खासदारांचा सातबारा
लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले
‘तडफदार आणि लाडके’ उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी
येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद दर रविवारी.. खासदारांचा
सातबारा मध्ये..

मुंडे विरुद्ध सारे
बारामती म्हणजे शरद पवार, लातूर म्हणजे विलासराव देशमुख तसेच बीड म्हटल्यावर गोपीनाथ मुंडे हे जणू काही समीकरणच तयार झाले. १९९५ मध्ये उपमुख्यमंत्री झाल्यावर जिल्ह्य़ावर मुंडे यांची एकहाती सत्ता प्रस्थापित केली. पण पुढे मुंडे यांचे एक एक सहकारी त्यांना सोडून गेले आणि जिल्ह्य़ातील भाजपच्या वर्चस्वाला शह बसला. गेल्या विधानसभा निवडणुकीत तर जिल्ह्य़ातील सहापैकी पाच आमदार हे राष्ट्रवादीचे निवडून आले. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने जातीच्या ‘तुतारी’चा वापर करून बघितला, पण मुंडे हे पुरून उरले. मुंडे हे राज्याच्या राजकारणात तर बंधू आणि पुतण्या त्यांचे जिल्ह्य़ाचे राजकारण सांभाळत. आता बंधू आणि पुतण्या धनंजय हे दोघेही राष्ट्रवादीच्या कळपात गेले आहेत. अर्थात जिल्ह्य़ाच्या राजकारणावर गोपीनाथरावांचा अद्यापही चांगला पगडा आहे. मुंडे यांना लढत देण्याकरिता कोणाला रिंगणात उतरविता येईल याची चाचपणी राष्ट्रवादीकडून सुरू आहे. अलीकडेच मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीने सुरेश धस या मराठा समाजातील नेत्याला संधी दिली. पण धस यांचा मुंडे यांच्यापुढे टिकाव लागण्याबाबत साशंकताच आहे. विशेष म्हणजे गेल्या वेळी राष्ट्रवादीने बीडची लढत प्रतिष्ठेची करूनही राष्ट्रवादीच्या जिल्ह्य़ातील काही बडय़ा नेत्यांनी मुंडे यांनाच पडद्याआडून मदत केली होती. याचीच पुनरावृत्ती यंदाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या निवडणुकीत आठ कोटी खर्च झाल्याची कबुली दिल्याने मुंडे हे अडचणीत आले. यंदाही सारी ‘ताकद’ पणाला लावल्याशिवाय मुंडे राहणार नाहीत.

लोकसभा मतदारसंघ : बीड
विद्यमान खासदार : गोपीनाथ मुंडे (भारतीय जनता पक्ष)
मागील निकाल : राष्ट्रवादी काँग्रेसचे  रमेश आडसकर यांचा पराभव.

जनसंपर्क
मुंडे यांचा राज्यभर, तसाच मतदारसंघातही जनसंपर्क आहे. प्रत्येकाला नावानिशी ओळखणारा नेता, अशी त्यांची प्रतिमा त्यांच्या जनसंपर्काची व्याप्ती सांगण्यास पुरेशी आहे. केवळ मतदारसंघातच नाही तर मुंबई, परळी व बीड येथे त्यांची संपर्क कार्यालये आहेत. अगदी उशिरापर्यंत त्यांच्याकडे माणसांचा राबता असतो. त्यांना स्वत:लाही माणसात मिसळायला आवडते. भ्रमणध्वनीवरून ते सहज संपर्कात असतात. सार्वजनिक, कौटुंबिक सुख-दु:खाच्या प्रसंगी हजेरी लावतात.

मतदारसंघातील कामगिरी :
*परळी-बीड-नगर रेल्वेमार्गासाठी चार वर्षांत केंद्र व राज्य सरकारकडून साडेचारशे कोटी रुपये मंजूर करून घेतले.
*आकाशवाणी व दूरदर्शन केंद्राचे विस्तारीकरण
*टेक्स्टाइल झोनसाठी पाठपुरावा.
*परळी रेल्वेस्थानकाचे विस्तारीकरण
करण्यात यश, अंबाजोगाई येथे रेल्वेतिकिटासाठी खिडकीची सोय.
*दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी सिंचनाचा शिरपूर पॅटर्न राबवण्यास खासदार निधीतून पाच कोटी रुपये देण्याची घोषणा करणारे एकमेव खासदार.

लोकसभेतील कामगिरी
*एकूण हजेरी – २३० दिवस (३१९ पैकी)
*सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न – ३९९ (अतारांकित ३६८, तारांकित ३१) ’४३ वेळा विविध चर्चामध्ये सहभाग
लोकसभेत मांडलेले महत्त्वाचे प्रश्न :
*देशभरातील दुष्काळी स्थितीसंदर्भातील चर्चा
*राज्यातील भीषण दुष्काळावर चर्चा (२०१२)
*महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरील चर्चेत भाग
*फ्रान्समध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारणे
*जातीनिहाय जनगणना आणि त्यासाठी कोणती पद्धत वापरावी अशा चर्चामध्ये भाग

मतदारांचा अपेक्षाभंग
जनतेने ज्या उमेदीने मुंडेंना निवडून दिले, त्या पद्धतीचे काम झाले नाही. रेल्वेचा प्रश्नही सुटला नाही. त्यांना कामाची छाप पाडता आली नाही. खासदार मुंडेंचे राजकीय मोठेपण, त्यांचे नेतृत्व लक्षात घेता परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाच्या कामाबरोबरच केंद्रातील विविध योजना आणून मतदारसंघात विकासाचे काम होणे अपेक्षित होते. पण चार वर्षांत त्यांना काहीच करता आले नाही, हे मतदारांचे दुर्दैव. त्यामुळे जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे.
रमेश आडसकर

पुढील रविवारी 
सातारा, रामटेक