संवादी लेखनशैलीनं, खुमासदार वाणीनं, मुलाखतींमधल्या खोचकपणानं आणि कोणालाही, कुठंही पटकन गुगली टाकून बाद करण्यानं सुधीर गाडगीळ स्वत:च सेलिब्रिटी झाला. निवेदन हे एक व्यावसायिक क्षेत्र बनलं, कारण सुधीर हा अनेकांचा ‘आयकॉन’ बनला. अस्सल पुणेकर म्हणवून घेताना जराही संकोच वाटू न देणाऱ्या सुधीर गाडगीळला पुणेकरांचा ‘पुण्यभूषण’ हा मानाचा किताब आज ९ जून रोजी मिळतो आहे.
सुधीरच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला तो आपला अगदी खास मित्र आहे, असं वाटत असतं. सुधीर आपला मित्र आहे, असं छातीठोकपणे सांगणारे हजारो जण महाराष्ट्रात आणि परदेशातील मराठी घरांमध्ये सापडतील. त्या प्रत्येकाबद्दलची पुरेशी माहिती एकदा का संगणकात साठली की मग तो कधीही आणि कुठेही भेटला तरी आपण रोज भेटत असल्याच्या जवळकीनं सुधीर त्याच्याशी गप्पा मारणार. तसा तो पक्का व्यावसायिक वगैरे वाटत असला तरी त्याला गप्पा मारताना जगातल्या अनेक विषयांवर तो अतिशय आत्मविश्वासानं बोलू शकतो. जयंत नारळीकर असोत की भीमसेन जोशी किंवा आशा भोसले असोत की बाळासाहेब ठाकरे. सुधीरकडे जो जन्मजात आत्मविश्वास आहे तो त्याला अशा कोणत्याही प्रसंगात अवधान मिळवून देतो. कोणत्याही ग्रुपमध्ये सहज मिसळून जाताना, त्याचे डोळे आणि कान सतत काहीतरी टिपत असतात. मित्रांकडून ऐकलेल्या किश्श्यांवर मैफल मारण्यापेक्षा आपणच घडवलेले विनोद सांगताना त्याचा चेहरा उत्फुल्ल होतो. त्यात आपण उडवलेली इतरांची टर असते, पण स्वत:च्या फजितीच्याही अनेक गमती असतात.
सुधीरची ओळख सुप्रसिद्ध निवेदक अशी असली तरी त्यामागे त्याचं पत्रकार असणं आहे. कॉलेजात हिरो म्हणून सहज लोकप्रिय होण्याची क्षमता असताना त्यानं आयुष्यात पत्रकार व्हायचं ठरवलं. आतासारखं पत्रकारितेचं प्रशिक्षण न घेताही पत्रकार होण्याचा काळ होता तो. त्या वेळच्याच काय पण आताच्या पुण्यातही अस्सल म्हणवल्या जाणाऱ्या सदाशिव पेठेतल्या लोणीविके दामले आळीतील एका वाडय़ात राहून पत्रकार व्हायचं ठरवणं हे तसं जगावेगळं होतं. केवळ सुंदर आणि टपोरं अक्षर असण्यानं पत्रकार होता येत नाही, हे खरंच. सुधीरकडे त्याच्या बरोबरीनं जग पाहण्यासाठी वेगळे डोळे होते. त्या डोळ्यांत शोधक नजर होती. सुरुवातीला वृत्तपत्राच्या दबडघ्यात उमेदवारी करताना आसपासच्या पत्रकारांचं हलाखीचं जगणं आणि त्यातही दिसणारा दुर्दम्य विश्वास त्याला याच व्यवसायात राहायला सांगत होता. दैनिकात रोज वाटेल ते करायला लागत असलं तरी सुधीरला स्वत:च्या आवडीचं करायला मिळायला हवं होतं. ‘तेजस्वी’ या नावानं गोव्याचे चौगुले आणि पुण्याचे शंतनूराव किलरेस्कर अशा दोन उद्योगपतींनी सुरू केलेल्या साप्ताहिकात सुधीर रुजू झाला आणि त्याला स्वत:चा मार्ग लख्ख दिसायला लागला. नंतर मुकुंदराव किलरेस्करांनी ‘मनोहर’ नियतकालिक युवकांसाठी करण्याचं ठरवलं, तेव्हा दत्ता सराफ आणि श्री. भा. महाबळ या वरिष्ठांच्या बरोबर सुधीरलाही संधी मिळाली. या संधीचं त्यानं अक्षरश: सोनं केलं. त्या वेळच्या तरुणांमध्ये मनोहर इतकं लोकप्रिय झालं की सुधीरचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. पुण्यातल्या मुकुंदनगर भागातील किलरेस्कर प्रेसमधील किलरेस्कर, स्त्री आणि मनोहर या नियतकालिकांच्या संपादक विभागात ह. मो. मराठे, विद्या बाळ, दत्ता सराफ, श्री. भा. महाबळ, रा. अ. कुंभोजकर अशी आजघडीला नामांकित असणारी मंडळी होती. लेखक मंडळींना घेऊन स्वारगेट चौकातल्या त्रिवेणी या हॉटेलात यातले बरेचजण गप्पा मारत. ते हॉटेल म्हणजे किलरेस्करमधील संपादकीय अड्डाच होता. खवय्या हे बिरुद त्याला त्याच काळात चिकटलं. गावोगावचे खाद्यपदार्थ चवीने खाऊन त्याची गावभर चर्चा करण्यात त्याला कोण आनंद असतो. सतत काही नवं करण्याच्या प्रयत्नात शेजारीच राहणाऱ्या विश्वनाथ ओक या मित्रानं ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ हा कार्यक्रम सादर करायचं ठरवलं. ग. दि. माडगूळकरांच्या निधनानंतर त्यांच्या अमर गीतांचा हा कार्यक्रम आजही अनेक रूपांत सादर होत असतो. अशा कार्यक्रमात एकापाठोपाठ एक गाणी सादर करण्यापेक्षा गदिमांबद्दल मधूनमधून बोलणारा संवादक ही त्या कार्यक्रमाची गरज ठरली. सुधीरनं हे काम हौसेनं करायचं ठरवलं. लेखनाबरोबर हा नवा उपक्रम त्याच्यासाठी नवा अनुभव होता. संवादक ही सुधीरची खरी ओळख होती. ती त्यानं नंतरच्या आयुष्यात घेतलेल्या तीन हजारांहून अधिक मुलाखतींमधून साकारलीच. पण समारंभाच्या नेटकेपणात निवेदन नावाची काही गोष्ट असते, याचं भान सुधीरनं पहिल्यांदा दिलं. तोवर सूत्रसंचालन वगैरेला फॅड असा प्रतिशब्द होता. गाण्यांच्या कार्यक्रमातील निवेदन लोकप्रिय होत असताना महाराष्ट्रात अवतरलेल्या दूरचित्रवाणी या नव्या माध्यमानं सुधीरला सहजपणे खुणावलं. तिथं आपल्याला काही करता येईल, असा विश्वास असल्यानं दूरदर्शनवर त्यानं नवे कार्यक्रम सुरू केले. आमची पंचविशी हा त्यातला सर्वात गाजलेला कार्यक्रम. सार्वजनिक जीवनात लोकप्रिय असलेल्यांना ‘सेलिब्रिटी’ बनवण्याचं श्रेय या कार्यक्रमाचं. बाळासाहेब ठाकरे यांना पहिल्यांदा दूरदर्शनवर मुलाखतीसाठी पाचारण केलं, तेव्हा त्यांची मुलाखत घेण्यासाठी सुधीरला बोलावलं. अशा कितीतरी पहिलेपणासाठी सुधीरला श्रेय द्यायला हवं. लेखनाच्या बोली शैलीनं, बोलण्याच्या खुमासदारपणानं, मुलाखतींमधल्या खोचकपणानं, जाहीरपणे टिंगल करण्यानं आणि कोणालाही, कुठंही पटकन गुगली टाकून बाद करण्यानं सुधीर स्वत:च सेलिब्रिटी झाला. निवेदन हे एक व्यावसायिक क्षेत्र बनलं, कारण सुधीर हा अनेकांचा ‘आयकॉन’ बनला.
सुधीरला एक फार चांगली सवय आहे. डायरी लिहिण्याची. कितीही दमला तरी डायरी न लिहिता हा कधी झोपत नाही. (त्या डायऱ्या त्याला योग्य वेळी सापडतातही!) हा त्याचा उद्योग त्याच्याच फायद्याचा ठरला. कोणत्याही कार्यक्रमासाठी गृहपाठ करण्यासाठी तो टाळाटाळ करत नाही. त्यामुळे नेटकेपणात भर पडतेच, शिवाय मुलाखत देणाऱ्यालाही समाधान वाटतं. हे सगळं असलं तरी स्वभावातला अस्सल पुणेरीपणा कधीही हरवू न देण्यानं समारंभात ऐन वेळी आलेल्या संकटांवर मात करण्यात त्याला नेहमीच आनंद वाटतो. उत्साह हे त्याच्या जगण्याचं खरं इंधन आहे. ज्या काळात पुणे-मुंबई हा प्रवास खडतर म्हणावा असा होता, त्या काळात हा रोज अपडाऊन करून रात्री एखाद्या पानाच्या ठेल्यावर टवटवीत होऊन टपकत असे. रोजच्या कामांच्या यादीचं छोटंसं चिटोरं आणि मेंदूत भरलेली प्रचंड स्मरणशक्ती ही त्याची शक्तिस्थळं आहेत. जगातल्या बहुतेक देशांत अनेकदा जाऊन आलेल्या सुधीरला प्रत्येक गावातल्या त्याच्या मित्रांचे सगळे व्हेअरअबाऊट्स तोंडपाठ असतात. व्यसन नसल्यानं परदेशातल्या कोणत्याही मराठी घरात सुधीरचं स्वागत असतं आणि त्याच्या लाघवीपणामुळे त्यानं आपल्याच घरी राहावं, यासाठी परदेशातील मराठी कुटुंबांमध्ये रस्सीखेचही होत असते.
सेलिब्रिटी झाला तरी त्याच्या डोक्यात हवा गेली नाही, हे आणखी एक चांगलं झालं. म्हणजे अमेरिकेतल्या सॅन होजेला झालेल्या जागतिक मराठी परिषदेत माधुरी दीक्षितची प्रकट मुलाखत घेण्यासाठी तिनंच जेव्हा सुधीरचं नाव सुचवलं, तेव्हा त्याचं काय झालं, हे त्याच्या समस्त मित्र परिवाराला कळून चुकलं. लताबाई किंवा आशाबाई यांच्यासारख्या दैवतांनी दिलेल्या शाबासकीचं त्याला आजही अप्रूप असतं. शाळेतल्या किंवा कॉलेजातल्या तेव्हाच्या ढ मित्रानं रस्त्यात ओळख काढून लगट केली तरी सुधीर आपण जन्मजन्मांतरीचे मित्र असल्याचा विश्वास त्याच्यामध्ये पेरू शकतो.
अस्सल पुणेकर म्हणवून घेताना जराही संकोच वाटू न देणाऱ्या सुधीर गाडगीळला पुणेकरांचा ‘पुण्यभूषण’ हा मानाचा किताब मिळतो आहे. गेली पंचवीस वर्षे या पुरस्काराने पुण्यातच नव्हे, तर साऱ्या महाराष्ट्रात पुरस्काराचं नवं पर्व सुरू झालं. गावोगावी असे भूषण ओळखले जाऊ लागले. लेखक, पत्रकार, जाहिरात लेखक, सूत्रसंचालक, निवेदक, मुलाखतकार, एकपात्री प्रयोगकार, विविध कार्यक्रमांचा संयोजक, रेखाचित्रकार (ही आणखी एक नवी ओळख.. सुधीरकडे त्यानं काढलेल्या अशा दीड हजार चित्रांचा साठा आहे. ती पाहणाऱ्या दुर्मीळांमध्ये सुभाष अवचट आहे!) अशा अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याची क्षमता सुधीरमध्ये आहे, कारण त्याला माणसांबद्दल आजूबाजूच्या घटनांबद्दल, त्याच्या कार्यकारणभावाबद्दल कमालीची उत्सुकता असते. टोकियोहून रात्रीच्या विमानाने मुंबईत उतरल्यानंतर रेल्वे पकडून थेट भुसावळला कार्यक्रमासाठी पोचताना त्याच्यामधली ही पॅशन दिसते. पुढे रस्ता नाही. तिथं पायवाट करता येईल की नाही, माहिती नाही, अशा परिस्थितीत पण नवी पायवाट तयार करून त्याचा हमरस्ता करण्यासाठीचे सुधीरचे कष्ट ‘पुण्यभूषण’मुळे कारणी लागले आहेत.