पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, मनसे सारेच पक्ष राष्ट्रवादीवर प्रचारात भ्रष्टाचाराचे आरोप करीत असले तरी वर्षांनुवर्षे आरोप करणारे नेते हे आरोप सिद्ध करू शकले नाहीत, असा प्रतिहल्ला राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी चढविला. राष्ट्रवादीमुळे सरकारच्या प्रतिमेवर वाईट परिणाम झाला, असे पृथ्वीराज चव्हाण यांना वाटते मग साडेतीन वर्षे पद भोगले तेव्हा आठवण झाली नाही. तसे होते तर तेव्हाच खुर्ची का सोडली नाही, असा सवालही केला.
राष्ट्रवादीवर चोहोबाजूने होणाऱ्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर पक्षाची प्रतिमा सुधारण्याकरिता पवार यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करणारे ते सिद्ध करू शकले नाहीत, अशी भूमिका मांडली. राज्यात स्थैर्यासाठी सामंजस्याची भूमिका घेतली, असे पवार यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने आयोजित केलेल्या वार्तालापात स्पष्ट केले. आघाडीची काँग्रेसची मानसिकताच नव्हती. मात्र यामुळे आमचे नुकसान झाले. कारण १३० जागा लढण्याची तयारी आम्ही केली होती. पण एकदम २८० जागा लढाव्या लागल्याने प्रचारात आम्ही काही ठिकाणी कमी पडलो, असे पवार यांनी सांगितले.
शिवसेनेचे कौतुक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना संपेल, असे चित्र उभे केले गेले. पण उद्धव ठाकरे यांनी मेहनत घेऊन शिवसेना मजबूत केली. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशात शिवसेनेचे योगदान मोठे आहे. शिवसेनेच्या मतांमुळेच महायुतीला विजय शक्य झाल्याचे सांगत पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.
इकडे-तिकडे नजर नाही
निकालानंतर वेगळी राजकीय समीकरणे तयार होतील का, या प्रश्नावर तशी वेळच येणार नाही, असा दावा केला. निकालानंतर जे काही ठरवायचे ते ठरवू. पण आम्ही इकडे-तिकडे नजर ठेवणार नाही, असे सांगत पवार यांनी नेहमीच्या पद्धतीने गुगली टाकली. भाजपबरोबर जाणार नाही याचा पुनरुच्चार करताना केंद्रात संरक्षण खाते आपल्यासाठी रिक्त ठेवण्यात आल्याचा प्रश्न त्यांनी उडवून लावला.
आर. आर. आबांना खडसावले
बलात्कारावरून केलेले वादग्रस्त विधान माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या अंगलट आले असतानाच हे विधान नुसतेच आक्षेपार्ह नाही तर निंदनीय आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आबांना रविवारी चांगलेच खडसावले.