28 January 2021

News Flash

‘डायलेक्टिक्स’ : वैचारिक पूर्वपीठिका

संघर्ष (स्ट्रगल) उफाळल्यामुळे ते पुढे नेणाऱ्या दिशेने, म्हणजे बलवानांना क्षीण करत व बलहीनांचे बल वाढवत, सरकू शकते.

 

मार्क्‍सवादी, आमच्याकडे विरोध-विकास-वाद डायलेक्टिक्सनावाची अभिनव विचारपद्धती आहे, असा दावा करून, विकासच रोखतात! तरीही द्वंद्वात्मक दृष्टीतून काही घेण्याजोगे..

संघर्षांमुळेच विकास होतो अशी एक धारणा मांडली जाते. पण फक्त संघर्ष नव्हे तर, विधायक असेही काही घडावे लागते, याकडे दुर्लक्ष केले जाते. हितविरोध निर्माण होतच असतात. अशा विरोधी गटांत, काही एका प्रमाणात, एक बल-संतुलन टिकून असते. संघर्ष (स्ट्रगल) उफाळल्यामुळे ते पुढे नेणाऱ्या दिशेने, म्हणजे बलवानांना क्षीण करत व बलहीनांचे बल वाढवत, सरकू शकते. उलटय़ा दिशेनेही सरकू शकते. अगदी एका बाजूने दुसऱ्या बाजूला चीतपट केले तरी, हितविरोधाची सोडवणूक सापडली, असे होत नाही. सोडवणूक सापडल्याशिवाय, हितक्य किंवा गुणात्मकरीत्या नव्या प्रकारचा हितविरोध, निर्माण होत नाही. ही सोडवणूक (रिझोल्यूशन ऑफ कन्फ्लिक्ट) शक्य करणारे घटक नुसत्या संघर्षांत नसतात. ते संघर्षांबाहेरून यावे लागतात. कुठे तरी, कोणाचे तरी, हितक्यही असते म्हणूनच विधायक प्रक्रिया चालू असतात व अशा विधायक प्रक्रिया सोडवणुकी पुरवतात. म्हणजेच नुसताच संघर्ष हा द्वंद्वात्मक नसून ‘द्वंद्व’ हे, हितविरोध आणि हितक्यदेखील, असे असते. नेमके हेच दुर्लक्षित करून एकांगी संघर्षवादाचा प्रसार केला जातो.

कॉम्रेड चेअरमन माओ यांची मांडणी संघर्षवादी आहे. त्यांनी ‘ऑन काँट्रॅडिक्शन’ नावाचे पुस्तक लिहिले. त्यात काँट्रॅडिक्शन हा शब्द ताíकक – व्याघात म्हणून नव्हे तर कन्फ्लिक्ट/ स्ट्रगल या अर्थाने वापरला. चिनी क्रांतीची रणनीती ठरविणे म्हणजे तत्त्वज्ञान मांडणे नव्हे. काँट्रॅडिक्शन हा शब्द वापरल्यामुळे साध्या तर्कशास्त्रापेक्षा वेगळे असे ‘द्वंद्वात्मक तर्कशास्त्र’ आपण उभारले आहे असे होत नाही. ‘हो तरी नाहीतर नाही तरी’, हे सामान्य द्विध्रुवी (बायपोलर) तर्कशास्त्र असते. अधल्यामधल्या अवस्थासुद्धा लक्षात घेणे याला फजी-लॉजिक म्हणतात. डायलेक्टिकल-लॉजिक नव्हे.

डायलेक्टिकल-लॉजिक हा शब्द हेगेलपासून वापरात आला. तेव्हा हेगेलने ‘विश्वात्म्याची जीवनकथा’ या अर्थाने तो वापरला होता. ‘तर्कशास्त्र’, असे त्याला म्हणायचे नव्हते. लॉजिक किंवा काँट्रॅडिक्शन हे शब्द भलत्याच अर्थाने वापरणे, म्हणजे सर्वच समस्या सोडवण्याची अनोखी गुरुकिल्ली गवसणे, नसते.

गतिशीलता पकडण्याचे आव्हान

विरजण लावलेले दूध हे हळूहळू ‘दूध’पण गमावत असते आणि ‘दही’पण कमावत असते. त्याला दूध तरी म्हणा किंवा दही तरी म्हणा असे द्वैत चालत नाही. अर्थात सरकणारी मात्रा आणि बदलत चाललेला गुण हे अर्थपूर्ण असल्याने येथे ताíकक व्याघात येत नाही. गतिशीलता ही अशी भन्नाट गोष्ट आहे की ती अनेक स्थितींमधून जाते मात्र कोणत्याच स्थितीत स्थिर नसते. कॅलक्युलस या गणित शाखेने ही अडचण प्रथम सोडवली. बिंदू आणि अंतर या तत्त्वत भिन्न गोष्टी असूनही अत्यल्प मात्रा घेतली तर एका अंगाने बिंदू आणि दुसऱ्या अंगाने अंतर असे धरून गणित करता येते. तसेच क्षण आणि अवधीबाबत आहे. कोणतेही दोन परस्परावलंबी वक्र – ‘चल’ असले की ही स्थिती-गती अडचण येते. अनेक (जणू स्थिर) बिंदूंशी नाते सांगणाऱ्या अनेक अत्यल्प अंतर-उडय़ा मानून त्यांचे गाणित सुटते. शून्यप्राय पण शून्य नव्हे, अशी द्वंद्वात्मक संकल्पना मानल्यानेच कॅलक्युलस शक्य झाले. पण कॅलक्युलसमधल्या या डायलेक्टिकला कोणाही मार्क्‍सवाद्याने दाद दिल्याचे माझ्या वाचनात किंवा ऐकण्यात नाही.

फ्रेडेरिक एंगल्सने ‘डायलेक्टिक्स ऑफ नेचर’ हे पुस्तक लिहून भौतिकशास्त्रालाही नवी रीती मिळते असा दावा केला आहे. एंगल्सचे प्रारूप एका दृष्टांताच्या साह्य़ाने पाहू.

घटिका-पात्र पाण्यावर तरंगते आहे. त्याच वेळी ते छिद्रातून येणाऱ्या पाण्याने भरलेही जात आहे. याला मात्रात्मक बदल असे म्हणू. ज्या क्षणी ते पुरेसे भरते त्या क्षणी ते तरंगणारे न राहता बुडणारे बनते हा झाला गुणात्मक बदल. बुडत असताना ते जो प्रवास करते तो पुन्हा मात्रात्मक बदल आणि तळाशी जाऊन स्थिरावते हा पुन्हा गुणात्मक बदल. तीनही अवस्थांत कोणते ना कोणते विरोधी-बल-संतुलन असतेच. बल-संतुलनालाच एंगल्स काँट्रॅडिक्शन म्हणतो! स्थिर-चल-स्थिर या अवस्थाबदलांना तो नकाराचा नकार म्हणजे नवा होकार हे (हेगेलसदृश) रूप देतो. गुण/ मात्रा, बल-संतुलन आणि नवी अवस्था हे सिद्धांत वापरून कशाचाही खुलासा करता येतो असे एंगल्सला वाटते. पण सगळेच प्रक्रियाक्रम फिट्ट ‘असे’च असत नाहीत. यातून भौतिकशास्त्रात कोणतीच भर पडत नाही व मानवी इतिहास त्यात कोंबताना ओढाताण व दिशाभूलच पदरी येते.

लाओ त्सू, काण्ट, हेगेल आणि मार्क्‍स

लाओ त्सू यांनी, जो एका बाजूने चढ असतो तोच दुसऱ्या बाजूने उतारही असतो, अशा अंगाने परस्परविरोधी गोष्टींचे ऐक्य दाखवून दिले. यिंग – यांग ही तत्त्वे एकमेकात गुंफलेलीच राहतात, ही दृष्टी आध्यात्मिक साधनेतील ‘समदृष्टी’साठी उपयोगाची असली, तरी मानवी इतिहासाचे गतिशास्त्र या अंगाने तिचा संबंध येत नाही.

काण्टने डायलेक्टिक हा शब्द अत्यंत वेगळ्या अर्थाने वापरला आहे. जेव्हा मानवी विचारशक्ती तिच्या मर्यादांना जाऊन थडकते तेव्हा उलटसुलट अशी दोन्ही विधाने मान्य करण्याचा प्रसंग येतो. उदाहरणार्थ पूर्ण विश्व हे अनंतही मानावे लागते. कारण त्यातून काहीच वगळता येत नाही. पण अनंत म्हणजे निरंतर अनुत्तरित राहणारी वाढती सीमा. ही पूर्ण कशी होऊ शकेल? पूर्ण म्हणावे तर अनंत नाही. अनंत म्हणावे तर पूर्ण नाही. अशा ज्या पंचाईती होतात त्यांना काण्ट अँटिनॉमीज्  म्हणतो. साधा घटक मानल्याशिवाय संघात बांधता येत नाही पण हा साधा वाटणारा घटक स्वतच एक संघात असू शकतो ही दुसरी एक अँटिनॉमी आहे. हे सांगण्यामागे काण्टची दृष्टी अशी की विचार जेव्हा पराकोटी गाठतो तेव्हा तो अडखळतो. पराकोटी या कधीच प्राप्य नसतात, तरीही त्या दिशादर्शक ध्रुव म्हणून लागतात, हे काण्टला सांगायचे आहे. अर्थात काण्टचे योगदान याहूनही बरेच काही आहे.

स्थितीचे तत्त्वज्ञान न मानता प्रक्रियेचे तत्त्वज्ञान मांडण्याचे श्रेय हेगेलला जाते. परंतु हेगेलने त्याला आवडलेले एकच एक प्रारूप दणकून सर्वच गोष्टीना लावले हे त्याचे हुकले.

ते प्रारूप असे, ‘‘एक वृत्ती ही स्वततूनच स्वतला उलटी वृत्ती निर्माण करते. यामुळे होणारी पंचाईत सोडवण्यासाठी दोन्ही वृत्ती संयुक्त होऊन पंचाईत सोडवणारी तिसरीच वृत्ती निर्माण करतात. परंतु या संयुक्त वृत्तीला पुन्हा उलटी वृत्ती निर्माण करावी लागतेच आणि असेच चालू रहाते’’ ‘थिसिस अ‍ॅण्टिथिसिस सिंथेसिस’ या नावाने हा ‘सिद्धांत’ ओळखला जातो.

पण हेगेल इथेच थांबला नाही. त्याच्या अफाट कल्पनाशक्तीच्या जोरावर त्याने ‘ विश्वचतन्याची जीवनकथा’ स्वतच रचून टाकली.

दुसरे असे की, सगळे अंतिमसत्य एकदाच  सांगून टाकणाऱ्या सर्वच तत्त्वज्ञांत जो दोष असतो, तो हेगेलमध्येही होताच. हा दोष असा की, ‘‘मला तुम्ही सांगताय त्यापेक्षा वेगळे आढळते आहे,’’ असे जर कोणी म्हणाला तर ‘हा तुझा भ्रम आहे’ असे उत्तर मिळते. फ्रॉइडवादातही हाच दोष होता. जर आईविषयी आकर्षण वाटत नाही असे कोणी म्हणाला तर, ‘‘बघ तू किती दमन करून टाकले आहेस,’’ हे उत्तर. बरे, आकर्षण वाटते म्हणाला तर, ‘‘तेच तर मी म्हणतोय,’’ हे उत्तर. चीत भी मेरी पट भी मेरी असा हा न्याय. मार्क्‍सवादात विशेषत्वाने लुकाच याने लावलेल्या अर्थानुसार असाच दोष येतो. जर भांडवलशाहीत कामगार सुखी असेल तर तो त्याचा भ्रम आणि जर तो दु:खी असेल तर ते त्याचे यथार्थज्ञान. असे मायावादी सिद्धांत कधीच तपासता येत नाहीत. कारण खोटे ठरण्याची सोयच त्यांनी ठेवलेली नसते. म्हणूनच कार्ल पॉपर म्हणतो, ‘जर तुमचे विधान कोणत्या आढळणुकीने खोटे पडेल? हे तुम्ही सांगणार नसाल, तर तुमचे विधान अ-वैज्ञानिक असेल.’

मग मार्क्‍समधले डायलेक्टिक्स कोणते? ‘‘जी कल्पना जनतेचे स्वप्न बनते ती एक भौतिक शक्तीच बनते.’’ या वचनावरून असे दिसते की मार्क्‍स हा जड-नियतीवादी नव्हता. इतिहासाच्या मर्यादेत का होईना, पण संकल्प-स्वातंत्र्याला वाव आहे व तो वापरून इतिहासाला वळणही देता येते, हे तो मानत होता आणि हे डायलेक्टिकल/द्वंद्वात्मक आहे.

‘हे तरी खरे असेल नाही तर ते तरी!’ असे अनेक विरोधी जोडय़ांबाबत वाटू शकते. पण दोन्ही खरेही व महत्त्वाचेही असते. चित्- जड, आत्मनिष्ठ- वस्तुनिष्ठ, संघर्ष- समन्वय, व्यक्ती- समष्टी, मूल्ये- तथ्ये, कारणत्व- यदृच्छा, क्रमप्राप्तता- स्वातंत्र्य, प्रयत्न- स्वीकार, नैतिकता- धोरणीपणा, अशा अनेक जोडय़ा अशा डायलेक्टिकल असतात. केवलता-वाद (अब्सोल्यूटिझम) आणि सापेक्षता-वाद (रिलेटिव्हिझम) हे दोन्ही टाळावे व मुख्य म्हणजे एकांगीपणा टाळावा हा संदेश आहे.

लेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल :  rajeevsane@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2018 1:24 am

Web Title: marxists development
Next Stories
1 तंत्र व मानव्य : विद्यांमधील दुभंग
2 नोटा-बदली : पूर्वतयारी हवी होती
3 संधीच्या समतेसाठी सक्षमीकरण
Just Now!
X