– गिरीश कुबेर

विल्यम रेने हार्पर वयाच्या तिसऱ्या वर्षी वाचायला लागला, दहाव्या वर्षी महाविद्यालयात जायला लागला आणि १४व्या वर्षी पदवीधर झालादेखील. हे एक अद्भुत व्यक्तिमत्त्व. बालप्रज्ञावान म्हणता येईल असं. अनेक विषयांत आणि भाषांत त्याला गती होती. महाविद्यालयात जायला लागल्यावर तो हिब्रु आणि संस्कृतही शिकला. कारण धर्मशास्त्र हासुद्धा त्याच्या आवडीचा विषय होता. १८८६ साली त्याची गाठ पडली एका भलत्याच माणसाशी.

जॉन डि रॉकफेलर हे त्याचं नाव. एव्हाना रॉकफेलर अमेरिकेतले सर्वात धनाढय़.. म्हणजे त्या वेळी ते आजचा बिल गेट्स याच्या दुप्पट.. बनले होते. त्यांच्यामुळे अमेरिकेत उद्योगविश्वाच्या चिमणीतून धूर यायला लागला होता. विल्यमला पाहिल्यावर त्याच्या अफाट बुद्धिमत्तेनं ते अतिशय प्रभावित झाले. या तरुणाच्या हातून काही तरी चांगलं, कालातीत घडायला हवं असं त्यांना वाटू लागलं. त्यांनी विल्यमशी संपर्क वाढवला. त्याला आपल्या पंखाखाली घेतलं; पण विल्यम मनस्वी होता. आपल्या बुद्धीचा रास्त अभिमान असलेला. तो काही रॉकफेलर यांच्या संपत्तीनं, मोठेपणानं दिपला वगैरे नाही. तरी त्यांचे संबंध मात्र चांगले सौहार्दाचे झाले. रॉकफेलर त्याच्या मागे लागले.. एखादी संस्था काढ म्हणून. त्यांनी त्या वेळी त्याच्या हाती ६ लाख डॉलर्स ठेवले. सांगितलं- हे तुझे.. उरलेले चार लाख डॉलर्स तू उभे करू शकलास तर. म्हणजे १० लाख डॉलर्स एका शैक्षणिक संस्थानिर्मितीसाठी पुरे होतील.

विल्यमला एकच संस्था काढण्यात रस होता. विद्यापीठ. खरं तर तोपर्यंत त्याच्याशी संबंधित संस्थेकडनं अमेरिकेत चार ठिकाणी शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या होत्या; पण त्याला त्यापेक्षाही भव्य कामात रस होता. विद्यापीठ काढायचं होतं त्याला; पण १० लाख डॉलर्स जमले तरी तो काही करताना दिसत नव्हता. रॉकफेलर यांनी विचारलं, ‘पैसे तर जमलेत. नुसता बसून का आहेस?’ तर त्यावर या तरुण पठ्ठय़ानं उत्तर दिलं : मला संपूर्ण स्वातंत्र्य दिलंत तरच मी मला हवी तशी, माझ्या स्वप्नातली संस्था उभी करून दाखवीन. मला कोणाची लुडबुड चालणार नाही.

सर्वानी त्याला हवं होतं तसं स्वातंत्र्य दिलं. रॉकफेलर यांनी वर आणखी पाच लाख डॉलर्स दिले. त्यालाच या संभाव्य संस्थेचं अध्यक्ष केलं. १८९१ सालची ही गोष्ट. त्यातून त्याला हवी होती तशी संस्था उभी राहिली आणि १९०६ साली विल्यम गेलादेखील.

शिकागो विद्यापीठ ही ती संस्था. आजही मुक्त शिक्षणातल्या उत्तमतेसाठी हे विद्यापीठ ओळखलं जातं. मिल्टन फ्रिडमन ते कार्ल सगान, कॅथरिम ग्रॅहम, सेमुर हर्ष असे सगळे मान्यवर या विद्यापीठाचे. आज १ लाख ८० हजार सदस्यांची तगडी अशी या विद्यापीठाची माजी विद्यार्थी संघटना आहे.

हे सगळं आता सांगायचं कारण म्हणजे गेली ४१ वर्ष या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी हार्पर यांच्या स्मरणार्थ व्याख्यानमाला चालवतात. जगभरातले मान्यवर विविध विषयांवर या व्याख्यानमालेत येतात. कोणताही विषय वर्ज्य नसणं आणि व्याख्यात्याला त्याचा विषय मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य हे या व्याख्यानमालेचं मोठेपण. गेल्या आठवडय़ात या व्याख्यानमालेनं आपल्याच माजी विद्यार्थ्यांला बोलावलं. रघुराम राजन हे त्याचं नाव. विषय होता : करोना-कालीन अर्थवास्तव आणि आव्हान.

राजन यांनी नेहमीच्याच शैलीत काहीही आडपडदा न ठेवता मोकळेपणानं विषयाचा वेध घेतला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत असताना राजन यांनी २००८च्या आर्थिक संकटाचं भाकीत केलं होतं. ताज्या भाषणात त्यांनी चितारलेलं आर्थिक भाकीत भयानक आहे. लवकरच व्ही या इंग्रजी अक्षराप्रमाणे आर्थिक उभारणी सुरू होईल वगैरे आशावाद त्यांनी फोल ठरवलाच, पण आर्थिक राष्ट्रवादावरही चोख भाष्य केलं. उदयोन्मुख देश, औद्योगिक महासत्ता, चीनसारख्या देशाची अर्थगतीही शून्याखाली जाईल, हा त्यांचा अंदाज. ‘देशाचा नेता जितका राष्ट्रवादी, संकुचित तितकं त्या देशाचं अर्थसंकट तीव्र’ असं अभ्यासपूर्ण मत राजन या व्याख्यानमालेत मांडतात; पण त्यांच्या व्याख्यानाचा वृत्तांत देणं हा काही ‘कोविडोस्कोप’चा उद्देश नाही.

तर यंदा ही व्याख्यानमाला प्रथमच प्रतिरूप वास्तवात घडली. करोनामुळे इतक्या जणांना कसं काय बोलवायचं ही चिंता आयोजकांनाही होती. त्यामुळे वेबसंवादासारखी ती आयोजित केली गेली. किती जणांनी नावनोंदणी करून या व्याख्यानाला हजेरी लावली?

७,७०० ही यंदाच्या व्याख्यानाची उपस्थिती. हार्पर व्याख्यानमालेचा एक विक्रमच.

हेवा वाटावा असंच हे बुद्धिप्रेम.

यंदा याच करोनामुळे ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मधली आपल्या पुण्यातली १४५ वर्षांची वसंत व्याख्यानमाला बंद ठेवली जाणार आहे. वेबसंवादातून ती घ्यावी असं काही आपल्या वसंत व्याख्यानमालेच्या आयोजकांना वाटलं नाही.

बरंच झालं म्हणायचं.. तशी त्यांनी ती घेतली असती आणि शिकागोइतके नाही, पण ७०० जणांनीही नोंदणी केली नसती, तर व्याख्यानमालेचा हा वसंत अधिकच कोमेजला असता.

@girishkuber