14 August 2020

News Flash

बहुआयामी, व्यासंगी आणि अजातशत्रू

आम्ही शिक्षण घेत असताना पुण्यातील ‘पूना डेली न्यूज’ हे एकमेव इंग्रजी दैनिक बंद पडले.

व्यासंगी संपादक, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे जाणकार आणि विख्यात विचारवंत दिलीप पाडगावकर यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या  जिवलग मित्राने जागवलेल्या आठवणी..

मराठी, हिंदूी, इंग्रजी, संस्कृत आणि फ्रेंच अशा पाच भाषांवर प्रभुत्व.. इतिहास, साहित्य, कला, राजकारण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा व्यासंगी अभ्यासक.. शास्त्रीय संगीताचा भोक्ता आणि पाश्चात्त्य संगीताचा चाहता.. खाद्यसंस्कृतीचा उपासक.. असा बहुआयामी आणि व्यासंगी दिलीप पाडगावकर हा माझा ५५ वर्षांपासूनचा जिवलग मित्र होता. एवढा मोठा संपादक असला तरी त्याच्यामध्ये कोणताही अभिनिवेश नव्हता. अगदी कोणाशीही तो तितक्याच आत्मीयतेने बोलायचा. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर असलेले दडपण दूर व्हायचे. एरवी एखाद्या मोठय़ा व्यक्तीच्या निधनानंतर ‘पोकळी निर्माण झाली’ असे म्हटले जाते, पण दिलीपच्या आकस्मिक जाण्याने माझ्या जीवनात खरोखरीच न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

दिलीपची आणि माझी मैत्री ५५ वर्षांपासूनची. फग्र्युसन महाविद्यालयात आम्ही दोघेही राज्यशास्त्राचे विद्यार्थी. राजकारण आणि राज्यशास्त्र हे आमच्या दोघांचेही आवडीचे विषय. तेव्हापासून आमचे सूर जुळले आणि एकमेकांचे घट्ट मित्र कधी झालो हे समजलेच नाही. त्याकाळी फग्र्युसन महाविद्यालयाचा दबदबा होता. त्यामुळे लष्कर परिसरात लाल देवळापलीकडे मेन स्ट्रीट भागात राहणारा दिलीप सायकलवरून फग्र्युसनला यायचा. प्रा. ग. प्र. प्रधान, प्राचार्य स. वा. कोगेकर, ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलेले डॉ. व्ही. एन. ढवळे असे शिक्षक आम्हाला लाभले. त्यामुळे आमचे इंग्रजी भाषेचे ज्ञान  पक्के झाले. नव्हे, आम्ही त्या भाषेवर प्रभुत्व संपादन करू शकलो. १९६४ मध्ये पदवीधर झाल्यानंतर दिलीप पॅरिसला निघून गेला. मी फग्र्युसन महाविद्यालयात एम.ए. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर करिअरच्या वाटा वेगळ्या होतात आणि नंतर संपर्क राहतोच असे नाही. पण पॅरिसला गेल्यानंतरही दिलीपबरोबर माझी मैत्री अव्याहत राहिली. एवढीच नव्हे तर उत्तरोत्तर ती वाढतच गेली याला कारण त्याचे ग्रंथप्रेम. आमच्या इंटरनॅशनल बुक सव्‍‌र्हिसमध्ये तो सतत येत असे. वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके विकत घेऊन वाचन करणे हा त्याचा छंद होता.

आम्ही शिक्षण घेत असताना पुण्यातील ‘पूना डेली न्यूज’ हे एकमेव इंग्रजी दैनिक बंद पडले. त्याचे संपादक डेव्हिड यांनी ‘पूना हेरॉल्ड’ हे दैनिक सुरू केले. तेथे बातमीदार म्हणून दिलीपच्या पत्रकारितेची सुरुवात झाली. त्या वेळी महाविद्यालयीन घडामोडींचे उपेंद्र वार्ताकन करेल, असे दिलीपने संपादकांना सांगितले होते. त्यामुळे मीही काही काळ लेखन केले होते. इंटरनॅशनल बुक सव्‍‌र्हिसची जबाबदारी नसती तर कदाचित मीही पत्रकार म्हणूनच काम केले असते. अर्थात मी दिलीपएवढा मोठा पत्रकार झालो असतो की नाही हे सांगता येत नाही, पण पत्रकार म्हणून नक्कीच निवृत्त झालो असतो. पॅरिसहून दिलीप पहिल्यांदा पुण्याला आल्यावर आम्ही जुन्या मित्र-मंडळींना, प्राध्यापकांना भेटायला गेलो होतो. रावसाहेब पटवर्धन यांच्याकडे आम्ही जायचो. तेव्हा विविध विषयांवर चर्चा होत असे. असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ फ्रान्स या संस्थेमार्फत पुण्यातून काही जण फ्रान्सला गेले होते. त्यामध्ये मीदेखील होतो. तेव्हा दिलीप पॅरिसला टाइम्सचा प्रतिनिधी होता. फ्रान्सला गेल्यावर दिलीपसोबत दोन-तीन दिवस राहायला मिळेल हे आकर्षण होते. त्यामुळे मी पॅरिसला त्याच्याकडेच राहिलो होतो. श्यामलाल हे तेव्हा टाइम्सचे संपादक होते. दिलीप त्यांच्याकडे लेख पाठवत असे. त्या वेळी टाइम्सकडे संपूर्ण युरोपचे वार्ताकन करण्यासाठी एकच प्रतिनिधी होता आणि तोही लंडनला राहात असे. युरोपच्या बातम्यांचे प्रतििबब कमी पडत असल्याने श्यामलाल यांनी पॅरिसला असलेल्या दिलीप याची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली.

दिलीपची पत्नी लतिका ही फग्र्युसन महाविद्यालयात फ्रेंच शिकवीत असे. ‘आमची भेट होईल असे काही तरी घडवून आण’, असे त्याने एकदा मला सांगितले. ‘सर्व प्राध्यापकांना चहापानासाठी दुकानात बोलावले असून लतिकाही त्यामध्ये असेल. तेव्हा तूही ये’, असे मी त्याला दोन दिवसांनी सांगितले. तेव्हा ‘आय हॅव ऑलरेडी हिट द टार्गेट’ असे त्याने मला सांगितले. त्या दोन दिवसांत चहा पिण्याच्या निमित्ताने लतिकाला घेऊन जात त्या दोघांनी लग्नही जमविले होते. जावई टाइम्सचा प्रतिनिधी म्हटल्यावर लतिकाच्या घरातलेही खूश होते. पाच-सहा महिन्यांनी महाविद्यालयाचे सत्र संपले आणि राजीनामा देऊन लतिका पॅरिसला निघून गेली. माझ्या लग्नालाही त्याला यायला जमले नाही. माझ्या लग्नामध्ये वडिलांनी त्यांचे मित्र असलेल्या पं. कुमार गंधर्व यांची बैठक ठेवली होती. लग्नाला येऊ शकला नसला तरी दिलीपची शुभेच्छापर तार आली होती. ‘‘तुझं लग्न ‘मिस’ केलं यापेक्षाही कुमारांचं गाणं ‘मिस’ केलं याचं अधिक दु:ख होतंय’’, असे त्याने चेष्टेमध्ये त्या तारेमध्ये नमूद केले होते.

कला, साहित्य, इतिहास यांचा अभ्यासक असलेला दिलीप खाद्यसंस्कृतीचा उपासक होता. ज्या सहजतेने ‘कम्फर्टेबली’ तो मेरिएटमध्ये जेवू शकत असे त्याच आवडीने तो बेडेकरची मिसळही खात असे. मी कोणी मोठा संपादक आहे असा तोरा त्याला कधीही नव्हता. एकदा आम्ही हॉटेल रॉन्देवूमध्ये जेवायला गेलो होतो. मी शुद्ध शाकाहारी. पण दिलीपने थाई राइस ही डिश मागविली. बिर्यानीसारखा भात होता. त्याला तो काही रुचकर लागला नाही. काही तरी कमी आहे हे जाणवत होते. अखेर त्याने हॉटेलच्या मास्टर शेफला बोलावून घेतले आणि हा पदार्थ कसा बनवायचा त्याची ‘रेसिपी’ सांगितली. तेव्हा तो शेफही स्तिमित झाला. शेवटी त्याने दिलीपने मागविलेली डिश ‘कॉम्प्लिमेंटरी’ दिली. गरवारे महाविद्यालयासमोरील ‘काटा किर्र’मध्ये आम्हाला मिसळ खायला जायचे होते, पण दिलीपच्या  जाण्याने आता ते राहूनच गेले.

पॅरिसला काम केल्यानंतर त्याने भारतामध्ये दिल्लीला परत येण्यासाठी श्यामलाल यांच्याकडे आग्रह धरला होता. मात्र, ‘दिल्लीमध्ये सध्या जागा नाही तर, तू मुंबईला येऊ शकतो’, असे त्यांनी सांगितल्यावर दिलीप मुंबईला आला. तेथे काही वर्षे काम केल्यावर मग दिलीप दिल्लीला गेला. जागतिक पुस्तक मेळाव्यासाठी (वर्ल्ड बुक फेअर) मी दिल्लीला जायचो तेव्हा आवर्जून दिलीपकडे उतरत असे. दिलीपबरोबर निरनिराळ्या विषयांवर मनमुराद गप्पा होत असत. त्याचा वाचनाचा आवाका जबरदस्त होता. पाच वर्षांपूर्वी दिलीप पुण्याला स्थायिक झाला आणि आमचं एकत्र असणं तुलनेने वाढलं होतं. दिलीप पुण्यात आहे म्हटल्यावर अनेक जण कार्यक्रमांना प्रमुख पाहुणा म्हणून दिलीपला बोलावण्यासाठी माझ्याकडे गळ घालत. मग मी त्याला सांगितल्यानंतर तो पुण्यातील कार्यक्रम स्वीकारू लागला. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला तो होता. पुस्तक मराठीत आणि व्यासपीठावरील सर्व वक्तेही मराठी असल्याने ‘तू मराठीतूनच भाषण केले पाहिजेस’, असा आग्रह मी त्याच्याकडे धरला. त्यानेही मराठीतून भाषण करीत माझा मान राखला.

दिल्लीला दिलीपच्या घरी गेलो होतो तेव्हा त्याच्याकडे इंद्रकुमार गुजराल आणि ‘सेमिनार’ मासिकाचे संपादक रोमेश थापर आले होते. ‘ही इज  डिअरेस्ट क्लोज फ्रेंड ऑफ माईन उपेंद्र’, अशा शब्दांत दिलीपने त्यांना माझी ओळख करून दिली होती.  ‘इंटरनॅशनल बुक सव्‍‌र्हिस’ आणि ‘बुकगंगा’ यांची भागीदारी झाली तेव्हा दिलीपने त्या विषयावर विशेष संपादकीय लिहून या घटनेचे स्वागत केले होते. ही भागीदारी झाल्यानंतर मी निवृत्ती घेतली. त्यामुळे आता इंटरनॅशनल बुक सव्‍‌र्हिसमध्ये मी नसणार हा त्याच्यासाठी दु:खाचा भाग होता.

शासनाने स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू केला तेव्हा तो पुस्तकांनाही आकारला जाऊ लागला. तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ग्रंथप्रेमी. त्यामुळे पुस्तकांना एलबीटी लागू करू नये ही बाब दिलीप आणि कुमार केतकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या गळी उतरवली. अखेर सरकारने पुस्तकांना एलबीटीतून वगळले. दिलीपबरोबर मी जितक्या वेळा प्रवास केला त्या वेळी प्रत्येक ठिकाणी तो आधी बुकशॉपमध्ये जात असे. अनेकदा त्याला कार्यक्रमानिमित्त मुंबईला जावे लागत असे. त्या वेळी सकाळी जाऊन संध्याकाळी परत यायचे असेल तेव्हा तो आवर्जून मला बरोबर घेऊन जायचा. आताही मुंबईला झालेल्या टाटा लिटररी फेस्टिव्हलच्या ज्युरी मंडळात दिलीप होता. त्यामध्ये दिलीपचे व्याख्यान असताना आम्ही बरोबर जाण्याचे ठरविले होते, मात्र दिलीप आजारी पडल्याने आमचा हा प्रवास राहूनच गेला. महाविद्यालयीन कालखंडात मी, दिलीप आणि विजय देव असे आमचे त्रिकूट होते. एकदा तिघेही मिळून भेटू आणि निवांत गप्पा मारू हे ठरविले होते, मात्र या गप्पादेखील राहूनच गेल्या.

उपेंद्र दीक्षित

(शब्दांकन : विद्याधर कुलकर्णी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2016 2:15 am

Web Title: article on noted journalist dileep padgaonkar
Next Stories
1 आठवडय़ाची शाळा : ठेंगण्या शाळेला उंच ताठ कणा मिळतो तेव्हा..
2 औषधांची उपलब्धता आणि आपण
3 ‘अभेद्य दगडी भिंती’चा प्रयत्न थांबवावा
Just Now!
X