कोणाच्या आई-वडिलांनी आत्महत्या केलेली, कोणाचे अपघातात मरण पावलेले, तर कोणाच्या आईचा खून करून बाप तुरुंगात गेलेला. कोणाच्या आईवर पोटाची खळगी भरण्यासाठी तमाशाच्या फडात जाण्याची वेळ आलेली, तर कोणाची आई देहविक्री करते. कोणी मुरळी, देवदासी यांच्या पोटी जन्मून जणू गुन्हाच केलेला. कोणी पूर्णपणे अनाथ तर कोणाच्या बापाला कायमस्वरूपी अपंगत्व आलेले. कोणाला बापाची ओळखच नाही तर कोणाची आई दुसऱ्या पुरुषासोबत पळून गेलेली. पारधी, भिल्ल, कोणी डोंबारी तर भीक मागत असताना उचलून आणलेले.. येथे प्रत्येक मुलाची कहाणी वेगळी आणि भीषण. अशा मुलांना दीपक आणि कावेरी नागरगोजे या दाम्पत्याने शांतिवन प्रकल्पात मायेची ऊब दिली. हे सगळे बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून.

शांतिवनने अनेक मुलांना सन्मानाने जगण्याबरोबरच उच्चशिक्षित करून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले आहे. सतरा वर्षांपूर्वी चार पत्र्यांच्या शेडमध्ये पन्नास अनाथ, वंचित मुलांना आश्रय देऊन ‘शांतिवन’च्या प्रकल्पात सध्या तीनशे मुले लहानाची मोठी होत शिक्षण घेत आहेत. परिसरातील पाचशे मुले शिक्षणासाठी येतात. कुठल्याही सरकारी अनुदानाशिवाय वडिलोपार्जति शेतातून निघणाऱ्या धान्यावर आणि समाजातील देणगीदारांच्या मदतीवर हे काम सुरू आहे. बाबा आमटेंच्या आनंदवनात ‘पर्यटक म्हणून या आणि परिवर्तक म्हणून तुमच्या भागात जा’ हे आवाहन स्वीकारून नागरगोजे दाम्पत्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आहे त्या साधनातून, हालअपेष्टा झेलत वेदनेशी नाते जोडून घेतले.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा
Indian youth abroad
भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवणाऱ्यांना अटक

बीड जिल्ह्यतील शिरूर कासार तालुका कायम दुष्काळी. या परिसरातील लोकांचे तांडे दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवर ऊसतोडणीसाठी स्थलांतरित होतात. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये ऊसतोडणी मजुरांचे तांडे निघाले की गावेच्या गावे ओस पडतात. लहान मुलांना सांभाळण्यासाठी घरी कोणी नसल्याने या मुलांचेही आई-वडिलांबरोबर स्थलांतर होत असल्याने त्यांची आणि शाळेची भेटच होत नाही. परिणामी, मुलंही उसाच्या फडातच लहानाची मोठी होतात. खेळण्या-बागडण्याच्या वयात ही मुले कायमची बालकामगार होऊन जातात. खायला चांगले अन्न मिळत नसल्याने कुपोषण वाढते. मुलींना अल्पवयातच बालविवाहाची शिकार व्हावे लागते. मुकादमांकडून होणारे शोषण ठरलेलेच. अशा परिसरातील ‘आर्वी’ या सहाशे उंबऱ्याच्या गावातील माजी सैनिक शाहूराव व रजनी नागरगोजे या दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा दीपक अकरावीच्या वर्गात शिकत असताना बाबा आमटे यांच्या आनंदवनातील सोमनाथ श्रम शिबिरात सहभागी झाला. समाजातील वंचितांच्या मुलांसाठी त्याने काम करण्याचा निर्णय घेतला.

नाटय़ चळवळीला नवे बळ!

मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील दीपकने २००० मध्ये कुटुंबात समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करण्याचा विचार मांडला तेव्हा त्याला सर्वानीच वेडय़ात काढले. प्रखर विरोध केला. ‘समाजसेवेचे असले उद्योग पशावाल्यांचे असतात, हे काम आपले आहे का, अगोदर पोटापाण्याचे बघा, नाहीतर भिकेला लागा.’ असे ठणकावण्यात आले. अनाथ, वंचित, उपेक्षित, तमाशा, लालबत्ती अशा घटकांतील मुलांसाठी तुम्ही काम केले तर लोक काय म्हणतील, येथे कोण देणगी देणार, अशा प्रश्नांना सामोरे जावे लागले. ‘पर्यटक म्हणून या आणि परिवर्तक म्हणून तुमच्या भागात जा’ हा बाबा आमटे यांच्या विचाराचा मनावर खोलवर परिणाम झाल्याने दीपकने कुटुंबाचा विरोध पत्करून काम करण्याची खूणगाठ बांधली. दरम्यान, कावेरीबरोबर दीपकचे लग्नही झाले. पत्नीला आपल्या कामाची माहिती देऊन तिला सोबत घेऊन या नवदाम्पत्याने २७ नोव्हेंबर २००१ रोजी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या वडिलोपार्जति जमिनीत ‘शांतिवन’चे रोपटे लावले. गावातून जायला धड रस्ता नाही, पावसाळय़ात तर नदी पार करून जावे लागते. ही परिस्थिती आजही आहे. वडिलोपार्जति साडेसात एकर जमीन संस्थेच्या नावावर करून चार पत्र्यांचे शेड मारून परिसरातील वंचित ऊसतोड मजुरांची पन्नास मुले घेऊन वंचितांसाठीचा संसार सुरू झाला. वेदनेशी नाते जोडल्यानंतर आलेल्या प्रत्येक अडचणीवर मात करत या दाम्पत्याचा प्रवास सुरू आहे. दीपक आणि कावेरीला एक मुलगाही झाला. या दाम्पत्याने आता आपण ५१ मुलांचे आईबाप असल्याने दुसरे अपत्य होऊ न देण्याचा निर्णय घेतला. याच मुलांबरोबर चंद्रहास हा त्यांचा मुलगा वाढत यंदा दहावीत आहे. अनेकदा आर्थिक अडचणींमुळे मन व्यथित होई. पण त्यातून पुन्हा नवा मार्ग काढत उभे राहण्याचे बळही याच परिस्थितीतून मिळत गेले. सतरा वर्षांच्या काळात अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले. तसे चांगली माणसेही भेटत गेली.

रेवतीची कहाणी तर चित्रपटाला लाजवेल अशीच आहे. चार वर्षांची असताना वडील वारले. एक लहान बहीण, आई वाममार्गाला लागली, तिला ‘एचआयव्ही’ची बाधा झाली. त्याचे संक्रमण लहान मुलीत झाले. आजारी आईला सांभाळण्याची जबाबदारी या मुलींना पेलावी लागली. भाजी मंडईत जाऊन मटकी विकत आणि कशाबशा जगत. दरम्यान, आईचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी कोणीही नातेवाईक आले नाही. प्रसंगी शेवटी दोघींनीच अंत्यसंस्कार केले. या मुलींचा कोणी स्वीकार करेना. त्या मुली शांतिवनमध्ये आल्या. अशा अनेक वेगवेगळय़ा कारणांनी अनाथ झालेल्या मुलामुलींना शांतिवनने आश्रय दिल्याने त्यांचे जीवन सुकर झाले. सुरुवातीच्या काळात दीपक यांची तमाशासम्राट रघुवीर खेडकर आणि मंदाराणी खेडकर यांची मोहटादेवी येथे भेट झाली. त्यांच्याकडून तमाशा कलावंतांचे दु:ख समजल्यानंतर त्यांनी या व्यवसायातील कलावंतांच्या मुलांना शांतिवनमध्ये दाखल करण्यास सुरुवात केली. या काळात खर्च भागवताना सुरू झालेल्या ओढाताणीमुळे खर्चाचा डोंगर वाढत गेला. मग दीपकने सावकाराकडून पैसे घेतले. सावकार तरी एक कुठला. उधारी थकलेली. सात-आठ लाख रुपयांचे कर्ज होते. ते वेळेवर परत न गेल्याने सावकाराची बोलणीही खावी लागली. शेवटी दोन एकर जमीन विक्री करून देणे भागवले. एक वेळ अशी आली की काळानेही परीक्षा पाहिली. संक्रांतीच्या सणाच्या दिवशी मुलांना खाऊ घालण्यासाठी पैसेच नव्हते. कोणी उसनेही पैसे देईना. अशा कठीण वेळी कावेरी यांच्या अंगावरील मंगळसूत्राच्या दोन पळय़ा आणि दोन वर्षांच्या चंद्रहासला नातेवाईकांनी घातलेले दागिने सोनाराला विकून सण साजरा केला.

गुणिजनांना आर्थिक सुरक्षाकवच..

ठाण्यातील उज्ज्वला बागडे यांनी ‘लोकसत्ता’मधील बातमी वाचून शांतिवनला मदतीचा हात दिला. त्यानंतर काही संस्था, व्यक्तींनी पुढाकार घेऊन वंचितांसाठी सुरू असलेल्या या सेवेला मदतीचा हात दिला. सुरुवातीपासूनच डॉ. विकास आमटे व डॉ. प्रकाश आमटे, नरेंद्र मेश्री या आनंदवनच्या विश्वस्तांनी स्वरानंद संगीत रंजनी कार्यक्रमाच्या माध्यमातून शांतिवनला आधार दिला. मराठवाडय़ात मागच्या काही काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या चर्चेचा विषय असला तरी त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनाबाबत फारसे कोणाचे लक्ष जात नव्हते. अशा वेळी शांतिवनने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनाही पुनर्वसनासाठी प्रकल्पात आणले. ‘नाम फाऊंडेशन’ने शांतिवनातील वसतिगृहासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, सध्या शांतिवनमध्ये तीनशे मुले राहतात. यात ८० अनाथ, वंचित मुले आहेत. मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची आवश्यकता आहे. वडिलोपार्जति जमिनीत भाजीपाला आणि धान्य पिकवून हा प्रकल्प वंचितांसाठी सुरू आहे. तर शांतिवनमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेऊन बाहेर पडलेली ४८ मुले उच्चशिक्षण घेत असून, ती पूर्णपणे शांतिवनवर अवलंबून असून त्यांच्याही खर्चाचा भार आहे.

व्यक्ती तितक्या व्यथा अन् मायेची ऊब

खालापुरी येथील गंगाबाई भस्मारे यांच्या पतीचे आणि दोन मोठय़ा मुलांचे एकाच वर्षी निधन झाले. सासू आणि सून विधवा झाल्या. शीलाला दोन छोटी मुले, घरात पुरुष उरला नाही, खायची मारामार. अशा वेळी या दोघी सासू-सुना मुलांना घेऊन शांतिवनात आल्या. मुलगी मोठी होऊन तिचे लग्नही झाले, तर मुलगा अतुल मुंबईत नोकरी करून स्थिरावला. अंबाजोगाईतील एका मुलीचे आई-वडिलांनी सोळाव्या वर्षीच लग्न करून दिले. सासरी गेल्यानंतर तिला साडेतीन लाख रुपयांना आपल्याला विकण्यात आल्याचे कळाले. सासरचे लोक वेश्या व्यवसाय करत असल्याने या दलदलीत ओढण्यासाठी तिच्यावर दबाव वाढला. पण तिने विरोध करून पोलीस ठाणे गाठले, मात्र पुन्हा आई वडिलांच्या स्वाधीन झाल्यानंतर सासरी जाण्यासाठी तगादा लागल्याने तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. याच वेळी तिचा ‘शांतिवन’शी संपर्क झाला.  ती आणि तिचे बाळ शांतिवनमध्ये राहते आहे. तिनेही स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षणाचा मार्ग स्वीकारला. अशा अनेक मुलींना ‘शांतिवन’ने मायेची ऊब दिली.

संस्थेपर्यंत कसे जाल?

‘शांतिवन’

पोस्ट आर्वी, ता. शिरूर कासार, जि. बीड, अहमदनगर-पाथर्डी-खरवंडी-आर्वी (४० किमी), बीड-नवगण राजुरी-आर्वी (३० किमी)

धनादेश – भवानी विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठान

(BHAVANI VIDYARTHI KALYAN PRATISTHAN) नावाने काढावेत. धनादेशामागे अथवा सोबत

देणगीदाराने त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. त्यावरून संस्थेला पावती पाठविता येईल. संस्थेकडे धनादेश सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील.

देणगी ‘८०-जी’ अंतर्गत करसवलतीस पात्र.

आमचे काही प्रयोग ‘शांतिवन’मध्ये होत असतात. दीपक नागरगोजे पूरक काम उभे करत आहेत, याचा आनंद आहे. त्यांना मदतीची गरज आहे. ती ‘लोकसत्ता’कडून होते आहे, याचा आनंद वाटतो.

– विकास आमटे, आनंदवन

दीपक नागरगोजे यांचे काम अतिशय चांगले आहे. अनाथ आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तो झटतो आहे. बाबा आमटेंची प्रेरणा घेऊन त्यांनी उभे केलेले काम सकारात्मक आहे. अशा संस्थांना सातत्याने मदत करण्याची भूमिका समाजानेही घ्यायला हवी. ‘नाम’ संस्थेच्या वतीने ‘शांतिवन’ संस्थेला मदत केली आहे. वसतिगृह बांधले आहे. पण अशा संस्थांना सातत्याने मदत लागते. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हे ‘लोकसत्ता’चे मोठे व्यासपीठ आहे. या संस्थेला या उपक्रमाच्या माध्यमातून अधिक मदत मिळेल, असे वाटते.

 मकरंद अनासपुरे, अभिनेता

धनादेश येथे पाठवा..

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग, मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय    

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय      

संपादकीय विभाग,एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४११२५

नाशिक कार्यालय       

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय       

संपादकीय विभाग,प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, ०७१२ झ्र् २७०६९२३

औरंगाबाद कार्यालय       

संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी, औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३

नगर कार्यालय       

संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७

दिल्ली कार्यालय       

संपादकीय विभाग,द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा – २०१३० उत्तर प्रदेश. ०११- २०६६५१५००