लडाखच्या गलवान खोऱ्यातील हिमशिखरे १५ जूनच्या रक्तरंजित धुमश्चक्रीने हादरली. भारत-चीन संघर्षांत २० भारतीय जवानांनी प्राणांची आहुती दिली. या घटनेनंतर सीमा धगधगू लागल्याची चर्चा उघडपणे सुरू झाली. जागतिक प्रसारमाध्यमांमधील तज्ज्ञांचे लेख आणि नेपाळ, पाकिस्तान या शेजारी देशांतील वर्तमानपत्रांच्या अग्रलेखांचा या वादाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेमका कसा आहे?

‘चीनच्या तुष्टीकरणाचे भारताचे धोरण विस्कळीत’ अशा शीर्षकाचा लेख ‘जपान टाइम्स’ने प्रसिद्ध केला आहे. त्यात नवी दिल्लीतील ‘सेंटर फॉर पॉलिसी रीसर्च’मधील प्रा. ब्रह्मा चेलानी यांनी, गलवानमधील चीनचे कथित ‘अनपेक्षित’ डावपेच हे अनपेक्षित नसावेत, असे निरीक्षण नोंदवले आहे. मोदींना चीनच्या आकस्मिक हल्ल्यांचा अनुभव नाही. चीनचे मन वळवून आपण पुन्हा द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करू आणि त्याच्या पाकिस्तानशी असलेल्या संबंधात बाधा आणू, अशी त्यांची भाबडी समजूत असावी. परंतु सद्य:परिस्थितीबाबत त्यांनी स्वत:लाच दोष दिला पाहिजे. धोरणांचे अतिवैयक्तिकरण आणि रणनीतीतील हटवादी भाबडेपणा यामुळे राजनैतिकदृष्टय़ा कुशल-कणखर नेता म्हणून नव्हे, तर ब्रिटनचे माजी पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचा ‘भारतीय अवतार’ म्हणून मोदींनी स्वत:ला सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. ते त्यांच्या चुकांमधून शिकत नाहीत आणि चीनबाबतचे धोरण बदलत नाहीत तोपर्यंत भारतीय नागरिक आणि प्रादेशिक सार्वभौमत्वाला किंमत मोजावी लागेल, असा इशाराही प्रा. चेलानी यांनी दिला आहे.

अमेरिका-चीन यांच्यातील संघर्षांत गलवान घटना महत्त्वाची ठरू शकते. भारताने चीनची बाजू घेणाऱ्या रशियाला विचारात न घेता तटस्थतेचे धोरण सोडावे, असा सल्ला ब्रिटनच्या ‘संडे गार्डियन’मधील विश्लेषणात देण्यात आला आहे. अमेरिका-चीन यांच्यातील युद्धात भारत तटस्थ राहण्याच्या धोरणाचा फेरविचार करू शकतो, असा अंदाजही प्रा. एम. डी. नलपत या भारतीय अभ्यासकांनी वर्तवला आहे.

एका बेलगाम राज्यसत्तेला नियंत्रित करण्याची संधी एका सर्वात मोठय़ा लोकशाहीला आहे, असे चित्र रंगवून अमेरिका आणि त्याचे मित्र देश चीनच्या महत्त्वाकांक्षेशी टक्कर घेण्यासाठी अनेक वर्षांपासून भारताची मनधरणी करत आहेत, आता सीमेवरील घटनेमुळे भारताचे पाऊल त्या दिशेने पडू शकते, असा अंदाज ‘न्यू यॉर्क टाइम्स’मधील लेखात वर्तवला आहे. चीनच्या विरोधात भारत पाश्चिमात्य राष्ट्रांची बाजू घेऊ शकेल का? या प्रश्नाचे उत्तर शोधताना ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या दक्षिण आशिया प्रतिनिधी मारिया आबी-हबीब यांनी भारत-चीन संबंध आणि त्यांचे अन्य देशांशी संबंध यांचे विश्लेषण केले आहे. आर्थिक आणि लष्करी आघाडीवर भारत चीनच्या मागे असल्याचे मतही त्यांनी मांडले आहे.

भारत-चीन सीमेवर सतत तणाव वाढण्यास भारताचे अविवेकी वर्तन कारणीभूत आहे. शिवाय, सीमावादाबाबत भारताने गेल्या काही वर्षांत घेतलेल्या ताठर भूमिकेचा हा परिपाक असल्याचा आरोप चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’च्या अग्रलेखात आहे. सीमावादाबाबत द्विपक्षीय चर्चा न करता भारत सीमेलगत व्यापक पायाभूत सुविधांची उभारणी करीत आहे. चीनच्या बाजूकडे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आत काही बांधकामही भारताने केल्याचा दावाही या अग्रलेखात केला आहे. सीमाप्रश्नाचे रूपांतर संघर्षांत होऊ नये, अशी चीनची भूमिका आहे, पण चीनच्या चांगुलपणाला कमजोरी समजू नये अशी बतावणी करणाऱ्या या संपादकीयात, लष्करी ताकदीच्या बाबतीत भारत चीनपेक्षा श्रेष्ठ आहे, असा काही भारतीयांचा गैरसमज आहे, अशी दर्पोक्तीही आहे.

पाकिस्तानातील ‘डॉन’ने भारत-चीन तणावाबद्दलच्या अग्रलेखातही काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. शेजाऱ्यांशी दादागिरी करून आपण या प्रदेशात सर्वश्रेष्ठ आहोत, असे दर्शवण्याचा भारताचा आजपर्यंतचा इतिहास आहे. पाकिस्तान सात दशकांपासून भारताची चिथावणी सहन करीत आहे. पाकिस्तानशी वैमनस्य वाढवून अन्य छोटय़ा देशांना दबावाखाली आणण्याचा भारताचा कदाचित प्रयत्न असेल. परंतु भारत-चीनमध्ये आर्थिक आणि लष्करीबाबतीत फारशी तुलना होऊ  शकत नाही. म्हणून भारताने या आघाडीवर अतिसावधगिरीने पावले टाकावीत, असा अनाहूत सल्ला ‘डॉन’ने दिला आहे.

चीनशी जवळीक साधलेल्या आणि गेल्या आठवडय़ातच भारताचा काही भाग आपल्या नकाशात समाविष्ट करणाऱ्या नेपाळमधील ‘काठमांडू पोस्ट’ने ‘अ हिमालयन ट्रॅजेडी’ या शीर्षकाच्या संपादकीयात, ‘करोना विषाणू उद्रेकातून जास्तीत जास्त लोकांना वाचवण्यासाठी अवघे जग धडपडत असताना या दोन प्रभावी देशांनी जवळपास निर्मनुष्य असलेल्या भूभागावरून एकमेकांच्या सैनिकांचे प्राण घ्यावेत, हे दुर्दैवी आहे’ अशी सावध खंत व्यक्त केली आहे.

संकलन : सिद्धार्थ ताराबाई