News Flash

भारनियमनाचे गौडबंगाल!

राज्यात अघोषित वीज भारनियम होत असलेतरी खापरखेडा व मौदा एनटीपीसी वीज निर्मिती प्रकल्पांकडे महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राकडून विजेची मागणी होत नसल्याची माहिती आहे

| July 19, 2015 12:17 pm

राज्यात अघोषित वीज भारनियम होत असलेतरी खापरखेडा व मौदा एनटीपीसी वीज निर्मिती प्रकल्पांकडे महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राकडून विजेची मागणी होत नसल्याची माहिती आहे. तांत्रिक बिघाड आणि कोळशाची गुणवत्ता यामुळे विजेचे उत्पादन कमी होत असल्याचा दावा वीज निर्मिती केंद्राचे अधिकारी करतात. महावितरणकडे वीज पुरेशी नाही तर वीज प्रकल्पांकडे मागणी का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित होतो.

खापरखेडा केंद्र
क्षमता – १३४० मेगाव्ॉट
वीजनिर्मिती कमाल मर्यादा – १११५ मेगाव्ॉट. प्रत्यक्षात वीजनिर्मिती – ८१० मेगाव्ॉट. एकूण संच – ५
वीजनिर्मिती कमी का? – २१० मेगाव्ॉट क्षमतेचा एक संच देखभाल-दुरुस्तीसाठी बंद. अधिकाऱ्यांनुसार : यंत्राची कार्यक्षमता, कोळशाची गुणवत्ता तसेच महाराष्ट्र राज्य भारप्रेषण केंद्राकडून विजेची मागणी कमी, यामुळे.
पाणी – पेंचमधून
कोराडी केंद्र
क्षमता – ६२० मेगाव्ॉट
वीजनिर्मिती – दोन संचांतून १८० व १६० मेगाव्ॉट. एकूण संच – ३
वीजनिर्मिती कमी का? – एक संच नूतनीकरण व आधुनिकीरण कामासाठी बंद. अधिकाऱ्यांनुसार : तांत्रिक, वातावरण बदलांमुळे.
पाणी – पेंचमधून
तिरोडा केंद्र (अदानी)
क्षमता – ३३०० मेगाव्ॉट
प्रत्यक्ष निर्मिती – २५०० ते २६०० मेगाव्ॉट. एकूण संच – ५
वीजनिर्मिती कमी का? – एक संच बंद. अधिकाऱ्यांनुसार – एमएसडीसीएलकडून मागणी होत नसल्याने वीज उत्पादन कमी.
पाणी – टंचाई नाही

मौदा केंद्र
क्षमता – १००० मेगाव्ॉट आहे.
प्रत्यक्ष निर्मिती – ५०० मेगाव्ॉट (गुरूवारी मागणी वाढल्याने ८००)
वीजनिर्मिती कमी का? – मागणी कमी असल्याने
पाणी – टंचाई नाही.
चंद्रपूर महाऔष्णिक केंद्र
क्षमता – २३४० मेगाव्ॉट
प्रत्यक्ष निर्मिती – १२८० मेगाव्ॉट. एकूण संच – ७
वीजनिर्मिती कमी का? – २१० मेगाव्ॉटचे चार, तर ५०० मेगाव्ॉटचे तीन. २१० मेगाव्ॉटचा एक संच कायमच बंद. ५०० मेगाव्ॉटचा एक संच वार्षिक देखभाल व दुरुस्तीसाठी बंद.
पाणी – इरई धरण निम्म्यापेक्षा अधिक रिकामे. केवळ ४५.८५१ टक्के साठा शिल्लक. साडेतीन ते चार महिने टिकेल इतका हा पाणीसाठा आहे. आणखी काही दिवस पाऊस झाला नाही तर गंभीर स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.
पारस केंद्र
क्षमता – ५०० मेगाव्ॉट
प्रत्यक्ष निर्मिती – ४६५ ते ४७० मेगाव्ॉट. एकूण संच – २
वीजनिर्मिती कमी का? – कोळशाचा दर्जा हा चांगला नसल्याने.
पाणी – दररोज साधारणत ४४ हजार क्युबिक मीटर पाण्याची आवश्यकता. पारस बॅरेजमध्ये सध्या ३.५५ द.ल.घ.मी. तर बाळापूर धरणात ६.९३ द.ल.घ.मी. पाणीसाठी शिल्लक. हे प्रमाण पाहता येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबपर्यंत वीज निर्मितीबाबत चिंता नाही.

राज्यात पावसाने दडी मारल्याने वीज निर्मितीवरही त्याचा
परिणाम होऊ लागला आहे. पावसाचा लहरीपणा असाच राहिला तर मोठे वीज संकट ओढवू शकते, अशी भीती व्यक्त केली जाते. पावसाअभावी विजेचा वापर वाढल्याने सध्या राज्यात अनेक ठिकाणी भारनियमन सुरू झाले आहे. दुसरीकडे अनेक वीज निर्मिती प्रकल्पांची क्षमता असतानासुद्धा विजेची मागणीच नोंदवली जात नसल्याने निर्मितीत घट झाली आहे. आणीबाणीच्या परिस्थितीचा फायदा घेऊन तांत्रिक कारण समोर करून संच बंद ठेवायचे व बाहेरून महागडी वीज खरेदी करायची हा प्रकारसुद्धा नजीकच्या काळात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पाश्र्वभूमीवर राज्यातील वीज केंद्रांची सध्याची स्थिती काय आहे, नेमके उत्पादन किती आहे, किती संच बंद आहेत, याचा राज्यभरातील प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा!

 

कोकण

अडथळ्यांच्या
शर्यतीत दाभोळ प्रकल्प
सतीश कामत
एन्रॉन प्रकल्पाचे (दाभोळ) २००५ मध्ये रत्नागिरी गॅस व वीज प्रकल्प (आरजीपीपीएल) असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर तांत्रिक सुधारणा करत २०१० मध्ये या प्रकल्पातून १९४० मेगाव्ॉटची विक्रमी वीजनिर्मिती करण्यात आली; पण महावितरणने वीज बिल थकवल्याने आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे रिलायन्स कंपनीने दराच्या वादातून नैसर्गिक वायूचा पुरवठा कमी करत अखेर बंदच केल्याने २०१३ च्या जानेवारीत प्रकल्पाला टाळे लागले. गेल्या जूनमध्ये केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज रेल्वेतर्फे खरेदी केली जाणार असल्याची घोषणा करून मोठा दिलासा दिला. ‘गेल’ने नैसर्गिक वायू पुरवण्याची तयारी दाखवली, पण ऊर्जामंत्र्यांचा दिलासा तात्पुरताच ठरला. कारण येथे निर्माण होणारी वीज भारतीय रेल्वेला देशातील सुमारे १५० ठिकाणी पुरवायची आहे. त्यासाठी आवश्यक वीजवहन यंत्रणा उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वीजनिर्मितीसाठीची कोंडी फुटलेली नाही.
कोयना

पुरेशा जलसाठय़ाने
वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू
विजय पाटील
पाऊस लांबला असला तरी समाधानकारक पाणीसाठा असल्याने महाराष्ट्रास वरदान असलेल्या कोयना जलविद्युत प्रकल्पातून अखंड व पूर्ण क्षमतेने ऊर्जानिर्मिती सुरू आहे. कोयना धरण हे १०५.२५ टीएमसी क्षमतेचे असून याच्या विविध टप्प्यांतून एकूण २ हजार मेगाव्ॉट जलऊर्जानिर्मिती होते. सध्याच्या या पाणीसाठय़ावर हा प्रकल्प अजून काही महिने पूर्ण क्षमतेने सुरू राहू शकतो. कोयनेत तीन वर्षांपूर्वी यशस्वीरीत्या झालेल्या जलाशय छेद प्रक्रियेमुळे (लेक टॅपिंग) टेंभू, ताकारी, म्हैसाळ प्रकल्पासाठी २० टीएमसी पाणी देण्यास आणि जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यातून १,००० मेगाव्ॉट ऊर्जानिर्मिती सुरू झाली आहे. सध्या धरणात ४९ टक्के एवढा जलसाठा आहे. तब्बल ६५ किलोमीटरच्या कोयना पाणलोट क्षेत्रातील आजवरचे पर्जन्यमान विचारात घेता यंदाही हा जलाशय पूर्ण भरेल, असा प्रकल्प अधिकाऱ्यांना विश्वास वाटतो.

नाशिक

दोन केंद्रांत ८०० मेगाव्ॉटची घट
अनिकेत साठे
उत्तर महाराष्ट्रातील एकलहरे आणि भुसावळ या दोन्ही औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांत सध्या स्थापित क्षमतेच्या केवळ ६० टक्के वीजनिर्मिती होत असून त्यात ८०० मेगाव्ॉटची घट आहे. एकलहरेतील एक संच दुरुस्तीच्या कारणास्तव बंद आहे तर भुसावळ येथील नेमके कारण गुलदस्त्यात आहे. एकलहरे केंद्राची ६३० मेगाव्ॉट स्थापित क्षमता असून तिथे ३६० मेगाव्ॉट वीजनिर्मिती होते. तीनपैकी एका संचाची दुरुस्ती सुरू असल्याने दोन संचांवर हे काम सुरू आहे. या केंद्राला पाणी व कोळशाचा तुटवटा नाही. उलट कोळशाचा महिनाभर पुरेल इतका साठा असल्याचे सांगण्यात आले. भुसावळ केंद्राची स्थापित क्षमता एकूण १४२० मेगाव्ॉट आहे. पण, वीजनिर्मिती होते ती केवळ ८९० मेगाव्ॉट. उत्पादनात जवळपास ५३० मेगाव्ॉटची घट आहे. सारे काही आलबेल असताना ही घट आश्चर्यकारक आहे. तथापि, कंपनीने मागणीप्रमाणे वीज उत्पादन कमी-अधिक होत असल्याचे म्हटले आहे. दोन्ही केंद्रांत सध्या पाणी व कोळशाचा तुटवडा नाही. मात्र, तरीही स्थापित क्षमतेच्या ४० टक्के वीजनिर्मिती घसरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2015 12:17 pm

Web Title: load shedding
टॅग : Maharashtra
Next Stories
1 महाराष्ट्रातील लखलखाट घोषणेपुरताच!
2 अनागोंदीला कायद्याचे कोंदण
3 कुपोषित मुलं ‘अडकलेली’च..
Just Now!
X