निवडणूक निकालपूर्व चाचण्यांचा कल भाजपच्या बाजूने दिसताच भाजपमधील नेत्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षा धुमारे फुटू लागले आहेत. रविवारी राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार असून, भाजपचा एकेकाळी राज्यातील चेहरा असलेल्या दिवंगत गोपिनात मुंडे यांच्या कन्या आणि भाजपच्या राज्यातील नेत्या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे.

सत्तेमध्ये बसण्याचा अंदाज येताच भाजपचे राज्यातील नेते त्यांच्या परिने मुंख्यमंत्रीपदावर दावेदारी सांगू लागले आहेत. ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना पंकजा मुंडे यांनी त्यांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वकांक्षा जाहीर केली. “होय मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये आहे. जर पक्षाने माझ्यावर तशी जबाबदारी टाकल्यास मी ती आनंदाने स्विकारील.” असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.   

परळी या त्यांच्या मतदारसंघातील निवडणुकीची धामधुम संपल्यावर पंकजा शुक्रवारी मुंबईमध्ये दाखल झाल्या आहेत. जनतेचा मोठा पाठींबा असलेल्या भाजपच्या नेत्या अशी ओळख तयार करण्यात पंकजा मुंडे यशस्वी झाल्या आहेत. निवडणुकीपूर्वी राज्यभरात संघर्ष यात्रेच्या माध्यमातून तशी चुणूक पंकजा मुंडे यांनी भाजपच्या इतर शहरी नेत्यांना दाखवून दिली आहे.

जर राज्यामध्ये सरकार स्थापण्यात भाजप यशस्वी झाल्यास भाजपचे नेते एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि सुधीर मुनगुंटीवार यांच्या बरोबर पंकजा मुंडे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये असणार आहेत.

पंकजा त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या महत्त्वकांक्षेला ठामपणे दुजोरा देत आहेत. या मोठ्या जबाबदारीसाठी त्यांचा प्रशासकीय अनुभव कमी असल्याचे पंकजा यांच्या लक्षात आणून दिल्यावर, मुख्यमंत्रीपदासाठीच्या इतर दावेदारांना देखील या मोठ्या जबाबदारीचा अनुभव नसल्याचे त्या सडेतोडपणे सांगतात. “शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये एकटे एकनाथ खडसे यांनीच काम केले आहे. देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि सुधीर मुनगुंटीवार यांनीतरी कुठे सरकारमध्ये काम केले आहे.” असा सवाल पंकजा यांनी उपस्थित केला.    

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझे बाबा हे संपूर्ण राज्याचे लोकनेते होते. ते राज्यात काम करत होते तेव्हा इतर नेते त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यांमध्ये काम करत होते. मला माहीत आहे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमधील इतर नेते माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत. मात्र, मी देखील पहिल्यांदाच आमदार झालेली नाही. भाजप युवा मोर्चाची अध्यक्षा असताना मी राज्यभर फिरून सभा घेतल्या आहेत. तळागाळात जनसंपर्कवाढवला आहे.” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
मोदी, शहांचे पंकजा मुंडेंना राजकीय बळ