श्रीरंग गोडबोले, अध्यक्ष, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ

गेली अनेक वर्षे लेखक, दिग्दर्शक, गीतकार, निर्माते अशा नाना भूमिका प्रभावीपणे बजावणारे श्रीरंग गोडबोले यांची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यानिमित्ताने गोडबोले यांनी मराठी रंगभूमीवर आवश्यक असलेली सेन्सॉरशिप, नाटकांची भूमिका, हरवलेली वैचारिकता, आगामी आव्हाने आणि लेखकांच्या अवस्थेचा घेतलेला हा थोडक्यात धांडोळा..

* परिनिरीक्षण मंडळाकडून कोणत्या निकषांवर संहिता सेन्सॉर केली जाते?

कोणत्याही नाटय़गृहात नाटकाचा प्रयोग करायचा असेल तर मंडळाचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. राज्यभरातून आलेल्या संहितांचे इथे वाचन केले जाते. त्यात काही आक्षेपार्ह असेल तर ते अधोरेखित करणे हे आमचे काम आहे. केवळ अश्लील आशयच नव्हे तर प्रक्षोभक, घृणास्पद, देशद्रोही, असांविधानिक, जनमानसांच्या भावना भडकवल्या जातील, चाळवल्या जातील, धार्मिक भावना दुखावल्या जातील, अशा आशयात सुधारणा करण्याची सूचना मंडळाकडून केली जाते.

*  टाळेबंदीच्या काळात सेन्सॉर होऊ न शकलेल्या संहितांची संख्या किती असावी?

२२ डिसेंबरला अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारेन. त्यानंतर याचाच अंदाज येईल. टाळेबंदीच्या काळात बरेच लिखाण झाल्याने अनेक संहिता मान्यतेच्या प्रतीक्षेत असाव्यात.

*  सेन्सॉरशिपची नाटकाला गरज असावी का?

देशातील कायदा नाटय़ क्षेत्रालाही लागू आहे. मी आजवर लिहिलेल्या सर्व संहिता सेन्सॉर करून घेतल्या आहेत, मग ते मला आवडो वा ना आवडो. त्या नियमांचे पालन करणे आपले काम आहे. गरज असावी की नसावी याबाबत मी बोलणे योग्य नाही, कारण मी मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. अर्थात ही चौकट मला मान्य असणार म्हणूनच ही जबाबदारी स्वीकारली आहे. ही चौकट लेखकांच्या दृष्टीने सकारात्मक कशी होईल याचा अध्यक्ष म्हणून निश्चितपणे विचार करेन.

* अध्यक्ष म्हणून आपली ध्येयधोरणे काय असतील?

मंडळाच्या निर्देशांचा सध्या अभ्यास सुरू आहे. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर त्यातील बारकावेही लक्षात येतील. आजवर केवळ लेखक म्हणून या प्रक्रियेकडे पाहत होतो. आता अध्यक्ष म्हणून अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. विशेष म्हणजे माझ्यासोबत असणाऱ्या पंचवीस जणांचे विचार जाणून घेणे मला गरजेचे वाटते. लेखक म्हणून आजवर मंडळाकडून बाळगलेल्या अपेक्षा माझ्या कार्यकाळात कशा पूर्णत्वास येतील याचा विचार केला जाईल. ही प्रक्रिया अधिक सहज आणि सोपी करता येईल का, याला तंत्रज्ञानाची जोड कशी देता येईल यावर भर दिला जाईल.

* नाटय़ क्षेत्राला सध्या कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे?

नाटय़ क्षेत्रात शंभर कलाकृती येतात, पण त्यातल्या तीन-चारच व्यावसायिक निकषांवर टिकतात. त्यामुळे करोनापूर्वीही आव्हानात्मक परिस्थिती होतीच. व्यवसाय म्हणून नाटय़सृष्टी अविकसित आणि संकुचित होत चालली आहे. काही निवडक लोकाश्रय असलेल्या कलाकारांमुळे व्यावसायिक नाटक तरले आहे. यात प्रायोगिक रंगभूमीची मोठी कुचंबणा झालेली दिसते. एके काळी प्रायोगिक रंगभूमीवर तरुण कलाकार यायचे आणि मग ते व्यावसायिकला जायचे. तेव्हा लोकांकडे वेळही होता. मी स्वत: वर्षांनुवर्षे प्रायोगिक रंगभूमी करतो आहे. आता अनेक प्रायोगिक संस्थांना टाळे लागले आहे. याचा व्यावसायिकवरही परिणाम झाला. कारण नाटकाचे भरणपोषण करणारी प्रायोगिक रंगभूमीच थांबली आहे. त्यामुळे नाटय़गृहांच्या रचना, अर्थकारण यावरही अभ्यास व्हायला हवा. नाटकाला समाजजीवनाचा आरसा मानतो, परंतु नाटकाने जो विचार पोहोचवला पाहिजे, तो हल्लीच्या कोणत्याही नाटकात दिसत नाही. दोन घटकांची करमणूक एवढीच नाटकाची व्याख्या झालेली आहे.

* राजकीय भाष्य करण्यावर आलेली मर्यादा लेखक म्हणून गैर वाटते का?

ही मर्यादा आजची नाही. ‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’ अशा जुन्या नाटकांवरही मर्यादा आणल्या होत्या. फरक इतकाच आहे की हल्ली भांडवल करण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. सगळ्यांच्याच भावना टोकदार झाल्या आहेत. जिथे तिथे गटतट आहेत, समाज वाटला गेला आहे, जात-धर्म-पक्ष, नाना गदारोळाची माध्यमे झाली आहेत. यात लेखकाला असलेले स्वातंत्र्यच नष्ट होते. एखादी गोष्ट लिहिताना, हे योग्य आहे का, यामुळे काही गोंधळ तर होणार नाही ना, याचा सारखा विचार करावा लागतो. इथे प्रत्येक जण स्वत:चा सेन्सॉर वापरू पाहत आहे. अशा वेळी परिनिरीक्षण मंडळ महत्त्वाचे ठरते. कारण त्यांनी दिलेली मान्यता प्रत्येकाला स्वीकारणे अनिवार्य आहे. पूर्वीचे लेखक इंग्रजांच्या विरोधात लिहीत होते. आता आपण लोकशाही असताना लिहायला घाबरतो आहोत, हीच खरी शोकांतिका आहे.

* समकालीन वास्तवावर भाष्य करणाऱ्या आशयाची कमतरता भासते आहे का?

समकालीन विषय हाताळताना व्यावसायिक नाटक आणि समांतर नाटक असे दोन प्रवाह पडतात. एखादा विचार घेऊन किंवा खोल जाणिवेतून आलेले नाटक हे समांतर रंगभूमीवरच घडले. व्यावसायिकवर कायमच हलकेफुलके विषय हाताळले गेले. आताही ‘डोकं बाजूला ठेवून नाटक पाहा’ अशा जाहिराती व्यावसायिक नाटकांच्या दिसतील. विचार करायला लावणारी समांतर नाटकाची चळवळ कधीच थंडावली आहे. पूर्वी कामगार आणि दलित रंगभूमी अत्यंत सशक्त आणि संपन्न काम करत होत्या. विशिष्ट समाजाच्या व्यथा, कामगारांचे प्रश्न यातून रंगभूमी समृद्ध होत गेली. आता तो प्रवाह दिसत नाही.

* नव्या कलाकृती आणताना लेखकांची भूमिका नेमकी काय असावी?

लेखकाला स्वातंत्र्य असले पाहिजे, असे आपण म्हणतो. त्यामुळे लेखकाने काय लिहावे हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण लेखक हा कायम जी समाजाची गरज असेल तेच आपल्या नाटकात आणत असतो. हल्लीच्या समाजाला विचारांची गरजच नसेल तर लेखक तरी का वैचारिक लिहितील. सरतेशेवटी संहितेचा प्रयोग झाला तरच ते नाटक आणि प्रत्येकाला वाटत असते आपले नाटक लोकांनी पाहावे. त्यामुळे लेखकाला लोकांचा कल पाहावा लागतो.

* लोककलेमध्ये विनोद साधण्यासाठी वास्तवावर शब्दकोटय़ा केल्या जातात, बऱ्याचदा ते अडचणीचे ठरते, अशा संहिता कशा तपासल्या जातील?

दादा कोंडके, दादू इंदुरीकर, राम नगरकर, वसंत सबनीस अशा दिग्गज मंडळींची नाटके पाहिली आहेत. ‘गाढवाचं लग्न’, ‘विच्छा माझी.., ‘वस्त्रहरण’ या लोककलेच्या प्रवाहातल्या कलाकृती आहेत. त्यामुळे लोककलेला स्वत:ची अशी परंपरा आहे. त्यावर आम्ही मोहर उठवणे गैर ठरेल. कीर्तनकारांना आपण संहिता सेन्सॉर करायला सांगू का? तसेच लोककलांचा बाज हा ग्रामीण, रसरशीतच हवा तरच त्याची परंपरा जपली जाईल.

*  करोनानंतर नाटय़ क्षेत्रात काय बदल व्हायला हवे?

गेल्या काही महिन्यांत कलाकार आपल्या जागी आणि प्रेक्षक आपल्या जागी होते. आता इतक्या महिन्यांनी ते नाटकाकडे येत आहेत, त्यामुळे प्रेक्षकांची गरज लक्षात घ्यायला हवी. ऑनलाइन नाटकाचा एक नवीन प्रवाह आपल्याकडे येऊ घातला आहे. त्याकडेही सकारात्मकतेने पाहायला हवे. पूर्वी मुंबई, पुणे, नाशिक यापलीकडे जाऊन कलाकार राज्यभर नाटकांचे दौरे करत होते. हल्ली कलाकारांच्या व्यग्रतेमुळे त्यावर मर्यादा आली आहे. परिणामी ग्रामीण भागातून नाटक बाहेर पडले. अर्थात यामागे मालिकांचे चित्रीकरण आणि आर्थिक गणितेही आहेत. असे असले तरी नाटक प्रत्येकापर्यंत कसे पोहोचेल याचा विचार व्हायला हवा.

मुलाखत – नीलेश अडसूळ