प्रश्न – १९९२ साली आमच्या शेणॉयवाडी रहिवासी संघाने आमची राहती जमीन विकत घेतली. विकत घेताना मुद्रांक शुल्क भरून ती जागा खरेदीखत नोंद करून रीतसर कागदपत्रांची पूर्तता केली, परंतु ती जागा बिनशेती नसल्याने आमच्या संघाच्या नावे कागदोपत्री दाखल झाली नाही. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन मूळ जमीन मालकांनी ती जागा अन्य पार्टीला पुन्हा विकली. त्याचे खरेदीखत व मुद्रांक शुल्क याबाबतच्या सर्व बाबी पूर्ण करून इंडेक्स टू मध्येही त्या खरेदीदाराचे नाव दाखल झाले, तर अशी जमीन जमीनमालक पुन्हा विकू शकतो का?
– नरेंद्र भुतकर, खार, मुंबई.

उत्तर – नाही. असे करणे कायद्याने गुन्हा आहे. मालकाचे हे कृत्य फौजदारी व दिवाणी गुन्ह्य़ांतर्गत मोडते.

प्रश्न – इंडेक्स टूला रजिस्ट्रार असे नाव लावू शकतो का?
– नरेंद्र भुतकर, खार, मुंबई.

उत्तर – इंडेक्स टू उतारा हा प्रत्येक नोंदणीकृत खरेदीखत, करारनामा वा अन्य तत्सम कागदपत्रांबाबत मिळतो. आपणालाही आपले जुने खरेदीखत दाखवण्यास इंडेक्स टूचा उतारा योग्य ती फी भरून मिळेल. त्यात आपले नाव खरेदीदार म्हणून असेल. त्यामुळे नंतरच्या व्यवहाराचा इंडेक्स टू मिळाला व त्यात दुसऱ्या खरेदीदाराचे नाव आहे यात काहीच वावगे नाही. इंडेक्स टूमुळे हक्कबदल होत नाही.

प्रश्न – सदर जमीन मिळकत आम्हाला परत मिळेल का?
– नरेंद्र भुतकर, खार, मुंबई.

उत्तर – याचे उत्तर शक्यता आहे, असे आहे. मात्र त्याला प्रयत्न करावे लागतील. मुळात हा व्यवहार २००८ साली झाला (दुसरा) त्यानंतर आपण काय कार्यवाही केलीत हे आपण स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे त्याबाबत मतप्रदर्शन करणे उचित होणार नाही. मात्र आपण पुढील गोष्टी कराव्यात.
१) सर्वप्रथम आपण सिटी सव्‍‌र्हे ऑफिसला आपली हरकत
     नोंदवावी.
२) संबंधित पक्षकारांना कायदेशीर नोटीस पाठवावी.
     वाटल्यास त्यासंबंधी वृत्तपत्रातून जाहीर नोटीस द्यावी.
३) सदर जमिनीचा ताबा सोडू नये.
४) शक्य तेवढय़ा लवकर तज्ज्ञ वकिलामार्फत दिवाणी व
     फौजदारी दावे दाखल करावेत.

प्रश्न – बृहन्मुंबई महापालिकेच्या भाडय़ाच्या खोलीत मी राहतो. सदर खोली माझ्या वडिलांच्या नावे होती. ५ वर्षांपूर्वी सर्व उर्वरित वारसांनी आई-वडील वारल्याने सदर खोली माझ्या नावे करण्यास प्रतिज्ञापत्र बनवून संमती दिली. आता त्या इमारतीचा पुनर्विकास होऊ घातला आहे. हा पुनर्विकास ३३(७) नियमानुसार होत आहे. बिल्डरने माझ्याशीच करारनामा केला आहे. आता जागेच्या किमती वाढल्याने ज्या वारसांनी सदर जागा माझ्या नावे करून दिली ते दादागिरी करून मला ती खोली विकण्यासाठी दबाव टाकत आहेत.
– अशोक सावंत, डिलाईल रोड, मुंबई.

उत्तर – आपणाला घाबरण्याचे कारण नाही. आपण दादागिरीला दाद देऊ नये. वाटल्यास दादागिरीविरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून ठेवावी. आपली जागा जाणार नाही.
सर्व पुरावे आपल्या बाजूनेच आहेत. आपण आपले राहण्याचे पुरावे जतन करावेत. उदा. टेलिफोन बिल, वीज बिले, गॅस बिले, करारनामा इ. इतर वारस जर न्यायालयात गेले तर आपण त्याचा प्रतिकार करावा. त्यासाठी तज्ज्ञ वकिलांची मदत घ्यावी.

प्रश्न – मी कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत १९९९ साली टेरेस फ्लॅट घेतला. त्यानंतर ३१.०३.२००३ रोजी सोसायटी स्थापन झाल्यावर टेरेसवर पत्रे टाकायची परवानगी घेतली व पत्रे टाकले. त्यानंतर सोसायटीचे एनओसी घेऊन टेरेसचा मालमत्ता कर लावून घेतला. गेली पाच वर्षे मी तो टॅक्सदेखील भरत आहे. तसेच गेली १३ वर्षे त्या टेरेसचादेखील वापर करत आहे. आता सोसायटीने विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मंजूर करून सदर टेरेस सोसायटीची आहे. टेरेस स्पेसला असणारा दरवाजा हा फ्लॅटच्या आतून नसून बाहेरून आहे, असे नकाशात दाखवले आहे. आणि न्यायालयात जाऊन सदर जागा सोसायटीची आहे, हे सिद्ध करू पाहात आहेत. बिल्डरने खरेदीखत झाल्याचे सांगून या कामी आपण काही करू शकत नाही, असे हात झटकले आहेत.
– विक्रम पालवे, कल्याण .

उत्तर – आपण दिलेल्या माहितीवरून असे वाटते की, सोसायटीच्या या पवित्र्यामागे कुणाचा तरी स्वार्थ दडलेला असावा. आपण एक गोष्ट करावी, ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीत जागेचा ताबा सोडू नये. तसेच दिवाणी व सहकारी न्यायालयात केव्हीएट दाखल करून ठेवावे व ते ‘रिन्यू’ करत राहावे. समजा संस्थेचे पदाधिकारी कोर्टात गेले तर त्याला तज्ज्ञ वकिलांमार्फत उत्तर द्यावे. आपल्या बाजूने अनेक मुद्दे आहेत. या मुद्दय़ांच्या आधारे आपण केस जिंकू शकाल.

प्रश्न – आमची सोसायटी भाडेकरू सहनिवास अशी असून ३६ पैकी १ भाडेकरूने वारसाहक्काच्या अडचणीमुळे सभासदत्व घेतले नाही. मात्र निबंधकांकडून नाममात्र सभासदत्व प्राप्त करून घेतले. आता हा नाममात्र सदस्य दिवंगत झाला आहे. त्याच्या पत्नीने नाममात्र सभासदत्वासाठी अर्ज केलेला आहे. तिला नाममात्र सदस्यत्व देता येईल का?
– वि. म. कुलकर्णी, मुंबई.

उत्तर – दिवंगत नाममात्र सदस्याची पत्नी जर त्या जागेत राहात असेल तर तिला नाममात्र सदस्य बनवण्यास कोणतीच अडचण येईल, असे वाटत नाही. त्याबाबतच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता आपण करून घ्यावी. नाममात्र सदस्याला मालमत्तेत कोणतेही अधिकार प्राप्त होत नाहीत. मात्र यापेक्षा सविस्तर उत्तर हवे असल्यास त्यासाठी सर्व पेपर, शेअर सर्टिफिकेटसह तपासून मगच यावर मतप्रदर्शन करता येईल.

प्रश्न – सुमारे सहा वर्षांपूर्वी दोन सभासदांनी त्यांच्या आईच्या नावावर असलेली सदनिका/सभासदत्व स्वत:च्या नावावर करून घेतली. मात्र गिफ्ट डीड केले नाही. नोंदणी केली नाही. कोणतीही स्टँपडय़ुटी भरली नाही. आता सोसायटी याबाबत काही कारवाई करू शकेल काय?
– विवेक कुलकर्णी, मुंबई.

उत्तर – आपण कोणत्या कागदपत्राद्वारे सदर सदनिका हस्तांतरित केलीत ते कागदपत्र पाहणे आवश्यक आहे. ते पाहिल्याशिवाय कोणतेही मतप्रदर्शन करणे योग्य ठरणार नाही. तरी आपण एखाद्या तज्ज्ञ वकिलांकडून याबाबत मत देण्यास सांगावे. आपणाला शक्य असल्यास संबंधित सदस्यांना लेखी पत्र पाठवून त्यांच्याकडे यासंबंधीची कागदपत्रे वा त्यांच्या प्रती मागवून घ्याव्यात. त्यांनी त्यास नकार दिल्यास किमानपक्षी त्यांच्याकडून इंडेम्निटी बॉण्ड (रु. २० च्या मुद्रांकावर) करून घेण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे सोसायटीची जबाबदारी निश्चितच कमी होण्यास मदतच होईल.

घैसास अ‍ॅण्ड असोसिएट्स – टॅक्स कन्सल्टंट अ‍ॅण्ड लीगल अ‍ॅडव्हायजर्स,  ब्लॉक नं. २, ‘अ’ विंग, चंदन सोसायटी, कीर्तीकर कंपाऊंड, नूरी बाबा दर्गा रोड, मखमली तलावाजवळ, ऑफ एलबीएस रोड, ठाणे (पश्चिम)- ४००६०१. दूरध्वनी क्र. ०२२-२५४०१८१३, २५४००६५९, २५४१६३३६, ६९५२०५१८.