scorecardresearch

आठवले, जानकरांना मुख्यमंत्री करा

घटक पक्षांच्या नावाने एकमेकांवर कुरघोडी करण्याची खेळी करणाऱ्या शिवसेना-भाजपला तोडग्याची वाट पाहून कंटाळलेल्या लहान पक्षांनीही चांगलाच हिसका दाखवला.

घटक पक्षांच्या नावाने एकमेकांवर कुरघोडी करण्याची खेळी करणाऱ्या शिवसेना-भाजपला तोडग्याची वाट पाहून कंटाळलेल्या लहान पक्षांनीही चांगलाच हिसका दाखवला. आम्हाला एकही जागा नको, पण रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना अडीच वर्षे व राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री करा, असा प्रस्ताव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ठेवला, आणि चर्चेच्या बैठकीत सेना-भाजपचे नेते काही क्षण गप्पगार झाले..
शिवसेना-भाजपमध्ये घटक पक्षांना किती व कुणी जागा द्यायच्या यावरुन पेटलेला वाद मिटवण्यासाठी मंगळवारी रात्री वांद्रा-कुर्ला संकुलातील एका हॉटेलमध्ये महायुतीची बैठक झाली. बैठकीला भाजपचे देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे-पालवे, शिवसेनेचे संजय राऊत, सुभाष देसाई, रामदास कदम, रिपाइंचे रामदास आठवले, अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, रासपचे महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे विनायक मेटे आदी नेते उपस्थित होते.
महायुतीतील चार लहान घटक पक्षांना केवळ सात जागा देण्याची भाषा ऐकून आठवले, शेट्टी, जानकर, मेटे सारेच संतप्त झाले. विधानसभा निवडणुकीतील जागावाटपासंदर्भात २८ जुलैला महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्यावेळी चार पक्षांनी आपल्या जागांची यादी सेना व भाजपला दिली. त्यानंतर एकदाही एकत्रित चर्चा नाही. आता शेवटच्या क्षणाला सात जागा आमच्या तोंडावर फेकून आमचा अपमान करता आहात काय, असा खडा पवित्रा या नेत्यांनी घेतला. त्यामुळे सेना-भाजपचे नेते अस्वस्थ झाले.
राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्ट सरकारला सत्तेवरुन खाली खेचायचे आहे, गोरगरीबांना न्याय द्यायचा आहे, ही तुम्ही भूमिका मांडली म्हणून आम्ही तुमच्या सोबत आलो. तुम्ही आम्हाला भीक दिल्यासारख्या सात जागा देत आहात. आम्हाला एकही जागा नको. फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेता, तर मग  रामदास आठवले व महादेव जानकर यांना मुख्यमंत्री करा, दलित व धनगर समाजाचा आम्ही मुख्यमंत्री केला, असा संदेश द्या महाराष्ट्राच्या जनतेला. राजू शेट्टी यांच्या या प्रस्तावाने सेना-भाजपचे नेते थंडगार झाले.

मराठीतील सर्व विधानसभा ( Vidhansabha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Make ramdas athawale mahadev jankar cm of maharashtra

ताज्या बातम्या