राजकारणात कुठलाही विषय वज्र्य नसतो. उलट ज्याचा नागरिकांशी थेट संबंध येतो, त्यावरून रान उठवून सहानुभूती मिळवता येते. त्यामुळे पावसाळय़ात मुंबईतील खड्डय़ांचा गाजणारा मुद्दा सर्वश्रुत आहे. महाविकास आघाडीला सत्तेतून अकस्मात पायउतार व्हावे लागल्याने माजी मंत्र्यांना आता महामार्गावरील खड्डय़ांनी खडतर झालेली वाट स्वच्छपणे दिसत आहे. नाशिक-मुंबई महामार्ग तर मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातून जातो. तेथील खड्डे, वाहतूक कोंडीला त्यांना जबाबदार धरता येते. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी खड्डय़ांमुळे मिळालेली संधी दवडली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या सर्वच खाती असून त्यांनी याकडे लक्ष द्यायला हवे, असा टोला त्यांनी लगावला. मुंबईहून नाशिकला येताना भुजबळ ठाणे, भिवंडीतील वाहतूक कोंडीत अडकले होते. सामान्यजनांची वाहने कित्येक वर्षांपासून याच खड्डेमय मार्गावरून ये-जा करतात. कधीकाळी भुजबळ यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते होते. त्याच वेळी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने महामार्गाचे चौपदरीकरण मार्गी लावले होते. पण तो इतिहास झाला. वर्तमानात खड्डय़ांचे राजकारण महत्त्वाचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सारेच गॅसवर

एकनाथ शिंदे सरकारचा शपथविधी पार पडून दोन आठवडे उलटले तरी विस्ताराचे काही नाव नाही. विस्तार कधी होणार याबाबत कोणालाच खात्रीशीर माहिती नाही. राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडल्यावर विस्तार होणार, असे ठामपणे सांगण्यात येते. विस्तार रखडल्याने भाजपमधील जुनेजाणते नेते आधीच तणावाखाली आहेत. मंत्रिपद मिळते की नाही याकडे या नेत्यांच्या नजरा लागलेल्या. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाबाबत दिल्लीतील नेत्यांनी धक्कातंत्राचा अवलंब केला. तसेच काही विस्तारात होणार नाही ना ही भीती. इच्छुकांना मंत्रिपदाची धास्ती. दुसरीकडे महाविकास आघाडीतील मावळत्या मंत्र्यांकडील कर्मचारी वर्गही अस्वस्थ. नव्या मंत्र्यांकडे संधी मिळाली नाही तर पुन्हा मूळ खात्यात जावे लागणार. मंत्री कार्यालयात रुबाब वेगळा असतो. फडणवीस सरकारच्या काळात मंत्र्यांच्या कार्यालयात काम केलेल्यांना पुन्हा मंत्रालयात मंत्री कार्यालयात परत येण्याचे वेध लागलेले. पण त्यांची अस्वस्थता आणखीनच वेगळी. कारण तेव्हा काम केलेल्या मंत्र्यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होतो की नाही याबद्दल संभ्रम. तरीही कर्मचाऱ्यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

बसमध्ये माणसं भरा म्हणजे सूतजुळेल हो

काँग्रेसमध्ये असताना खरे तर त्यांना भाजपमध्ये जायचे होते. ते त्यांच्या गाडीतही चढले होते. पण गाडीतून उतरले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविषयी त्यांनी कमालीची निष्ठा दाखवली. एवढी की शिवसैनिक फिके पडतील. सेनेतील मंडळींना मागे टाकून मग त्यांनी प्रशासनावर मांड ठोकली. मग त्यांना कळाले की इकडे फायदा कमी आहे. मग ते बाळासाहेबांचे एकनिष्ठ शिवसैनिक असल्यागत बोलू लागले. एवढे की सेनेतील निष्ठावान मंडळींना कळेच ना, आपली निष्ठा आता कशी दाखवायची. पुढे बंडखोरी की उठावात ते सहभागी झाले. याचे विश्लेषण त्यांनी मुंबईत भाषणातून केले. एक सूत गिरणी पदरात पडली. १५ कोटीचे भागभांडवल राज्य सरकारने दिले. आता ताकद दाखवायची असेल तर बसमध्ये माणसं भरा म्हणजे ‘सूत’ जुळेल असे सिल्लोडो मतदार सांगत आहेत.

चार आमदारांच्या चार तऱ्हा 

शिंदे सरकारचा विस्तार अजून व्हायचा असला तरी मंत्रिपदाच्या शर्यतीत जिल्ह्यातील भाजपचे चार आमदारांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडणार असल्याचे सांगत पडद्याआडून प्रत्येकाचे प्रयत्न सुरू आहेत.

एका सदस्यांनी तर अडीच वर्षांपूर्वी निवडणूक निकाल जाहीर होताच मिरवणुकीवेळी भावी पालकमंत्री म्हणून वाहनाला फलक लावून हौस भागवून घेतली. मात्र, महाविकास आघाडीच्या हातीच सत्तासूत्रे गेल्याने सगळे मुसळ केरात गेले. आता या इच्छेला पुन्हा पालवी फुटली आहे. दुसऱ्या बाजूला ज्येष्ठत्वाचा मुद्दा पुढे करूनही कोणी पालकत्व  मागत आहे, तर निष्ठावंत  गटाकडून मूळ भाजपचा असलेल्याला पालकत्व मिळण्याची आस आहे. जिल्ह्याचे पालकत्व मिळाले तरी जिल्ह्यातच राहणार की आयात पालकमंत्री लाभणार हे कळायला आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पवारांचे दुर्लक्ष नडणार ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि पवारांच्या यशस्वी राजकीय वाटचालीत सुरुवातीला हातभार लावणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात अलीकडे पवार आणि मोहिते-पाटील यांच्यातील संघर्ष आणि मोदी प्रभाव यामुळे राष्ट्रवादीची मोठी पीछेहाट झाली आहे. मागील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तर जिल्ह्यात एकटय़ाच पडलेल्या राष्ट्रवादीला उभारी देण्यासाठी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे अशी बोटावर मोजण्याइतकीच मंडळी पुढे सरसावली होती. पुढे पवारांनी राज्यातील राजकारणाला कलाटणी दिली आणि महाविकास आघाडी सत्तेवर आली. राष्ट्रवादीलाही उभारी मिळाली. परंतु अडचणीच्या काळात शरद पवारांना ज्यांनी निष्ठेने साथ दिली, ते राजन पाटील हे पक्षांतर्गत राजकीय गटबाजीमुळे  वैतागले आहेत. त्यांच्याच मोहोळ तालुक्यातील उमेश पाटील यांनी उघडपणे राजन पाटील यांच्या विरोधात जणू मोहीमच चालविली आहे. या दोन्ही पाटलांच्या वादात पवार काका-पुतण्यांनी काणाडोळा केला आहे. त्यामुळे उमेश पाटील हे  राजन पाटील यांना डिवचण्याची संधी सोडत नाहीत. त्यामुळे आता राजन पाटील यांच्या पुत्रांनी थेट भाजपची वाट पकडली आहे. राजन पाटील हेसुद्धा त्याच मानसिकतेत आहेत. 

(सहभाग :सुहास सरदेशमुख  एजाज हुसेन मुजावर, अनिकेत साठे, दिगंबर शिंदे)

More Stories onचावडीChavadi
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chavadi maharashtra political crisis maharashtra politics political drama in maharashtra zws
First published on: 19-07-2022 at 04:20 IST