भाजपचे अल्पमतातील सरकार असल्याने विश्वासदर्शक ठराव आधी की राज्यपालांचे अभिभाषण आधी करायचे, यावर खल सुरु आहे. त्यासाठी कोणताही नियम आड येत नसून सरकारने त्याचा निर्णय घ्यावा, असे कायदेशीर मत विधिमंडळ सचिवालयाने दिले आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त मतदानाने होणार असल्याने आमदारांनी सरकारच्या बाजूने किंवा विरोधात मतदान केले, हे समजू शकणार नाही.
विधिमंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम विधिमंडळ सचिवालयाने जाहीर केला असून अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी सकाळी १२ वाजेपर्यंत आहे. त्यानंतर लगेच अर्जाची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत आहे. एकाहून अधिक उमेदवार असल्यास सकाळी ११ ते १ या वेळेत गुप्त मतदान घेतले जाईल आणि दुपारी दोन वाजेपर्यंत मतमोजणी होईल. राज्यपालांचे अभिभाषण दुपारी चार वाजता होणार आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणात सरकारच्या धोरणाचे प्रतिबिंब उमटलेले असते. पण हे अल्पमतातील सरकार असल्याने ते टिकणार की पडणार, हे विश्वासदर्शक ठरावानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अभिभाषणाआधी ठराव मंजूर करुन घ्यावा, असे सरकारचे मत आहे. अंतिम निर्णय मंगळवारी होणे अपेक्षित आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या वेळी कोणती भूमिका घ्यायची, याचा निर्णय आमदार घेतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केले आहे.