राज्याच्या विविध भागांतून मुंबई पोलीस दलात भरती झालेल्या १७ हजारहून अधिक पोलिसांनी यंदा पहिल्यांदाच टपालाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आतापर्यंत हे पोलीस मतदानापासून वंचित राहत होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत यापैकी काही पोलिसांना मतदानाचा हक्क बजावता आला होता. परंतु मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी या पोलिसांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी टपालाद्वारे मतदान उपलब्ध करून दिले. अशा पोलिसांना आपले नाव नोंदविण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार तब्बल १७ हजारहून अधिक पोलिसांनी हा अधिकार बजावला. या पोलिसांना बंदोबस्तामुळे आपल्या गावी जाऊन मतदान करता येणे शक्य नव्हते. ते यंदा शक्य होऊ शकले, असे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले.