22 October 2020

News Flash

उत्पादकता: गुणाकाराने चमत्कार

‘फले’ अन्यफलांचा ‘स्रोत’, हा ‘गुणाकार’

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

रोजगारसंधी वाढताना ‘श्रमप्रकार’ मात्र बदलत जातात व ‘रोजगारलवचीकता’ जास्त जास्त आवश्यक ठरते. परंतु रोजगार म्हणजे ‘परमनंट नोकरी’ हा घट्ट समज दूर करावा लागेल. त्याआधी उत्पादकता म्हणजे नेमके काय? व ती कोणकोणत्या स्वरूपात असते, हे आज समजावून घेऊ.

उत्पादकता= फल/ स्रोत ही खूपच व्यापक आणि बहुआयामी संकल्पना आहे. वाहनाचे ‘मायलेज’ किलोमीटर/ लिटर (इंधन) अशा परिमाणात दिसेल. जे काय फल असेल आणि जो स्रोत असेल त्यांची परिमाणे उत्पादकतेच्या गुणोत्तराला चिकटतात. टन/एकर ही शेतीमालाची जमीनउत्पादकता झाली. पण इतरही स्रोत लागतात म्हणून ‘पाणी-उत्पादकता’, ‘श्रम-उत्पादकता’ अशा सर्व उत्पादकता लक्षात घ्याव्या लागतात. एकुणातच उत्पादकतेचा उल्लेख ‘अमुकस्रोताची तमुकफलउत्पादकता’ असा केला पाहिजे.

एलईडी बल्ब ६० वॅट्समधून मिळणाऱ्या प्रकाशाइतका प्रकाश केवळ ७ वॅट्समध्ये देतो. एलईडीचा शोध मोदींनी लावलेला नाही. (तसा काय संडासाचा शोध तरी त्यांनी कुठे लावलाय?) पण पुढाकार घेण्याला महत्त्व आहे. असो. वीज हा स्रोत आहे तर प्रकाश हे फल आहे. म्हणजे एलईडी बल्बमध्ये विजेची ‘प्रकाश-उत्पादकता’ वाढते.

कमी आणि अधिक

फायबर ऑप्टिक्समधला एकच धागा एकाच वेळी अनेक संदेश, एकमेकांत न मिसळू देता, वाहून नेतो. ही केबलची ‘संदेश-उत्पादकता’ झाली. पोरस-पाइप सिंचनात (ठिबक सिंचनाच्या पुढची पायरी!) मुळांना थेट पाणी पोहोचते. पाणी तर भरपूरच वाचतेच पण दर एकरी उत्पादनही वाढते. म्हणजे पाण्याची ‘पीक-उत्पादकता’ आणि जमिनीचीही ‘पीक-उत्पादकता’ वाढते. थर्मोकोलचे वजन त्याच्या ताकदीच्या मानाने फारच कमी असते. म्हणजे वजनाची ‘ताकद-उत्पादकता’ जास्त असते.

घर लहान असेल तर त्या जागेत जास्तीत जास्त गोष्टी कशा मावतील असे आपण बघतो. उदाहरणार्थ डायनिंगटेबल नको असेल तेव्हा भिंतीवर राहील असे बिजागिरीचे फोल्डिंगवाले बनवतो. इथे जागा हा ‘स्रोत’ आहे. स्रोतबचत जागेची केली जाते. सुविधा/जागा हे गुणोत्तर वाढते म्हणजेच जागेची ‘सुविधा-उत्पादकता’ वाढते.

हल्ली ढबूळ बोरे स्वस्तात मिळतात. पण चव अगदीच बेताची असते. म्हणजे पिकवणाऱ्याच्या स्रोतांची ‘वजन-उत्पादकता’ वाढली तरी वजनाची चवउत्पादकता घटलेली असते! उलट चेकनट नावाने ‘मेहरूमणी’सदृश बोरे मिळतात ती लहान आणि महागही असतात. पण त्यांची ‘चव-उत्पादकता’ उत्तम असते. म्हणजेच फलाची फक्त मात्रा वाढणे एवढेच उत्पादकतेत अभिप्रेत नसून फलाची गुणवत्ता वाढणे हेदेखील अभिप्रेत असते. औषधाचे वाईट साइडइफेक्ट्स म्हणजेच ‘ऋ ण-फले’ कमी होणे, हीसुद्धा फार्मसीत झालेली उत्पादकतावाढच असते. ‘फल’वर्धन हे उत्पादकतेचे एक अंग आहे. तर ‘स्रोत’बचत हे दुसरे तितकेच महत्त्वाचे अंग आहे.

‘फले’ अन्यफलांचा ‘स्रोत’, हा ‘गुणाकार’

वर एल.ई.डी.मुळे प्रकाशउत्पादकता वाढते येथेच आपण थांबलो. पण प्रकाश हाही स्रोत बनतो. वाचन करणे वगरेसाठी पुरेसा प्रकाश हा स्रोत ठरतो. प्रकाश जर इष्टतम असेल तर प्रकाशाची ‘सुख-उत्पादकता’ जास्त असते. सुख हे फल झाले. पण वाचन हे फक्त फल राहत नाही. ज्या श्रमांत वाचन आवश्यक असेल तेथे त्या श्रमांची उत्पादकतासुद्धा वाढते. नवनवीन गोष्टी ‘स्रोत’म्हणून ध्यानात येण्याने जे स्रोतवर्धन होते तीदेखील उत्पादकताच असते. निरनिराळ्या शोधांनी ‘नवस्रोतांच्या फलउत्पादकतां’ची एकूण नवी भर पडत असते.

स्रोतबचतीचे एक दणदणीत उदाहरण घेऊ. सुएझ कॅनॉल खणताना बरीच ऊर्जा, श्रम, भांडवल, कच्चामाल वगरे इनपुट्स खपले असणार हे उघड आहे. पण भूमध्य समुद्रातून आशियाकडे येताना जर ‘वास्को-द-गामाच्या’ माग्रे आफ्रिकेला वळसा मारून यावे लागले असते तर? किती ऊर्जा, वेळ आणि इतर इनपुट्स वाया गेले असते? जे वाचले! हे लक्षात घेतले तर कॅनॉल खणतानाच्या इनपुट्सची (खर्चाची) किती पुरेपूर वसुली झाली आहे आणि भविष्यातही होत राहील हे सहजच कळेल. वाहतूक हे फल धरले तर समुद्रमार्गाची ‘वाहतूक-उत्पादकता’ वाढली असे होते. पुन्हा वाहतूक हा व्यापारासाठी स्रोत आहे आणि खुद्द व्यापार हा, जिथे जे स्वस्तात बनते तिथून ते मिळवण्याचा स्रोतच आहे! असा गुणाकार होत जात असतो. ईमेलमुळे किती कागद वाचला ? कॉन्फरन्स-कॉलमुळे माणसांचा प्रवास किती वाचला? यंत्रे वेगळ्या कामांसाठी आज्ञांकित (प्रोग्रॅम) करता येण्यामुळे अवजड वाहतूक किती वाचली? असे पाहात गेले तर उत्पादकतेचे महत्त्व अधिकाधिक ध्यानात येत जाईल.

ट्रॅफिक सिग्नल लाल असताना जर त्यात उरलेल्या सेकंदांचा काऊंटडाऊन दिसत असला तर इंजिने बंद करता येतात. ताटकळण्यातला वैताग एकदम कमी होतो. ताटकळण्यातला वैताग हे एक ऋणफल आहे. ते कमी होणे हे धन असते. पेट्रोल वाचते म्हणजे ‘स्रोतव्यय’ कमी होतो. प्रदूषण कमी होते हे धनफल आहे कारण प्रदूषण हे उघडच ऋणफल आहे. काऊंटडाऊनची ‘मानसिक उत्पादकता’, ‘इंधन-उत्पादकता’, ‘अ-प्रदूषण उत्पादकता’ असे शब्द वापरता येतील. काऊंटडाऊनसाठी जी जादाची सíकटे वगरे लागतात त्यांचा खर्च होईल. पण इलेक्ट्रॉनिक्समुळे तो किरकोळ असतो.

समजा एक प्लास्टिकच्या पाइपांचा कारखाना आहे. त्यात उत्पादकता वाढली की पाइप तुलनेने स्वस्त होतात. यामुळे ठिबकसिंचन जास्त जणांना शक्य होते. म्हणजे पिकाची ‘पाणी-उत्पादकता’ वाढणे हे पाइपांचा उत्पादनखर्च कमी होण्यावर अवलंबून आहे. शेतकरी हा पाइपांचा ग्राहक आहे. त्याला मिळणारे फल हे शेतीमध्ये स्रोतबचत करणारे आहे. एका पुरवठय़ातून दुसरा पुरवठा वाढणे ही उत्पादकतेच्या गुणाकाराची एक साखळी असते. ‘अधिकस्य अधिकं फलं’ म्हणजे जास्त जास्त स्रोत खर्ची पाडून उत्पादन वाढवणे. याला म्हणतात विस्तारी वाढ (एक्स्टेन्सिव्ह ग्रोथ).

याउलट ‘न्यूनस्य अधिकं फलं’. म्हणजे कमी स्रोतांनिशी जास्त उत्पादन, अर्थात फलप्रचूर वाढ (इंटेन्सिव्ह ग्रोथ) होय. हीच खरी महत्त्वाची असते म्हणूनच आजकाल ‘वर्क हार्ड’ ही घोषणा मागे पडून ‘वर्क स्मार्ट’ ही घोषणा सर्वत्र पसरली आहे ती याचमुळे.

अर्थात श्रम आणि भांडवल हे स्रोत विशेष प्रकारचे आहेत. त्यांत सामाजिक संबंधांचा प्रश्न गुंफला गेलेला आहे. श्रम आणि भांडवल यावर वेगळे लेखांक लागणार असल्याने आज आपण प्रामुख्याने श्रमेतर/ भांडवलेतर इनपुट्स-आऊटपुट्स ध्यानात घेतले. वस्तू, ऊर्जा, माहितीरूपे अगदी अवकाश आणि काळसुद्धा ; ‘स्रोत’ म्हणून किंवा ‘फल’ म्हणून उपस्थित होतात. विद्युतचुंबकीय लहरींच्या कम्प्रतांचा एक पट्टा आमच्या अवकाशातून जाऊ देण्याची परवानगी देताना सरकार किंमत घेते. (उदा. : टू-जी स्पेक्ट्रम!) अशा अर्थाने अवकाश हाही स्रोत ठरतो.

मागणी वाढण्याने रोजगारवाढ

इतकेच नव्हे तर मागणी वाढण्यातही उत्पादकतेचा मोठा वाटा असतो. जुने यांत्रिक घडय़ाळ किती जणांना परवडत होते? आणि आताचे इलेक्ट्रॉनिक घडय़ाळ किती जास्त जणांना परवडते आहे? जास्त जणांना परवडणे हा मागणी वाढण्याचा एक मार्ग असतो. उत्पादन स्वस्त (एकूण भाववाढीच्या तुलनेने) झाल्याने मागणी वाढतेच. त्याशिवाय ग्राहकांचे उत्पन्न वाढल्यानेही मागणी वाढते. कारण हव्या असलेल्या, पण उत्पन्न कमी असल्याने घेता येत नसलेल्या, कित्येक वस्तू वा सेवा आता घेता येतात. समजा एखाद्याचे ‘बजेट’ चित्रकलेची साधने विकत घेण्याइतके नाही. जर त्याच्या गृहखर्चात कोणत्याही कारणाने बचत झाली किंवा त्याचे उत्पन्न वाढले तरच त्याला ही उसंत मिळू शकेल.

एखादी स्त्री पाणी भरून आणण्यात भरपूर वेळ आणि श्रम खर्ची पाडत आहे. तिच्या घरात नळाचे पाणी पोहोचताच, तिची ही ऊर्जा आणि हा वेळ उदाहरणार्थ शिवणकाम करण्यात घालता आला, तर तिच्या श्रमांची उत्पादकता वाढेल. कारण स्वत:च्या कुटुंबासाठी पाणी आणण्यात ‘नवे उत्पादन’ असे काहीच होत नव्हते. ग्राहकाची सुखसोय हे स्वतोमूल्य तर असतेच पण त्याच वेळी ते त्याचे, उत्पादक या नात्याने, सक्षमीकरणही ठरू शकते.

उत्पन्न वाढले की ते खर्च तरी करावे लागते किंवा त्याची बचत करून गुंतवणूक तरी करावी लागते. गुंतवणूक म्हणजे अधिक उत्पादनसाधने निर्मित होणे. ही निर्मित होत असताना श्रमाची मागणी वाढतेच पण ही जास्त उत्पादकतेची उत्पादनसाधने, वापरली जात असताना, त्यांची उत्पादकता नव्याने मिळते. प्रत्येक उत्पादकता ही पुरवठय़ाच्या अंगाने, मागणीच्या अंगाने, सक्षमीकरणाच्या अंगाने किंवा गुंतवणुकीच्या अंगाने पुन्हा उत्पादकताच वाढवत असते. बहुअंगी गुणाकार!

माणूस जर आधीपेक्षा जास्त संतुष्ट झाला, तर त्याच्यावर स्वदमन किंवा परदमन करण्याचे प्रसंग कमी येत जातात. यातून हिंसा व विघातकता कमी होऊ शकते. हाही उत्पादकतेचा भन्नाट शुभ परिणाम असतो!

राजीव साने

rajeevsane@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 2:33 am

Web Title: what exactly is productivity
Next Stories
1 मूल्य-दुविधा आणि इष्टतमीकरण
2 एन्ट्रॉपी : वाहत्या गंगेत हात
3 मेगापॉवर! विनाकार्बन, विनाअणू
Just Now!
X