‘छत्रपतींचा आशिर्वाद, चलो चले मोदी के साथ’ ही घोषणा देत विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविलेल्या भाजपने नेतानिवडीची बैठक घेण्यासाठी विधानभवनात दाखल होताना सारे वातावरण ‘भगवामय’ केले होते. छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभाराप्रमाणेच आदर्श, विकासाभिमुख व पारदर्शी कारभार राज्यात करण्याची ग्वाही नवनिर्वाचित विधिमंडळ नेते आणि भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भाजप कार्यालयात मंगळवारी सकाळपासूनच उत्साही वातावरण होते. शेकडो कार्यकर्त्यांचा गराडा, नेते व पदाधिकाऱ्यांची लगबग, पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि गटागटाने सुरु असलेल्या राजकीय चर्चा हे चित्र दुपापर्यंत होते. मुख्यमंत्री कोण होणार, याचे तर्कवितर्क आणि खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन ब्रेकिंग न्यूज सुरु होत्या. ज्येष्ठ नेते राजनाथसिंह, सरचिटणीस जे.पी. नड्डा व अन्य नेते प्रदेश कार्यालयात दाखल झाले आणि घडामोडींनी वेग घेतला. प्रदेश नेत्यांशी त्यांची बैठक सुरु झाल्यावर अन्य आमदार भगवे फेटे परिधान करुन प्रदेश कार्यालयातून बाहेर पडले आणि विधानभवनापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. शिवरायांचा जयजयकार वातावरणात घुमला. प्रदेश कार्यालयापासून विधानभवनाच्या मार्गावर सर्वत्र भगव्या पताका व भाजपचे झेंडे लावण्यात आले होते.
भगवे फेटे परिधान केलेल्या भाजप आमदारांनी व नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि त्यांना अभिवादन केले. फडणवीस व अन्य नेत्यांनीही शिवाजी महाराजांना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना हे समीकरण रुढ झाले होते. पण निवडणुकीपासून त्याला छेद देण्याचा प्रयत्न भाजपने केला आणि विधिमंडळात प्रवेश करतानाही शिवरायांच्या नावाचा गजर केला.
पक्षात अनेक नेते पदासाठी योग्य
पक्षात अनेक नेते या पदासाठी योग्य होते, असे सांगून फडणवीस यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी आपली निवड केल्याबद्दल आभार मानले. जनतेचे सरकार खऱ्या अर्थाने सत्तेवर येईल. मोदी यांनी देशात ज्याप्रमाणे विकासाच्या मार्गाने वाटचाल सुरु केली आहे, त्याच पध्दतीने राज्यात पावले टाकली जातील. जनतेच्या अपेक्षांची पूर्ती केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंडेंच्या आठवणीने फडणवीस गहिवरले
या क्षणी मला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची तीव्र आठवण येत आहे, असे सांगताना क्षणभर देवेंद्र यांचा स्वर कातर झाला. त्यांचे आशीर्वाद आणि पाठबळ आपल्यासोबत आहे, असा मला विश्वास आहे, असे ते म्हणाले.