|| सुधीर गाडगीळ

दिलीप प्रभावळकर.. नाटक, मालिका आणि सिनेमांतून विविधांगी अन् तितक्याच बहुढंगी भूमिका साकारून अभिनयाचा वस्तुपाठ घालून देणारे अभिनेते! अभिनयातला त्यांचा हा संचार जितक्या सहजतेने होतो, तितकेच सहज त्यांचे लेखनही असते. गेल्या चार दशकांहून अधिक काळ अभिनय-लेखनात सर्जक मुशाफिरी करणारे दिलीप प्रभावळकर आज (४ ऑगस्ट रोजी) वयाची पंचाहत्तरी पूर्ण करत आहेत. त्यानिमित्ताने, त्यांच्याशी ‘अनपेक्षित’पणे खुलत गेलेल्या या गप्पा..

Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

पुणेरी पगडी घातलेला, खांद्यावरचं उपरणं सावरत डोळे टपोरे फिरवत बोलणारा ‘चिमण’ मी पाहिला. ते दिलीप प्रभावळकरांचं भूमिकेच्या वेशभूषेतूनच मला घडलेलं पहिलं दर्शन. तेही माझ्या सदाशिव पेठेतल्या जुन्या वाडय़ात. धुमाळे हा मित्र, त्या वेळी म्हणजे १९७७ साल असेल, ‘चिमणराव-गुंडय़ाभाऊ’ चित्रित करत होता.

दिलीपनं साकारलेला ‘चिमण’ सुपरहिट झाला. घराघरांत क्लिक झाला. पुढच्या टप्प्यावर ‘पुलं’चं ‘एक झुंज वाऱ्याशी’, दळवींचं ‘नातीगोती’, मतकरींचं ‘घर तिघांचं हवं’, तोरडमल यांच्या ‘कलम ३०२’मध्ये दुहेरी भूमिका.. अशा ज्येष्ठ लेखकांनी लिहिलेल्या भूमिका दिलीपला करायला मिळाल्या आणि दिलीपचा अभिनेता-आलेख उंचावतच गेला.

‘चौकट राजा’मध्ये तर आनंद मोडकनं त्याला ‘असा कसा मी वेगळा’ गायलाही लावलं. ‘हसवाफसवी’ पाहताना नाना कोंबडीवाला, बॉबी मॉड ते कृष्णराव हेरंबकर ही नाना पात्रं अनुभवताना, दिलीपच्या लेखन आणि अभिनय दोन्ही गोष्टींना रसिकांनी भरभरून दाद देत डोक्यावरच घेतलं. डॉ. श्रीराम लागू तर म्हणाले, ‘हा प्रयोग पाहणं म्हणजे अभिनयाचा वर्षभराचा अभ्यास करण्यासारखं आहे.’

‘सरकारनामा’, ‘विदूषक’, ‘नागरिक’, ‘शिवा’ या चित्रपटांतून त्यांनी मंत्रिपदं भूषवली. ‘लगे रहो मुन्नाभाई’त पेश केलेला ‘गांधी’ यामुळे तर दिलीप राष्ट्रीय स्तरावर पोहोचला. साऱ्याच चित्रपटांचे धावते उल्लेखही आणखी करत नाही. कारण ही काही चरित्रवजा सविस्तर मुलाखत नाही. इथे मी नोंदवतोय अनपेक्षितपणे खुलत गेलेल्या दिलीप प्रभावळकरबरोबरच्या गप्पा! योगायोग म्हणजे, ‘अनपेक्षित’ याच नावाचं दिलीपचं नवं पुस्तक राजहंस प्रकाशित करतंय. त्यामुळे आम्ही काही मित्र माजगावकरांच्या सिंहगड पायथ्याच्या फार्म हाऊसवर दिलीपला आवडणाऱ्या भुरभुरत्या पावसाकडे बघत गप्पा मारत होतो.

हा लोकप्रिय अभिनेता जगभरच्या मराठी मंडळांत डोकावून आलेला आहे. जिथं ‘शो’ केले, तिथल्या यजमान दाम्पत्यांना दिलीपनं स्वहस्ताक्षरात पोच देऊन सर्वत्र आपली आठवण जागती ठेवलेली आहे. साहित्य आणि अभिनयात राष्ट्रीय पारितोषिक मिळवूनही, कुठंही नव्यांना उपदेशात्मक उद्बोधन करण्याच्या फंदात हा पडलेला नाही. मित्रांच्या गप्पांत सहजतेनं सहभागी होत मजा आणणाऱ्या दिलीपविषयी मला म्हणूनच प्रेम. त्यात तो पंचाहत्तरीचा होतोय, हे कळल्यानं तर अधिकच गप्पांची उत्सुकता. त्यामुळे बोलत गेलो..

  • ‘दिलीप, तू एकाच वेळी नाटक, मालिका, चित्रपट करत असतोस. लिहीतही असतोस. तर, भूमिकांचं पाठांतर कसं करतोस?’

– मी प्रॅक्टिस काळापासून स्क्रिप्टच्या टचमध्ये असतो. नाटकाचे प्रयोग करत असताना, एरवीच्या मुक्त वेळातही नाटकाचे संवाद म्हणून बघणं (स्वत:शीच) चालूच असतं. नाटककाराचे लिखित शब्द वाचूनच, नेमके तेच पाठ करायला हवे. काही जण नाटककाराचे शब्दन् शब्द पाठ न करता गाभा लक्षात ठेवून मनानं वाक्य मांडतात. ते मला योग्य वाटत नाही. तो नाटककार-संवादकाराचा अपमान आहे. कुठलंही स्क्रिप्ट नजरेखालून घालत राहिलं ना, की अरे लक्षात राहतं. मालिकांच्या बाबतीत ऐन वेळी संवाद मिळतात. ते नुसते ऐकून नाही, तर वाचायलाच हवेत. कुठलीही तयारी केलेली, तसंच भूमिकेवर केलेलं ‘वर्क’ वाया जात नाही. मला स्वत:ला तरी कुठल्याही भूमिकेबाबत ‘अनप्रीपेअर्ड’ (विनातयारी) राहणं असुरक्षित वाटतं.

 

  • तू कधी स्टेजवर ब्लँक झालायस? शिस्तबद्ध तयारी करणारा आहेस म्हणून विचारतो..

– एकदाच ब्लँक झालोय. ‘पळा, पळा कोण पुढे पळे तो..’चा प्रयोग. बबन प्रभूंचा फार्स. त्यात मी हिरो आणि भक्ती बर्वे हिरॉइन होती. तिला सिगरेटचा धूर अजिबात आवडत नसे. साहित्य संघाच्या आमच्या प्रयोगाला विंगेत एक बॅकस्टेजवाला बिडी ओढत होता. त्याचा वास रंगमचावर येत होता. दोन संवादांत भक्ती मध्येच कॅरेक्टरच्या बाहेर येऊन मला म्हणाली, ‘‘दिलीप, तुला सिगरेटचा वास येत नाही?’’ माझा ट्रॅकच गेला. फ्यूज उडतो तसा. तिनं ते ओळखलं आणि पुन्हा मला माझ्या वाक्यावर आणून सोडलं. मोबाइल वाजल्यानं कलावंत का डिस्टर्ब होतात, ते अशा वेळी कळतं.

 

  • नेहमीच्या ‘दिलीप’पेक्षा वेगळ्या व्यक्तिरेखा मिळाल्यात, तशा रंगवताना त्या व्यक्तिरेखांत तू पूर्ण बुडून जाऊ शकतोस? तादात्म्य पावणं वगैरेची चर्चा असते, म्हणून विचारलं..

– ‘चौकट राजा’मधला ‘नन्नू’, ‘झपाटलेला’मधला ‘तात्या विंचू’, आबा टिपरे, ‘लगे रहो..’चा ‘गांधी’ या वेगळ्याच व्यक्तिरेखा केल्यात. तीन प्रकार असतात. एक म्हणजे तुम्ही स्वत:च, दुसरी तुम्ही करता ती व्यक्तिरेखा, त्या व्यक्तिरेखेची वेगळी मानसिकता, स्वभाव आणि तिसरं म्हणजे तुम्ही स्वत:कडेच समोरून बघत असता. ८९ वर्षांचा हेरंबकर हा गायक नट अठरा नंबरचा चष्मा लावतो, तेव्हा काही दिसत नसतं. पण बघत असतो. प्रेक्षकांतून स्वत:कडे बघतो (त्या दृष्टीने) आणि बोलतो. पण एक नक्की, अभिनेत्यानं पूर्णत: कॅरेक्टरमध्ये बुडून जाऊ नये. ती व्यक्तिरेखा तुम्हाला.. नटाला स्पर्श करते, याचा अर्थ त्या व्यक्तिरेखेची सुख-दु:खं तात्कालिक तुमची वाटतात. म्हणून तुम्ही ती साकारता. ‘नातीगोती’मधला मतिमंद मुलाचा बाप, ‘हसवाफसवी’तला कृष्णराव हेरंबकर साकारताना मला भोवतीचे वृद्ध आठवत. म्हातारपण कधी आलं कळलंच नाही म्हणणारे वडील आठवत. अशा जिव्हाळ्याच्या माणसांची आठवण भूमिका साकारताना झाली, तर मात्र काही क्षण आपण अलिप्तता ठेवूच शकत नाही.

 

  • तू ज्यांना मानतोस, त्या पुलंचं तुझ्या डोळ्यांसमोरचं वेगळं रूप?

– ‘एक झुंज वाऱ्याशी’च्या पहिल्या प्रयोगाला ते खूप अस्वस्थपणे फे ऱ्या मारत होते. चार-पाच दिवसांत लेखन केलेलं असल्याने प्रेक्षक प्रयोग कसा स्वीकारतायत, याची अस्वस्थता त्यांच्या मनात होती. मला या भूमिकेला ‘बेस्ट अ‍ॅक्टर अ‍ॅवार्ड’ मिळाल्यावर मला जवळ घेऊन पाठ थोपटत पुलंनी शाबासकी दिली. एक गंमत सांगतो, ‘भ्रमणमंडळ’ मी जेव्हा आमच्या कॉलनीत केलं तेव्हा पुलंसारखा हुबेहूब चष्मा ऑप्टिशियनकडून करून घेतला. वडिलांचा कोट अल्टर करून पुलंप्रमाणे घातला. अशी सारी तयारी केली आणि आमचे कानडे वकील म्हणाले, ‘‘सुनीताबाई, कोर्टात खेचतील.’’ हे ऐकल्यावर काय; ‘भ्रमणमंडळ’ सोडा, अभिनयच सोडण्याचा निर्णय घेण्याइतपत घाबरलो. पुढे पुलं जिवाभावाचे झाले. ‘राजेमास्तर’ करताना पुलंना प्रथम भेटलो.

 

  • एकपात्री प्रयोग.. स्टँडअप टॉक शो करावा, हे कशातून सुचलं?

– मुळात मी प्रोफेशनल अ‍ॅक्टर होणारच नव्हतो. (दिलीप बायोफिजिक्समध्ये एम.एस्सी. फर्स्ट क्लास आहे, हे माहीत आहे ना?) ह्य़ूस्टनच्या बृ. म. मंडळासाठी ‘चूकभूल देणेघेणें’ मी लिहिलं आणि डॉ. हेमू अधिकारीच्या ग्रेट प्रयत्नांमुळे प्रयोग केला. मुळात मी आधी दोन भूमिका केल्या तेव्हा कधी आवाजाचा वेगळा वापर करी. त्यामुळे कधी व्यक्तिरेखा शेअर करायला मला वर्कशॉपमध्ये बोलावत. त्या वेळी बोलताना ‘व्हीएचएस’ दाखवण्यासाठी खूप क्लिपिंग केली. त्यातून ‘मुखवटे-चेहरे’, ‘चिमणराव ते गांधी’ हे टॉक शो आकाराला आले. स्क्रिप्ट आधारासाठी लिहितो.

 

  • अमिताभ बच्चनबरोबर काम करतानाचा लक्षात राहिलेला क्षण?

– ‘पहेली’मध्ये आधी केलं होतं काम. पण ‘सरकार राज’ लक्षात राहतो. त्यात मी अमिताभचा पॉलिटिकल गुरू असतो. मी मुंडासं घातलेला रावसाब. बच्चन डॉन सुभाष. त्याचा मुलगा मरतो म्हणून मी त्याचं सांत्वन करायला जातो, हा सीन. तो खून मीच घडवलाय याची त्याला कल्पना असते. पण मी सांत्वन करत असताना तो फ्रोजन.. थिजलेल्या चेहऱ्यानं फक्त माझ्यामागे हात करतो. मी मागे बघतो तर माझा नातू मरून पडलेला. तो कूल. मला काय एक्स्प्रेशन द्यावं, तेच कळेना. तो ग्रेट अ‍ॅक्टर!

 

  • आवडते कलाकार? हिंदीतले.. काम केलेले..

अमिताभ बच्चन, नासिरुद्दीन शाह आणि ओम पुरी.

 

  • जाहिरातीची कामंही केली आहेत ना?

– विकास गायतोंडेमुळे खूप. टीव्ही अ‍ॅड खूप केल्या. पिरॅमिड टीव्ही, जॉन्सन टाइल्स, डीएचएल कुरिअर.. लेटेस्ट वंदना, सुमितबरोबर ‘प्रवीण लोणचे’ जाहिरात.

 

  • तू भारावून पाहिलेल्या इतर कलावंतांच्या कलाकृती कोणत्या?

– एक : ‘बॅरिस्टर’- विक्रम, चंद्रकांत गोखले आणि विजयाबाई; दोन : पुलंची ‘बटाटय़ाची चाळ’ आणि ‘वाऱ्यावरची वरात’; तीन : रांगणेकरांनी बसवलेलं ‘तो मी नव्हेच!’; आणि चार : थिएटर अ‍ॅकॅडमीचं ‘घाशीराम कोतवाल’!

 

  • आव्हानात्मक वाटलेल्या भूमिका कोणत्या?

– ऐन वेळी केलेला ‘चौकट राजा’, घराघरांत पोहोचलेला ‘चिमणराव’, मतकरींची चेटकीण आणि ‘हसवाफसवी’मधला कृष्णराव हेरंबकर – नाना मुंजे.

 

  • अभिनेत्यांची मिळालेली दाद?

– ‘हसवाफसवी’ला माझा नम्र सलाम, असं पॉल म्युनीच्या पुस्तकावर लिहून, सही करून डॉ. लागू यांनी दिलेलं ते भेटपुस्तक. सत्यदेव दुबेंनी विद्यार्थ्यांना कॅरेक्टर स्टडीसाठी सुचवलेलं हेच नाटक. विजयाबाईंनी ‘वा गुरू’ला ‘व्वा’ म्हणत मारलेली चापट आणि पुलंची शाबासकी.

 

  • आवडते लेखक कोणते?

– पुलं, जयवंत दळवी, विजय तेंडुलकर.

 

  • ‘गुगली’ आणि ‘कागदी बाण’ लिहिणाऱ्या दिलीपला आवडलेला स्तंभलेखक?

– ‘ठणठणपाळ’- म्हणजेच दळवी आणि बिझी बी.

 

  • आवडलेल्या अभिनेत्री? आणि त्यांचे चित्रपट?

– नूतन (‘अनाडी’, ‘बंदिनी’, ‘सुजाता’), वहिदा रहेमान (‘प्यासा’) आणि मधुबाला (‘मुघल ए आझम’)

 

‘बोक्या सातबंडे’ला साहित्य अकादमी पुरस्कार, ‘गांधी’ला राष्ट्रीय पुरस्कार, मराठी रंगभूमी योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार असे तीन क्षेत्रांत सर्वोच्च मान मिळवणाऱ्या दिलीपला आम्हा रसिकांचा मानाचा मुजरा!