गणपती बसवणार त्याच्यावरच्या बाजूस छोटी चौकोनी मंडपी बांधून त्याला चारी बाजूस मनकामना, आंब्याच्या डहाळ्या व मध्ये कौंडाळ बांधले जाई. गणपतीच्या आदल्या रात्री जागून सारी तयारी पूर्ण केली जाई. इतकेच नव्हे, तर एकमेकांच्या घरी जाऊन त्यांनाही मदत केली जाई. गावातील बऱ्यापैकी स्थिती असणारे पलीकडच्या बागमांडला येथे गणेशमूर्ती बनवायला सांगत आणि आदल्या दिवशी त्या मूर्ती गावी आणून सार्वजनिक वास्तूत ठेवल्या जात.

आपला सर्वाचा लाडका  गणपती येणार म्हणून लहान-थोर मग तो चंद्रमौळी झोपडीत राहणारा का असेना, आपल्या घराची साफसफाई रंगरंगोटी करण्यात दंग होऊन जातो. आमच्या कोकणात गणपती हा सगळ्यात मोठा सण! आमच्या रत्नागिरी जिल्ह्यतील वेसवी (ता. मंडणगड) या गावी मुख्यत्वे गुरव यांचा गणपतीचा कारखाना तोही वेसवी प्राथमिक शाळेजवळ त्यामुळे शाळेची मधली वा संध्याकाळी सुट्टी झाली की आम्हा विद्यार्थ्यांची गर्दी असायची ती गणपती बघायला गणपतीच्या कारखान्याजवळ. आपल्या घरचा गणपतीचा पाट पेंटरकडे गेला की आपल्या मूर्तीची अधिक उत्सुकता असायची. अगदी मूर्ती रंगवली जाईपर्यंत! आणि मग तो गणपती आम्ही मित्रांना दाखवत असू. गोकुळाष्टमी झाली की खऱ्या अर्थाने गणपतीच्या आगमनाच्या तयारीला ग्रामस्थ लागत. गणपतीचा पाट ठेवण्यासाठी टेबल शोधले जाई. (शाळेतूनही विचारीत) त्याकाळी वीज नसल्याने आमच्या कोळीवाडय़ातील बहुतांशी मुस्लिम बांधवांकडे पेट्रोमॅक्स असल्याने त्यांना विचारले की ते नाही म्हणत नसत. सारे जग पेटले तरी आमच्या गावात अजूनही हिंदू- मुस्लिमांचे तेवढेच सलोख्याचे संबंध आहेत हे विशेष!

आमचे वडीलोपार्जित घर मातीचे आणि भिंतीला जिथे जिथे भगदाडं पडलेली, दरवाजे कुजलेले, भोक पडलेल्या भिंती.. गणपतीच्या तयारीत चिखलमातीने भिंतीसह दरवाजे सपाट केले जात. हे करताना कितीदातरी माती पडत राहायची. अशा वेळी आमची चिकाटी पणाला लागायची. भिंती शेणाने सारवल्यानंतर अध्र्या भिंतींना लाल मातीचा (कावेचा) रंग लावला जाई, अर्धा भाग चुन्याने रंगवला जाई. वर्षांतून एकदा याचवेळी घराचे रंगकाम होई. घरांचे रूप पालटून जाई. घराचे काही भालेही (लाकडाचे मोठे वासे) त्याच जीर्ण अवस्थेत असत. घराच्या मधल्या खोलीत गणपती बसवले जात, त्यामुळे वरच्या ठिकाणी माळ्याला लागून सफेद चादरी वा काही मिळेल तो कापड लावून वरची शोभा बंद केली जाई. पण माळ्यावरच्या उंदीर- मांजरांचा खेळ ऐकताना दडपण येई. घरोघरी आपापल्या परीने गणपतीचे मखर बनवले जाई. गणपती बसवणार त्याच्यावरच्या बाजूस छोटी चौकोनी मंडपी बांधून त्याला चारी बाजूस मनकामना, आंब्याच्या डहाळ्या व मध्ये कौंडाळ बांधले जाई. गणपतीच्या आदल्या रात्री जागून सारी तयारी पूर्ण केली जाई. इतकेच नव्हे, तर एकमेकांच्या घरी जाऊन त्यांनाही मदत केली जाई. गावातील बऱ्यापैकी स्थिती असणारे पलीकडच्या बागमांडला येथे गणेशमूर्ती बनवायला सांगत आणि आदल्या दिवशी त्या मूर्ती गावी आणून सार्वजनिक वास्तूत ठेवल्या जात. गणपतीसाठी येणारे चाकरमानी पन्नास-साठ वर्षांपूर्वी वाहनांची आणि रस्त्यांची नीट सोय नसल्याने मुंबई- दासगाव- आंबेत व पुन्हा दासगाव आंबेतवरून बाणकोटपर्यंत असा द्राविडी प्राणायाम प्रवास करीत गावी येत. जातानाही तोच मार्ग! त्याकाळी बाणकोट, आंबेत दासगाव हा साधारण चार- पाच तासाचा लाँचचा प्रवास म्हणजे एक शिक्षाच वाटे. पोस्टाच्या कडाडकट् या यंत्रापलीकडे कुणाकडे साधी टेलीफोन सेवाही नव्हती. कुणाची ख्याली खुशाली वा कुणी गेल्याचेही पोस्टातील तार वा पत्राशिवाय कळत नसे. गावी येऊ न शकणारे चाकरमानी गावी येणाऱ्यांबरोबर घरच्यांसाठी खुशालीची चिट्ठी, पैसे, कपडालत्ता, बटर-बिस्किटेही पाठवित. गणेश चतुर्थीच्या दिवशी खालू सनईच्या वाद्यांसह मंगलमूर्ती मोरयाच्या घोषात घरोघर गणपती आणले जात. सणानिमित्त आम्हाला हमखास नवीन कपडे मिळत. सारेजण नवीन नसली तरी ठेवणीतील कपडे घातल असत. गणपती पोचवण्याचे काम झाले की खालू सनईवाले घरोघर बाजा वाजवायला जात. तेवढेच आजच्या दिवशी दोन पैसे जास्त मिळत. क्वचित कधीतरी गोडधोड मिळणाऱ्या आम्हाला गणपतीच्या पहिल्या दिवशी भरपूर मोदक खायला मिळत. नातेवाईकही देत. माझी पदमू आजी फार छान मोदक बनवायची आणि माझ्यासाठी खास राखून ठेवायची. इतक्या वर्षांनंतरही ती चव अजूनही जीभेवर रेंगाळते. गणपतीच्या दिवसातही आवर्जून आठवण येते. गणपतीच्या त्या दिवशी मात्र जेवणच नको असायचे. गणपती घरोघर बसले की आम्हा बच्चे कंपनीवरही मोठी जबाबदारी वाढे, ती म्हणजे- सकाळ संध्याकाळ घरोघरी जाऊन आरती करण्याची! घरचे लोक आपापल्या मूर्तीसाठी आरतीला असत. घरोघर प्रसाद मात्र मिळे पण खाणार किती? भटजींनी प्राणप्रतिष्ठा केली की आमची डय़ुटी सुरू होई. आमची खरी कसरत असे ती गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी. कारण या दिवशी चंद्रदर्शन घ्यायचे नाही ही अजूनही कोकणात पाळली जाणारी प्रथा! घरचे लोकही आम्हाला सक्त ताकीद देऊन ठेवायचे आणि मग काय चंद्रोदयाच्या तास दीड तास अगोदरच आरतीला सुरुवात करीत असू. निदान वीस-पंचवीस घरी आरती उरकण्यासाठी तारेवरची ही कसरत/ अर्थ कदाचित त्याकाळी माहीत नसेल, पण तो आता कळला. अक्षरश: वाघ पाठी लागल्यासारखी धावपळ करीत असू. अशातच चंद्रदर्शन झाल्याचे घरच्यांना कळले तर मोठे अरिष्ठ ओढवून आल्याचे घरच्यांना वाटे. या प्रदोष काळात बहुतांशी घरोघर धार्मिक ग्रंथांचे वाचन होई. दरवाजे अर्धवट बंद असत. घरातील फोटोतील चंद्रकोरीवरही कागद चिकटवलेला असे. गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यावर मूर्ती पासून पुढे काही अंतरावर रीपांची चौकोनी कमान उभारून त्यावरील चौकोनांवर रंगीबेरंगी ताव लावून सजावट केली जाई. गणपती आले की घर कसे अगदी चैतन्याने भरल्यासारखे वाटे. गणपतीच्या दिवसात पहाटेच उठून विजेरी घेऊन आम्ही गावापासून दूर असलेल्या शेतातील दूर्वा जास्वंदाची फुले, प्राजक्ताची फुले वेचायला जात असू. कधीतरी मस्त हलक्या पावसाचा शिडकावा व्हायचा बरे वाटायचे. अशावेळी झाडावरून टपटपणाऱ्या पावसाच्या थेंबासोबत प्राजक्ताची फुले वेचताना मजा वाटे. दुर्वा फुलांसाठी गेलेल्या गुणाकडेही मागितले तरी दुर्वा, फुले एकमेकांना दिली जात. त्याकाळी दर्शनी भागी ओटीवर सजावट म्हणून घरोघर- सिनेमांची रंगीत पोस्टर्स लावली जात. आही मुले गणपतीपेक्षाही पोस्टर्स बघण्यात आणि त्यावरील नावे वाचण्यात रमून जात असू. गणपतीत नातेवाईक, पाहुण्यांची वर्दळ वाढे. घरोघरी गणपतीच्या दर्शनासाठी रात्री उशीरापर्यंत लोक येत. बहुतांशी काजूगोळ्यांचाच प्रसाद असे. आता किलोभर नेलेले काजू गोळे पाच-सहा दिवसातही संपत नाहीत. रात्री घरोघरी भजनासाठी जात असू. यावेळी मात्र भजन करणाऱ्यांना चहा, किसलेल्या खोबऱ्याचा प्रसाद, फळे वगैरे मिळत. कधी कधी लंपासही केली जात. पण कुणी काही बोलतही नसे. पाच दिवस फुलासारखे कसे भुर्रकन उडून जात कळत नसे. गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवसापासून मात्र आता गणपती जाणार म्हणून रुखरुख लागून राहे. वाटे उद्याचा दिवस उजाडूच नये. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा झाली की गणपती विसर्जनाची वेळ येऊन ठेपे. घरातून गणपती बाहेर काढताना नकळत कंठ दाटून येई. घरातील सर्वजण बाप्पाची आरती ओवाळीत नकळतपणे काही चुका झाल्या असल्यास क्षमा मागत आणि पुन्हा सनई खालू आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात सारे लहानथोर गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सामिल होत. मूर्ती एका मागोमाग एक नदी किनारी आणल्या जातात. काहींच्या गौरीही सोबत असतात. गणपतीबाप्पांच्या साऱ्या मूर्ती एका रांगेत ठेवून धूप-दिपाने सामुदायिक आरती होते आणि विसर्जनासाठी होडीतून नेले जात. नकळत डोळे टिपले जात. गणपतीबाप्पा काही काळ नजरेसमोर तरळत असतात. आता तर घरीही जाऊ नयेसे वाटते. गणपतीच्या जागेवर रिकामा पाट मांडला जाई. घर रिते रिते वाटे. आता फक्त दोन चार घरीत अनंत चतुर्दशीला विसर्जन होणारे गणपती असत. पुढील दोन दिवसांत घरातील सजावट सोडली जाते. टेबल, पेट्रोमॅक्स पोचत्या केल्या जातात. चाकरमानीही आपल्या नोकरीच्या ठिकाणी निघतात. गाव पुन्हा एकदा आपल्या मूळ रूपावर येते.

गौरी पूजनाच्या आदल्या दिवशी प्रत्येक वाडीतील लोक गौरीचे प्रतिक म्हणून वाजत गाजत रानातून तेरडा आणत. प्रत्येक गणपतीजवळ थोडातरी ठेवला जाई. जिथे गौरअसे तिथे मोठय़ा प्रमाणात आणून तो सजवून त्याची गौर म्हणून पूजा केली जाई. रात्रभर बायका नाचत गात गौर जागवत. एकेकाळी पैशाची चणचण असलेले गावकरी गौरी पूजनाच्या दिवशी हमखास मांस मटण करीत. गोडधोडही बनवनीत. नातेवाईकांना आग्रहाचे जेवायला बोलवित. बऱ्याच दिवसानंतर असा सामिष आहार खायला मिळे.

आता खेडीपाडी सुधारली, रस्ते झाले, वीज आली, गावचे रूप पालटत गेले. नोकरी व्यवसाय वाढले. हातात पैसा आला. कधीतरी मिळणारे पक्वान्न आता नेहमीचेच झाले. सणाचे स्वरूप, साजरे करण्याची पद्धत बदलली. दिखाऊपणा वाढला. आज लहान मुले घरोघरी देवाजवळ भजन करतात आणि चार पैसे कमावणारे शहरातून आलेले चाकरमानी रात्र रात्र पत्ते कुटत बसतात. एकेकाळी ज्या भक्तीभावाने गणपतीसण साजरा होई त्यात आता बराच फरक जाणवतो. उरलाय केवळ उत्सव आणि दिखाऊपणा! त्याकाळी गावच्या ठिकाणी गणपतीसाठी लागणारे टेबल, घराच्या सजावटीसाठी लागणाऱ्या सफेद चादरी वा रोजच वापरल्या जाणाऱ्या रॉकेलच्या ढणढणत्या दिव्यांऐवजी केवळ देवासाठी पूर्ण उजेड व्हावा म्हणून. पेट्रोमॅक्स सारख्या आवश्यक वस्तू मिळवतानाही नाकी नऊ यायचे पण तरीही ते दिवस भारलेले, मंतरल्यासारखे होते. आता वीज आली, रस्ते वाहने वाढली, सर्व सोयीसुविधा उपलब्ध झाल्या, गाव कात टाकू लागले. सणांचा झगमगाटही वाढला. पण त्या दिवसांची सर आता नाही एवढे मात्र खरे, ते दिवस अजूनही मनात रुंजी घालून आहेत.

मुरलीधर धंबा  vasturang@expressindia.com