सुमारे पाच दशकांच्या सदस्यत्वानंतर ब्रिटन अखेर युरोपीय महासंघातून बाहेर पडले. ब्रिटिश जनतेचा कौल मिळाल्यानंतर जवळपास साडेतीन वर्षे चाललेले ब्रेग्झिटनाटय़ नव्या प्रश्नांना जन्म देऊनच संपुष्टात आले. आता युरोपीय महासंघ आणि ब्रिटन यांचे संबंध कसे असतील, हे तूर्त तरी अधांतरी आहे. कॅनडाप्रमाणे युरोपीय महासंघाशी मुक्त कराराचा ब्रिटनचा प्रयत्न असू शकतो. मात्र हा करारही ब्रिटनसाठी आव्हानात्मक आहे. ब्रेग्झिटनंतर ब्रिटनमध्ये एकीकडे जल्लोष, तर दुसरीकडे विरोधी सूर उमटला. तो ब्रेग्झिटवरील सार्वमतावेळचा दुभंगलेपणा अधोरेखित करणारा होता. ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हीड कॅमरून यांनी २०१६ मध्ये ब्रेग्झिटबाबत सार्वमत घेतले. ५२ टक्के ब्रिटिश नागरिकांनी ब्रेग्झिटला कौल दिला, तर उर्वरितांनी विरोधात मतदान केले. ब्रिटिश जनतेच्या या भावनाकल्लोळाचे प्रतिबिंब ब्रेग्झिटच्या अंमलबजावणीनंतर माध्यमांतही स्पष्टपणे दिसून येते.

ब्रेग्झिटबाबत युरोपातील माध्यमांत दु:ख, चिंता आणि दिलासा असे संमिश्र सूर उमटले. ब्रिटनच्या नागरिकांमध्ये उत्साहाबरोबरच चिंतेचे मळभ दाटले आहे, हे फ्रान्सच्या ‘ली फिगरो’ने अचूकपणे हेरत ब्रिटिश वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठांवरील दुफळी दर्शवणाऱ्या बातम्यांकडे लक्ष वेधले. ‘लिबरेशन’ या फ्रान्समधील आणखी एका वृत्तपत्राने साडेतीन वर्षांनंतर फुटलेल्या कोंडीचे स्वागत करतानाच ब्रिटनच्या भतितव्याबाबत कुतूहल व्यक्त केले.

इटलीच्या ‘ला रिपब्लिका’ने ब्रेग्झिटचे वार्ताकन आर्थिक मुद्दय़ावर केंद्रित केले. ब्रिटनमध्ये कार उत्पादनात झालेली घट त्यात अधोरेखित करण्यात आली आहे. युरोपीय महासंघाशी पुढील संबंधाबाबत वाटाघाटी करण्यासाठी असलेली मुदत कमी आहे, याकडे इटलीच्याच ‘ला स्टॅम्पा’ने लक्ष वेधले आहे. ब्रेग्झिटमुळे युरोपीय महासंघाच्या उद्दिष्टांवरही अनेक माध्यमांनी प्रश्न उपस्थित केले. ब्रेग्झिट हा युरोपीय महासंघातील प्रत्येक देशाचा पराभव असल्याची टिप्पणी बेल्जियमच्या

‘डी मॉर्गन’ने केली. युरोपीय महासंघाने सदस्य गमावणे वेदनादायी आहे, असे ‘डी मॉर्गन’ने म्हटले आहे. हा युरोपचा आणि युरोपीय महासंघाच्या संकल्पनेचा पराभव असल्याचा सूर अन्य काही माध्यमांतही उमटला.

गेल्या सहा महिन्यांत ब्रिटनमध्ये ब्रेग्झिटबाबत वादळी चर्चा सुरू असताना युरोपातील माध्यमांनी त्याचे कसे वार्ताकन केले, याबाबतची रंजक माहिती ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि रॉयटर्स इन्स्टिटय़ूट यांच्या संयुक्त अहवालाद्वारे समोर आली आहे. युरोपच्या बहुतांश माध्यमांनी ब्रेग्झिटबाबत तटस्थ राहणे पसंत केले. ब्रेग्झिटबाबत माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या केवळ २२ टक्के वृत्त-लेखांत स्पष्ट भूमिका घेण्यात आली. त्यातही दहापैकी एक वृत्त हे ब्रेग्झिटच्या संबंधित देशावर होऊ शकणाऱ्या परिणामावर केंद्रित होते. ब्रेग्झिट हे फ्रान्स किंवा युरोपीय महासंघापेक्षा ब्रिटनसाठी मोठे आव्हान असेल, असा सूर फ्रान्सच्या माध्यमांत उमटला. स्पॅनिश आणि आयरिश माध्यमांनी ब्रेग्झिटविरोधात कठोर भूमिका घेतली. आयरिश माध्यमांचे वार्ताकन वगळले, तर युरोपातील माध्यमांचे ६८ टक्के वार्ताकन केवळ ब्रिटनमधील परिस्थितीवर आधारित आहे. ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या युरोपीय देशांतील नागरिकांच्या हक्कांबाबतच्या लेखनाला युरोपीय माध्यमांत केवळ सात टक्के स्थान मिळाल्याचे हा अहवाल सांगतो.

‘द आयरिश टाइम्स’ने आधीपासूनच ब्रेग्झिटविरोधात भूमिका घेतली होती. ‘ब्रिटन लीव्ह्ज द युरोपियन युनियन नॉट विथ ए बँग, बट ए व्हिम्पर’ असे ‘द आयरिश टाइम्स’च्या मुख्य बातमीचे शीर्षक आहे. सोबत युरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर पडल्याची वेळ दर्शवणाऱ्या घडय़ाळाचे पाच कॉलमी बोलके छायाचित्र आहे. ‘हे मोठे नुकसान आहे. ब्रिटनविना युरोपीय महासंघ कमकुवत होईल,’ अशी टिप्पणी या वृत्तपत्राने केली आहे.

ब्रिटिश माध्यमांवर नजर फिरवली तरी तेथील नागरिकांच्या भावनाकल्लोळाचे चित्र त्यात उमटलेले दिसते. ‘द सन’ने ‘अवर टाइम हॅज कम’ असे ठसठशीत शीर्षक दिले आहे. अखेर अनेक दशकांनी ब्रिटनच्या महान जनतेने ब्रेग्झिट घडवून आणले, अशा आशयाचा मजकूर या शीर्षकासोबत आहे. ‘द टाइम्स’चे मुखपृष्ठ पोस्टर शैलीतले असून, त्यावर युरोपीय महासंघ आणि ब्रिटन यांच्यातील महत्त्वाच्या घटनांची माहिती देण्यात आली आहे. ‘द टेलिग्राफ’ने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची मुलाखत घेतली आहे. त्यात ‘शेवट नव्हे, सुरुवात’ अशा आशयाचे शीर्षक असलेल्या मथळ्याद्वारे आशादायी चित्र मांडण्यात आले आहे. ब्रेग्झिटवर आठ पानी पुरवणी हे या अंकाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणता येईल. ‘द स्कॉट्समन’चे ‘फेअरवेल, नॉट गुडबाय’ असे बोलके शीर्षक चटकन लक्ष वेधून घेते.

‘डेली मेल’ने ‘ए न्यू डॉन फॉर ब्रिटन’ या शीर्षकाखाली मुख्य बातमी दिली आहे. विशेष म्हणजे ‘डेली मेल’कडूनच चालविण्यात येणाऱ्या ‘आय’ वृत्तपत्रात विरोधी सूर उमटला. त्यातून ब्रिटिश माध्यमांतील दुभंगलेपणा अधोरेखित होतोच; शिवाय ब्रिटनच्या भविष्यातील प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. ‘आय’चे हे शीर्षक आहे- ‘युकेज् लिप इन्टु द अननोन’!

संकलन : सुनील कांबळी