संगीतकार आनंद गोपाळ मोडक यांचा जन्म अकोला येथे १३ मे १९५१ रोजी झाला. ते पुण्यातील पृथ्वी थिएटरचे संस्थापक सदस्यांपैकी एक होते.
अकोल्याहून पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर मोडक यांना प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनमध्ये प्रवेश मिळाला. त्यानंतर थिएटर अ‍ॅकॅडमीमध्ये त्यांनी अनेक नाटकांना संगीत दिले. बा. सी. मर्ढेकर यांच्या ‘बदकांचं गुपित’ या संगीतिकेला त्यांनी दिलेले संगीत ही त्यांची पहिली विशेष ओळख. बँक ऑफ महाराष्ट्रमधील नोकरी सांभाळून त्यांनी संगीताच्या क्षेत्रात केलेला कामगिरी महत्त्वाची आणि मोठी होती.
‘घाशीराम कोतवाल’ या गाजलेल्या नाटकामध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. त्यानिमित्त त्यांनी युरोप, अमेरिका, कॅनडा, तसेच सोव्हिएट रशिया आणि इतर देशांमध्ये दौरा केला होता.
या पदार्पणानंतर त्यांनी अनेक नाटके, तसेच, मराठी, हिंदी चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी २५ हून अधिक नाटके आणि ५० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले होते. हिंदी चित्रपटांमध्ये ‘दिशा’, ‘तत्त्व’, ‘आभास’, आदींचा समावेश होता. त्यांनी ‘क्वेस्ट’ या इंग्रजी चित्रपटालाही संगीत दिले होते. नाटकांमध्ये प्रामुख्याने ‘महानिर्वाण’, ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘महापूर’, ‘पडघम’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘उत्तर रात्र’ आदींचा समावेश होता.
त्यांनी दूरचित्रवाणीवरील विविध मालिकांनाही संगीत दिले होते. त्यांच्या ‘अमृतघन’, ‘प्रीतरंग’, ‘साजणवेळा’, ‘शेवंतीचे बन’, ‘आख्यान तुकोबाराया’ या नावाने कॅसेटस् आणि सीडी आल्या आहेत.
राज्य शासनाचे पुरस्कार
(उत्कृष्ट संगीतकार)
‘कळत नकळत’ (१९८९),
‘मुक्ता’ (१९९४), ‘दोघी’ (१९९५), ‘रावसाहेब’ (१९९६), ‘राजू’ (२०००),
 ‘धूसर’ (२०१०)
फिल्मफेअर पुरस्कार
(उत्कृष्ट संगीतकार)
‘मुक्ता’, ‘सरकारनामा’, ‘तू तिथे मी’ या चित्रपटांसाठी
तसेच अल्फा झी अ‍ॅवॉर्डस् व इतरही संस्थांचे  पुरस्कार
इतर पुरस्कार
चैत्रबन पुरस्कार (गदिमा प्रतिष्ठान, पुणे)
कुमार गंधर्व पुरस्कार (श्रीराम पुजारी प्रतिष्ठान, पुणे)
*त्यांनी संगीत दिलेला ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आला होता.
श्रद्धांजली
सतीश आळेकर -आनंद मोडक हे एक झपाटलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे ऐकणे अफाट होते. कोणीही काहीही सांगितले की ते मोडक यांच्या बरोबर लक्षात राहात असे. ते संगीताचा आधार होते. संगीताविषयी त्यांची स्वत:ची ठाम मते होती. त्यांच्या संगीतातही ते वैश्विक संगीताचा अंदाज घेत होते.
मृणाल कुलकर्णी- माणूस आणि संगीतकार म्हणूनही मी त्यांच्याकडून खूप शिकले. संगीतातील काहीही विचारावे आणि त्याचे उत्तर मोडकांकडे असावे आणि इतके असूनही कधीही गाजावाजा न करणारा हा माणूस होता. माझ्या माहेरचे आणि सासरचेही मोडकांशी खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे खूप काहीतरी गमावल्यासारखी भावना आहे. प्रभाकर वाडेकर, सुधीर मोघे आणि आता आनंद मोडक. पुण्याने अलीकडे किती धक्के पचवले आहेत!
नरेंद्र भिडे– अनेक संगीतकारांची गाणी लोकप्रिय होतात पण संगीताला पुढे नेण्याचे काम करणाऱ्यांपैकी मोडक होते. त्यांचे अभिजात संगीताशी नाते होते. लोकसंगीताची, काव्याची, साहित्याची उत्तम जाण त्यांना होती. अतिशय चिकित्सक बुद्धीने आणि आपले काम परिपूर्णच हवे असा ध्यास घेऊन ते काम करत. मी गेली १६-१७ वर्षे त्यांच्याबरोबर काम केले. मोडकांचे माझ्यावर मुलासारखे प्रेम होते. त्यांचे जाणे हा धक्का न पेलवण्यासारखे आहे.
किरण यज्ञोपवित – प्रायोगिक रंगभूमीवर अगदी नवशिक्या मुलांबरोबरही त्यांचा चांगला संपर्क होता. नाटकांपासून प्रयोगशील चित्रपटांपर्यंतचा त्यांचा मोठा प्रवास आहे. मला भेटले की ते नेहमी म्हणत, ‘आपल्याला एकत्र काम करायचे आहे,’ दोन वेळा त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी आलीही, पण ते काही ना काही कारणाने राहून गेले. तीनच दिवसांपूर्वी माझा त्यांच्याबरोबर एक लांबलचक फोन झाला होता. त्यांना बोलायची फार आवड होती. एखाद्या व्यक्तीत गुण दिसले की त्याच्याशी स्वत:हून जाऊन बोलणे हा त्यांचा स्वभाव होता. अशी माणसे हल्ली मिळत नाहीत.