‘‘अमेरिकेने लष्करी शस्त्रांवर अलीकडेच दोन लाख कोटी डॉलर्स खर्च केले आहेत. इराणने अमेरिकेच्या तळांवर किंवा आमच्या नागरिकांवर हल्ला केला, तर कोणतीही तमा न बाळगता ही नवी शस्त्रे इराणवर डागली जातील.’’ अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे हे उद्गार. अर्थात, इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी मेजर जनरल कासीम सुलेमानी यांना अमेरिकेने हवाई हल्ल्यात ठार केल्यानंतर इराणने दिलेल्या इशाऱ्याला ट्रम्प यांचे हे प्रत्युत्तर. इराणने हल्ला केल्यास त्या देशातील ५२ ठिकाणांवर प्रतिहल्ला करण्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. त्यामुळे सुलेमानी यांच्या हत्येनंतर नव्या युद्धाचे ढग जमू लागले आहेत. सुलेमानी यांची हत्या आणि त्यानंतरच्या घडामोडींनी आंतरराष्ट्रीय माध्यमांतील अवकाश व्यापला आहे.

अमेरिकेतील बहुतांश माध्यमांनी ट्रम्प प्रशासनाच्या परराष्ट्र धोरणातील धरसोडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने मुखपृष्ठावर अमेरिकेच्या हवाई हल्ल्याच्या मोठय़ा छायाचित्रासह सुलेमानी यांच्या हत्येची बातमी प्रसिद्ध केली. सुलेमानी अमेरिकेचा शत्रू असला, तरी ट्रम्प यांचा निर्णय योग्य आहे असे म्हणता येणार नाही, असा सूर असलेला लेखही ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये आहे.

सुलेमानी यांच्या हत्येचे अर्थ आणि परिणाम उलगडणारे अनेक लेख ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये आहेत. ‘राष्ट्रीय सुरक्षा पथकाचा सल्ला न जुमानता ट्रम्प यांनी इराणसोबतच्या अणुकरारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेणे बेफिकिरीचे होते. त्यानंतर इराणवर दबावाचा ट्रम्प यांचा प्रयत्नही निष्फळ ठरला. उलट सीरिया, येमेन आणि लेबनॉनमध्ये इराणच्या अस्थिरतेच्या कारवाया वाढीस लागल्या. ट्रम्प प्रशासनाचे कोणतेही उद्देश तिथे साध्य झालेले नाहीत, याकडे या लेखात लक्ष वेधण्यात आले आहे. इराकसह आखातातील अन्य भागांतील अमेरिकी नागरिकांवरील संभाव्य हल्ले हाणून पाडण्यासाठी सुलेमानीला ठार करण्यात आल्याचे ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र ट्रम्प प्रशासनावर विश्वास ठेवणे कठीण आहे. अमेरिकी काँग्रेस (संसद) नेत्यांशी सल्लामसलतही करण्यात आलेली नाही. इराण या हल्ल्यास प्रत्युत्तर देणारच. तो कोणत्या स्वरूपात आणि कधी देईल, हाच प्रश्न आहे. अमेरिकी नागरिक सुरक्षित नाहीत, हे मात्र नक्की,’ असे या लेखात म्हटले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र धोरण कोलमडले आहे, हे तपशीलवार नमूद करणारा आणखी एक लेख ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये आहे. ‘ट्रम्प यांनी या हल्ल्याचा आदेश दिला. त्याआधी जॉर्ज बुश आणि बराक ओबामा यांच्या काळातही सुलेमानीवर हल्ल्याबाबत विचार झाला होता. मात्र इराणसोबत अकारण युद्ध आणि तणावाची परिस्थिती ओढवू शकेल, या भीतीमुळे असा निर्णय घेण्यात आला नाही. राष्ट्रीय सुरक्षेबाबतच्या निर्णयाची योग्य प्रक्रिया या प्रकरणात पार पाडलेली दिसत नाही,’ असे निरीक्षण या लेखात नोंदवण्यात आले आहे. स्वत:पुढील राजकीय संकट दूर करण्यासाठी ट्रम्प यांनी ही कारवाई केली असण्याची शक्यताही या लेखात वर्तविण्यात आली आहे. सुलेमानी ठार झाल्याने इराण हल्ल्यापासून परावृत्त होईल की इराणकडून हल्ले वाढतील, याचे सखोल विश्लेषण करणारा आणखी एक लेख ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये आहे.

शेजारच्या अनेक देशांत प्रभाव निर्माण करण्यासाठी जनरल कासीम सुलेमानी यांनी मोहीम राबवली होती. या मोहिमेआड येणाऱ्या आव्हानास ते समर्थपणे तोंड देत होते. मात्र त्यांच्या हत्येमुळे इराणच्या या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. सुलेमानी यांचा उत्तराधिकारी ही मोहीम समर्थपणे राबविण्याची शक्यता कमी आहे, असा इराणकेंद्री वेगळा पैलू ‘द गार्डियन’च्या एका लेखात उलगडण्यात आला आहे.

‘धोकादायक नवा अध्याय’ अशा शब्दांत ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने कासीम सुलेमानीच्या हत्येचे वर्णन केले आहे. फ्रान्सच्या ‘लिबरेशन’ने आणि रशियाच्या ‘मॉस्को टाइम्स’नेही हाच सूर लावत अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. दुसरीकडे, इराणच्या बहुतांश वृत्तपत्रांनी अमेरिकी हल्ल्याची बातमी देताना मुखपृष्ठावर कासीम सुलेमानी यांचे मोठय़ा आकारातील छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. सुलेमानी हे एका संस्कृतीचे प्रतिनिधी होते आणि संस्कृती हल्ल्याने नष्ट करता येत नाही, अशा आशयाचा मजकूर ‘तेहरान टाइम्स’मध्ये आहे.

संकलन : सुनील कांबळी