांचं स्थान अढळच आहे.