scorecardresearch

भजन, खटखटे लाडू आणि अमाप उत्साह..

आमच्या ‘गाव गाता गजाली’ या मालिकेची संपूर्ण टीम या ऑन सेट गणेशोत्सवाच्या तयारीत दंग होती

Prahlad Kurtadkar article on ganesh festival
मालिकेद्वारे घरात बसूनच बाप्पाचं दर्शन झालं पाहिजे, असा आमचा मानस होता.

कोकणातल्या गणपतींची मजाच काही निराळी असते. हिरव्या शेतातून वाट काढत, घरच्या कर्त्यांच्या डोक्यावरून मिरवत येणारे गणपती.. त्यांच्यासाठी केलेली रानवेलींची, पाना फुलांची नैसर्गिक आरास. मोदकांचा दरवळ आणि भजनाचा गजर.. याच आठवणी जागवल्यात तोंडवलीचो सुपुत्र अभिनेता आणि लेखक प्रल्हाद कुडतरकर याने..

त्या दिवशी कोकणात शूटिंग सुरू होतं- गणपती विशेष भागाचं. अगदी पारंपरिक पद्धतीने सगळं दाखवायचं आणि तसंच करायचं, असा सगळ्यांचा प्रामाणिक प्रयत्न होता. आमच्या ‘गाव गाता गजाली’ या मालिकेची संपूर्ण टीम या ऑन सेट गणेशोत्सवाच्या तयारीत दंग होती, कारण यंदा एखाद्या चाकरमान्याला आपल्या गावी जाता आलं नाही तर त्याला मालिकेद्वारे घरात बसूनच बाप्पाचं दर्शन झालं पाहिजे, असा आमचा मानस होता. फक्त घरचा गणपतीच नव्हे, तर इतर वातावरणसुद्धा!

बाहेर सार्वजनिक गणपती मंडळात स्पीकरवर गाणी सुरूअसताना चाकरमान्याला भजनात दंग करायचं आणि त्यासाठीच नरबुवांचं भजन ठेवलं होतं. टाळ, मृदंग आणि पेटी वाजू लागले. सूर आणि ताल जुळले. भजन रंगात आलं आणि या रंगणाऱ्या भजनासोबत सगळे आपापल्या गावी जाऊन पोहोचले. प्रत्येक कलाकाराला, तंत्रज्ञाला आपल्या गावातला, आपल्या घरातला गणपती समोर दिसला. माझंही तेच झालं.. अगदी माझ्या लहानपणापासूनचा माझ्या वयासोबत वाढणारा, नव्हे समजणारा गणपती मला दिसला आणि मी कित्येक वर्ष मागे गेलो. जेव्हा दरवर्षी न चुकता गणपतीला जाणं व्हायचं, एवढंच नव्हे तर अगदी आगमनापासून विसर्जनापर्यंत राहणं व्हायचं.. ते दिवस!

साधारण गणपती जवळ आले की एसटीच्या तिकिटांसाठी धावपळ व्हायची. त्यानंतर कोकण रेल्वेच्या तिकिटांसाठी रांग लावली जायची.  दुसरीकडे नागपंचमीपर्यंत गणपतीचे पाट गावच्या गणेश शाळेत पोहोचवले जायचे. तसा तर गणपतीचा उत्साह हा पावसाबरोबर सुरू होतो. त्या दिवसांची वाट बघत ‘आता गणपती येतले.. गणपती येतलो’ म्हणत तयारीला कोकणात सुरुवात झालेली असते. गणपतीला आरास काय करायची, गणपतीची मूर्ती कशी पाहिजे, गणपतीला घरातले कोण कोण येणार आहेत, मग ते कसे येणार आहेत, कोण किती दिवस राहणार, कधी निघणार.. हे सगळं त्याच उत्साहात ठरवलं जात असतं. एकीकडे आमच्या घरातली गणपतीची मूर्ती आकार घेत असते. मला आठवतं. आमच्या जुन्या घराच्या मातीच्या भिंती रंगवल्या जायच्या. अर्थात लाल मातीने.. शेण सारवलं जायचं.. तेव्हा आम्ही भावंडं सारवण्यापेक्षा ते पसरणंच अधिक करायचो. मग घरातले आमची रवानगी खळ्यात करायचे; पण गणपतीच्या खोलीतली भिंत आम्ही नक्कीच रंगवायचो. गणपतीच्या वर लाकडी मंडपी सजवली जायची. त्याला रानवेली, फुले, नारळ, सुपारी, दूर्वा, सोनसळीची फुलं, पोफळं असं सगळं बांधलेलं असायचं. या मंडपीला काही ठिकाणी माटवीपण बांधलेली असायची. मग गणपती विराजमान होण्याची जागा सजवली जायची. यात सगळ्यांचा हातभार लागायचा. हरतालिकेच्या दिवशी घरात शहाळं आणून देत असताना, दुसऱ्या दिवशी येणाऱ्या गणपतीची वाट बघितली जायची. मखरात बघितलं की मज्जा वाटायची. आज चौरंग रिकामा आहे, उद्या इथे गणपती येणार.. समई तेवणार.. धूप, कापूर, अगरबत्तीचा सुवास.. मग जास्वंदीच्या झाडाला किती कळ्या आल्यात ते जाऊन बघणं.. उद्या गणपतीला जास्वंद लागणार ना.. एरवी आईबाबांकडे हट्ट करणारे आम्ही गणपतीला काय हवंय, काय लागणार याचा विचार करत बसायचो. त्यातच कधी तरी डोळा लागायचा. सकाळ व्हायची तीच उत्साहाने. मग गणपती आणायला बाबा, काका, भाऊ यांच्यासोबत बाहेर पडायचं. नारळ आणि बोलीचे पैसे मूर्तिकाराला देऊन बाप्पाला डोक्यावर घेतलं जायचं. मग वाडीतले सगळे गणपती एकत्र घराकडे निघायचे. आमच्याकडे एवढे गणपती आहेत, याची गंमत वाटायची. खरं तर भजनात किती खडखडे लाडू मिळणार याचाही हिशोब व्हायचा तेव्हा!

..आणि हळूहळू खळ्यात गणपती येतो. ज्याने गणपती हातात घेतला आहे, त्याच्या पायावर पाणी ओतून बाप्पा घरात प्रवेश करायचा. त्याची प्राणप्रतिष्ठा केली जायची. मोदकांचा बेत असल्याने घराघरांतून सुगंध दरवळत असतानाच कुठून तरी आवाज यायचा, ‘चला आता भजनाक जावूक व्हया.’ मग मात्र भजनांचे आरतीचे क्रमांक ठरवले जात. कुणाच्या घरी कधी भजन आणि कुणाच्या घरी काय बेत, याचंही नियोजन व्हायचं. हे आजही तसंच सुरू आहे, पण हल्ली खटखटय़ा लाडूंची जागा पावभाजी, उसळ यांनी घेतली आहे; पण हे बेत काही असला तरी प्रत्येक घरातलं भजन मात्र तेवढय़ाच उत्साहाने रंगायचं आणि आजही तसंच रंगतं. कशी कुणास ठाऊक त्या वेळी प्रत्येकात एवढी एनर्जी.. एवढा उत्साह असतो की रात्र जागवली जायची. अगदी बाप्पाला गाऱ्हाणं घातलं जायचं.. मनातलं सगळं सांगितलं जायचं आणि तो तथास्तू म्हणायचा. मग गौरी यायच्या. घरातल्या बायकांचा उत्साह वाढलेला असायचा. फुगडय़ा, गाणी सगळं पारंपरिकच. या सगळ्यामध्ये गौरी विसर्जनाचा दिवस कधी यायचा, तेही कळत नसे; किंबहुना तो दिवस येऊच नये, असं वाटायचं. पण निघताना गणपतीची आनंदात मिरवणूक काढली जायची. गावाकडे डीजे नसतानाही उत्साह असायचा आणि मग आमचा गणपती गावातल्या मोने व्हाळात विसर्जित केला जायचा. या वर्षीच्या आठवणीसोबत आणि पुढच्या वर्षीची वाट बघत सगळेच निरोप देताना म्हणतो, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या..’ आजही या परंपरेत आणि उत्साहात फरक पडलेला नाही.

यंदाचा गणपतीही अशाचा आठवणींसोबत उत्साहात साजरा होईल. तीच मजा तोच उत्साह आणि सोबत आणखी एक निमित्त आहे, या वर्षी नवीन दाम्पत्य म्हणून जोडीने गणपतीला नमस्कार करायचाय. त्यात नवीन लग्न झाल्यावर गणपती उत्सवात सांभाळायच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत, त्या पूर्ण कराव्या लागतात. त्याचीही तयारी आहेच, कारण परंपरा जपतो तो कोकणी माणूस.. तेव्हा मी माझ्या गणपतीच्या पाया पडतलंय तोंडवलीक. तुमकापण ह्य़ो गणपती सगळा काय देवो.. तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करो..गणपती बाप्पा मोरया!!!

आमच्या जुन्या घराच्या मातीच्या भिंती रंगवल्या जायच्या. अर्थात लाल मातीने.. शेण सारवलं जायचं.. तेव्हा आम्ही भावंडं सारवण्यापेक्षा ते पसरणंच अधिक करायचो. मग घरातले आमची रवानगी खळ्यात करायचे; पण गणपतीच्या खोलीतली भिंत आम्ही नक्कीच रंगवायचो. गणपतीच्या वर लाकडी मंडपी सजवली जायची. त्याला रानवेली, फुले, नारळ, सुपारी, दूर्वा, सोनसळीची फुलं, पोफळं असं सगळं बांधलेलं असायचं. या मंडपीला काही ठिकाणी माटवीपण बांधलेली असायची.

प्रल्हाद कुडतरकर writers.shelf@gmail.com

मराठीतील सर्व लेख ( Vastu-lekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor and writer prahlad kurtadkar article on ganesh festival in konkan

ताज्या बातम्या